आज नूतन संवत्सर…अर्थात गुढीपाडवा. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी पहिलाच शुभ मुुहूर्त. या दिनाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे अनादिकालापासून गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने गुढीपाडवा साधेपणानेच साजरा करावा लागला होता. पण यावर्षी कोरोनाची व्याप्ती कमी झालेली आहे. तो अजून संपलेला नाही. पण दोन वर्षापूर्वी जशी तीव्रता होती तशी तीव्रता यावेळी नसल्याने यावर्षीचा गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा होणार हे निश्चित. सरकारनेही आता सर्व निर्बंध उठविलेले असल्याने गुढीपाडवा हा उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मात्र त्याचबरोबरच सावधानता बाळगण्याचे आवाहन देखील केलेले आहे. कारण गेल्या काही दिवसांत युरोपसह चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील, राज्यातील लसीकरण वाढविण्याचा निर्धार आरोग्य यंत्रणेने केलेला आहे. त्यामुळे आपण देखील योग्य ती खबरदारी घेत गुढीपाडवा साजरा करणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर निर्बंध उठलेत म्हणून अनिर्बंधपणे वागू लागलो तर पुन्हा एकदा मागचेच संकट आ वासून उभे ठाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्यावे. भूतकाळाचा वेध घेत, वर्तमानाशी लढत भविष्याची नवी गुढी आपल्याला या निमित्ताने उभी करायची आहे. यासाठी आपण सर्वांनीच मनातील संकल्प करुन ते तडीस नेण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे. संकटे ही येतच राहणार. त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते. परिस्थितीला सामोरे कसे जायचे हे उमगते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात प्रत्येकावर काहीना काही संकटे आलीच आहेत. त्यातून सावरुन आपण आता नव्या जोमाने पुन्हा एकदा आपल्या कार्याचा, आयुष्याचा श्रीगणेशा करायचा आहे. त्यासाठी गुढीपाडव्यासारखा शुभमुहूर्त दुसरा कुठलाच नाही. मग उठा, मनातील, शरीरातील मरगळ झटकून नव्या दमाने, नव्या जोमाने आपण सारेजण नव्या संकल्पाची गुढी उभी करुन तिची पताका अशीच डौलाने फडकावित ठेऊया. कोरोनाचे संकट टळल्याने आता कुठे रुतलेले अर्थचक्र गतिमान होऊ लागलेले आहे. ते आणखी गतिमान केल्याशिवाय विकासाला आणि पर्यायाने आयुष्याला वेग आल्याशिवाय राहणार नाही.वाढती महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, पावसाळ्यात जलप्रलय या समाजापुढे, देशापुढे नेहमीच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यावर आतापर्यंत आपण सारेजण मात करीत आलेलोच आहोत. भविष्यातही या समस्या अशाच निर्माण होत राहणार आहेत. त्यावर कायमचा उपाय करणे कुठल्याही राज्यकर्त्यांना जमलेले नाही. प्रत्येक राज्यकर्ते आपापल्या परीने त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे भासवितात. पण मूळ समस्या आहेत तशाच आहेत. आजही एका बाजुला जलप्रलय तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी सुरु असलेली जीवघेणी धावपळ हे दृश्य वर्षानुवर्षे आपण पहात आलेलोच आहोत. यापुढेही ते आणखी भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग आपल्यापरीने भरपूर काही देत असतो. पण आपण मंडळी त्याची जपणूक करण्यात कमी पडतोय, हे नाकारुन चालत नाही. यासाठी आपली क्षमता वाढणे आणि वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या रशिया, युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम जगावर जाणवतोय. त्याची झळ भारताला सुद्धा बसत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे वाढू लागलेले दर, त्यावर नियंत्रण ठेवण्यात सत्ताधार्यांची दिसणारी हतबलता आणि त्यामध्ये भरडून निघालेली सर्वसामान्य जनता हे विदारक चित्र आजमितीस सर्वत्र दिसत आहे. हे थांबविणे कुणाच्याच हाती उरलेले नाही. त्यामुळे परिस्थितीशी दोन हात करुन मार्गक्रमण करीत राहणे हेच आपल्या सर्वसामान्यांचे काम असून आपण सारेजण त्यावर निश्चित मात करुन मार्ग चालत राहिलेलो आहोत. यापुढेही हा मार्ग असाच सुरु ठेवायचा आहे.अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी योग्य तो संकल्प करुन नूतन संवत्सरात संकल्पाची गुढी उभी करुया. ही गुढी निश्चितच सर्वांना योग्य तो मार्ग दाखविल. नव्या वर्षात बळीराजाची शेती बहरु दे, त्याच्या शिवारात मायंदाळ पीक येऊन ते शिवारातून घरात येऊ दे. बळीराजा सुखावला की आपोआपच सारेजण सुखी राहतात हा दंडक आहे. याशिवाय निसर्गानेही लहरीपणा सोडून देऊन अवखळपणे वागू नये. राज्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे काम करीत जनसेवा करीत रहावे. डॉक्टर्स, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदी मुलभूत घटकांनीही प्रामाणिकपणे कार्य करीत रहावे. माणसाने माणसासारखे वागले तर निश्चितच सर्व योग्य प्रकारे चालेल आणि नव्या संकल्पाची पूर्तता केल्याचे समाधान मिळेल.
संकल्पाची गुढी

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026