शहनाई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं जे नातं होतं तेच संतूर आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचं होतं. शहनाई किंवा सनई हे देवळांमध्ये किंवा मंगल प्रसंगी ठराविक (एकसूरी) रीतीने वाजवायचे वाद्य अशी ओळख होती. बिस्मिल्ला खान यांनी ती पुसून टाकून शास्त्रीय संगीताच्या दरबारात तिला प्रमुख मानकर्यांमध्ये आणून बसवले. रागदारीतले सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे, स्वरांची खुलावट, लालित्यपूर्ण विस्तार सनईमध्ये करता येऊ शकते हे खानसाहेबांनी दाखवून दिले. अगदी तीच गोष्ट शिवकुमारांनी संतूर या वाद्यांसंदर्भात केली. सतार आणि नंतर सरोद या तंतुवाद्यांमध्ये स्वरांची खोली व्यक्त करण्याची अंगभूत ताकद आहे. त्यांचं एकल वादन होऊ शकतं व त्यांच्यावर रागदारी सादर करता येऊ शकते याला आधीपासून मान्यता होती. संतूरचं मात्र असं नव्हतं. ज्या जम्मू-काश्मीरमध्ये शर्मा जन्माला आले व वाढले तिथे सूफी पंथीयांच्या संगीतात गायकांच्या साथीला वाजवलं जाणारं वाद्य (जशी आपल्याकडे एकतारी आहे) एवढीच त्याची ओळख होती. हा अपरिचय इतका होता की, 1955 मध्ये पहिल्यांदा व्ही. शांतारामांनी शिवकुमारांना झनक झनक पायल बाजेसाठी वादन करायला बोलावले तेव्हा या वाद्यातलं मला काही ठाऊक नाही असं म्हणून संगीतकार वसंत देसाईंनी तुमचा संगीत-तुकडा तुम्हीच तयार करा असं यांना सांगितलं. शिवकुमार यांचे वडील उमादत्त शर्मा हे बनारस घराण्याचे फार नामांकित गवय्ये होते. त्यांनी आपल्या मुलाला पाचव्या वर्षापासून गायन आणि तबलाच शिकवला होता. वडिलांनीच संतूर त्यांच्या हाती ठेवली व पहिले धडे दिले. संतूर हे शततंत्री वीणा म्हणून पूर्वी प्रसिध्द होतं. पण त्यातून निघणारे सूर हे प्राजक्ताच्या फुलांसारखेच नाजूक होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं धीरगंभीर वजन ते पेलू शकतील की नाही याविषयी अनेकांना शंका होती. एखाद्या शांत तलावात पाण्याचे थेंब पडल्यावर त्यातून जशी वर्तुळे निर्माण होत जातात तशी स्वरांची वर्तुळे उलगडत नेण्याचं सामर्थ्य सरोद किंवा सतार यांच्या झंकारांमध्ये आहे. संतूरकडे असा दीर्घ दमसास आहे काय किंवा तिच्यातून स्वरांची दीर्घ काळ रेंगाळणारी मींड व लड निघू शकेल काय याविषयी भल्याभल्यांना शंका होती. पण प्रतिभेच्याही दुप्पट अशी अफाट मेहनत करण्याची क्षमता असलेल्या शिवकुमारांनी या सर्व शंका खोडून काढल्या. वडिलांनी दाखवलेला विश्वास मुलाने सार्थ ठरवला आणि त्यांनी कल्पनाही केलेली नसेल अशा उंचीला हे वाद्य नेऊन ठेवलं. शिवकुमारांकडे दुर्मीळ अशी प्रतिभा होतीच. वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून ते तबला वादनाचे कार्यक्रम करत होते. सतराव्या वर्षी जेव्हा त्यांनी बड्या संगीत महोत्सवात संतूर वादन केलं तेव्हा बडे गुलाम अलींपासून ते अतिशय दिग्गज गायक व वादक त्यांच्या समोर होते. ती मैफिल त्यांनी गाजवली. पण म्हणून ते आयुष्यभर ठराविक राग गिरवत राहिले नाहीत. संतूर एकाच वेळी प्रभावी आणि लोकप्रिय होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आपल्या वाद्यामध्ये अनेक प्रयोग आणि बदल केले. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या असंख्य शिष्यांच्या द्वारा संतूरची परंपरा दीर्घकाळ सतेज राहील याचीही तरतूद केली. पंडितजींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी पाश्चात्य वा फिल्मी संगीत किंवा त्यातले फ्यूजनसारखे आधुनिक प्रयोग यांना कधीही नाक मुरडलं नाही. उलट आपलंसं केलं. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व संगीतकारांसाठी त्यांनी उदंड वादन केले. आधीच्या पिढीसोबत जीवन की बगिया महकेगी (तेरे मेरे सपने) किंवा जिंदगी के सफर मे गुजर जाते है (आपकी कसम) यासारख्या गाण्यांमधील संतूरच्या तुकड्यांमधून नातं जोडलं. नंतर तर संगीतकार म्हणून पुढच्या पिढीच्या दिलांच्या तारा त्यांनी छेडल्या. हरिप्रसाद चौरासियांसोबत शिव-हरी म्हणून संगीत दिलेले सिलसिला, चांदनी, लम्हे हे आजच्या तरुणांनाही ठाऊक असतात. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं शस्त्र विकसित केलं म्हणून त्यांना जगभर वंदन केलं जातं. असं शून्यातून काहीतरी चिरस्थायी निर्माण करता येणं हे महान व्यक्त्तित्वाचं लक्षण असतं. पंडितजी हे त्याच परंपरेतलं व्यक्तित्त्व होतं. त्यांना नम्र श्रद्धांजली.
संतूर स्तब्ध झाली

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026