चुकला फकीर…

राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या गुढीवरच्या वस्त्राचा रंग बदलला आहे. 2019 मध्ये ते कट्टर मोदीविरोधक होते. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकार पुन्हा पुलवामासारखा हल्ला घडवून आणू शकते असा इशारा तेव्हा ते देत होते. राम मंदिर आणि इतर मुद्द्यांवरून धार्मिक भावना भडकावून लोकांना मूर्ख बनवले जात आहे असे त्यावेळी त्यांचे मत होते. आता त्याच ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे, मदरसे असे प्रश्‍न हाती घेतले आहेत. भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर मनसैनिक हनुमान चालिसाचा गजर करतील असा इशारा त्यांनी गुढीपाडव्याला झालेल्या शिवाजी पार्कवरच्या सभेत दिला. याचा अर्थ पुढचे काही दिवस रस्त्यांवर आणि टीव्हीच्या पडद्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांचा धुमाकूळ पाहायला लागण्याची शक्यता आहे. अर्थातच यामागे राज यांचे बदललेले राजकारण आहे. 2019 च्या ऑगस्टमध्ये राज यांची ईडीमार्फत चौकशी झाली होती. त्यानंतर ते मोदींऐवजी राज्य सरकारवर टीका करू लागले. मध्यंतरी त्यांच्या व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यातून मनसे व भाजपची उघड युती झाली नसली तरी आता राज यांनी सरळ सरळ भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेतलेली दिसते. आगामी काळात मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजपने उत्तर प्रदेशनंतर आता मुंबईची निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची केली आहे. तिथे राज यांचा दारुगोळा शिवसेनेला खिंडार पाडायला मदत करू शकेल. पण राज यांच्यासारख्या तरुणांचा पाठिंबा असलेल्या नेत्याने स्वतःचा असा वापर होऊ देणे हे दुर्दैवी आहे. यातून मनसेला खरंच काही लाभ होईल का हे मनसैनिकांचा खराखुरा कानोसा घेतला तर राज यांना कळू शकेल. आज कोरोनाने अर्थव्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. महागाई व बेकारी वाढली आहे. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर रोज वाढत आहेत. लोक बोलत नसले तरी त्यांच्यात अस्वस्थता आहे. राज या विषयांवर चकार शब्दही बोललेले नाहीत. उलट लोकांमधील अशांततेला भलतंच वळण लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ही त्यांची वाटचाल त्यांच्या मूळ शिवसैनिक पिंडाशी सुसंगत आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी जे पुरोगामीपणाचे वळण घेतले तो भासच होता हे आता उघडे पडले आहे. हा चुकला फकीर आता पुन्हा मशिदीत दाखल झाला आहे हे त्यांना उचलून धरलेल्या मिडिया व काही बुध्दिमंतांच्या लक्षात आले असेल. खरे तर, मशिदीच्या भोंग्यांचा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम सरकारने का सोडवला नाही किंवा देशातील इतर भाजप-शासित राज्यांनी तरी त्यावर का इलाज केलेला नाही असा प्रश्‍न या मिडियाने राज यांना आता विचारायला हवा. बदमाष लोक संकटात आले की अखेरचा सहारा म्हणून देशभक्तीचा आश्रय घेतात अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. त्याच धर्तीवर आपल्याकडे धर्म आणि धार्मिक भावना यांचा जो आश्रय घेतला जातो तो आता धोकादायक पातळीच्या पलिकडे जाऊन पोचला आहे. अलिकडेच कर्नाटकात मुस्लिम व्यापार्‍यांवर बहिष्कार घालण्याचे फर्मान काही हिंदू संघटनांनी काढले. तेथील भाजप सरकारने याबाबत बोटचेपी भूमिका घेतली. उत्तर प्रदेश आणि त्यापूर्वी पश्‍चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांविरोधात वातावरण निर्माण होईल अशी भाषा अगदी मोदींपासून सर्व नेत्यांनी सर्रास केली. यामुळे समाजात केवढी मोठी दरी निर्माण होते आहे याची चिंता त्यांना दिसली नाही. महाराष्ट्रातील पालिका वगैरे निवडणुकांमध्येही हेच घडणार आहे. राज यांचे वक्तव्य ही त्याची सुरुवात म्हणायला हवी. सध्या हिंदुत्वाची भूमिका काहीशी बाजूला ठेवलेल्या शिवसेनेला व तिच्या समर्थकांना डिवचण्याचाही हा प्रकार आहे. अशा मुद्द्यांवर सेनेला कैचीत पकडून भाजपला व मनसेला थोडाफार तात्कालिक लाभ होईलही कदाचित. पण त्यातून महाराष्ट्राचे दूरगामी मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. महाराष्ट्राने 1992 चे भीषण जातीय दंगे व त्यानंतर कितीतरी वर्षे सातत्याने झालेले बॉम्बस्फोट सहन केले आहेत. सध्याच्या अस्वस्थतेला काडी लावणे म्हणजे पुन्हा असल्याच प्रकारांकडे राज्याला ढकलणे आहे.  

Exit mobile version