गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी सुपरस्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन, त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि इतर काही जणांना एनसीबीने मुंबईच्या किनार्याजवळ गोव्याला जाणार्या एका लक्झरी क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे अमली पदार्थ होते तसेच तो ड्रग्स विकण्याच्या मोठ्या षडयंत्राचा भाग होता, असा आरोप त्याच्यावर होता. त्याला जामीन नाकारण्यात येउन तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली होती. त्या आरोपातून आर्यनला मोठा दिलासा मिळाला असून एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे एनसीबीच्या माध्यमातून श्रीमंत तसेच सिनेसृष्टीतील लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप करीत या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या विरोधात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आघाडी उघडली होती. हा सगळा फर्जीवाडा कसा रचला जात आहे तो त्यांनी अनेक पुराव्यानिशी उघड केला होता. आता त्यांना वेगळ्याच प्रकरणात अडकवले असले तरी त्यांनी जो फर्जीवाडा उघड केला होता, तो खरा आहे, असे या एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासातून निष्पन्न झालेल्या निकालातून दिसून येते. या सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि चौफेर चर्चा झालेल्या या प्रकरणात कारवाई करणार्या एनसीबीने आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्स सापडले नाहीत असे म्हटले असले तरी त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे ड्रग्ज सापडले होते व तो हे ड्रग्ज आर्यन खानसाठी घेऊन आला होता, असा आरोप केला होता. त्याचबरोबर एनसीबीचा असा दावा असा होता की हे ड्रग्ज आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटकडून आले असून आर्यन खान या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग आहे. तथापि, आता एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की आर्यन खानकडे कोणतेही ड्रग नव्हते आणि त्याचा कोणत्याही मोठ्या अथवा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता. तसेच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे कोणत्याही दृष्टीने व्यावसायिक कारणासाठी असण्याच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असल्याने त्यातील रॅकेटचा भागही चुकीचा असल्याचे सिद्ध होते. शिवाय, त्याने आणलेले ते ड्रग्स आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कोणत्याही पद्धतीने सिद्ध झाले नाही. त्यामुळे हा सगळा जो सुरुवातीपासून जाणवत होता, तसा केवळ बनावच होता हेही यातून स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट आर्यन खानला मोठा दिलासा देणारी ठरणार असून त्यामुळे त्याला क्लीनचिट मिळण्याची शक्यताही वाढली आहे, असे समजायला हरकत नाही. 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईहून गोव्याला जाणार्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकल्यापासून सुरू झालेल्या या प्रकरणात आर्यन, अरबाज आणि मुनमुनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. दुसर्या दिवशी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांचा आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा केला आणि न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. 7 ऑक्टोबरनंतर अनेक प्रकारे एका न्यायालयातून दुसर्या न्यायालयात, अनेक वकिल आदी प्रकारातून अखेर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी यातील न्यायालयाच्या भूमिकेवरची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी कागदपत्रांनिशी एनसीबीचा फर्जीवाडा जगापुढे आणण्यास सुरुवात केल्यानंतर नोव्हेंबरपासून उलटी चक्रे फिरू लागली. यातील मुख्य तपासनीस अधिकारी समीर वानखेडे लाचखोरी आणि खंडणीच्या अनेक आरोपांमध्ये अडकल्यामुळे त्याला पदावरून हटवण्यात आले. शिवाय त्याचे बेकायदा बार आणि नोकरीसाठीची वादग्रस्त कागदपत्रे याचीही प्रकरणे बाहेर आली आणि काही न्यायालयात गेली. केंद्राकडून विविध केंद्रीय यंत्रणांचा वापर महाराष्ट्रातील सरकार आणि अन्य यांच्या विरोधात कसा केला जात आहे याचे हे अजून एक उदाहरण आहे. या प्रकरणातील वानखेडेने जमा केलेले खोटे साक्षीदार, त्याला अभय देणारे वरिष्ठ अधिकारी आणि आर्यन खानला महिनाभर तुरुंगात ठेवणारी न्याय व्यवस्था यांच्या बाजूने या बनावटगिरीच्या बाबतीत कोणतीही जबाबदारी नाही का, हा खरा सवाल आहे.