संकट आणि दिलासा

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेचा फटका आपल्याला जास्त जाणवल्यामुळे अनेक संशोधक व अनेक तज्ज्ञ कोरोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते, असे भाकित करीत आहेत. ती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शिखराला पोचेल असे म्हटले जात असून विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरीयंट मुळे ही लाट येण्याची शक्यता अधिक दाट होत चालली आहे. त्याच्या भीतीमुळेच त्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी राज्य सरकारने आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा रुग्णशैय्या उपलब्धीचे प्रमाण कितीही असले तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका क्षेत्रांना पुढील आदेश येईपर्यंत तिसर्‍या गटाच्या वरच टाकलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती आता सुरू असलेल्या दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार, असा निष्कर्ष नुकत्याच केलेल्या अभ्यासातून काढला आहे. त्यामुळे नागरिकांना या लवकरच येणार्‍या तिसर्‍या लाटेच्या भीतीपासून थोडा दिलासा मिळणार असे वाटते. अर्थात सर्वांना अपेक्षित लसीकरणाच्या वेगवान अंमलबजावणीमुळेदेखील हे भविष्यातील संकट रोखण्यात यश मिळू शकते असाही दिलासा देण्यात आला आहे. या अभ्यासात तिसर्‍या लाटेत या सातत्याने रूप पालटणार्‍या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याची शिफारस असल्याने संकट पूर्णत: दूर झालेले नाही, असाही त्याचा अर्थ आहे. यात जोखमीच्या कोणकोणत्या गोष्टींची शक्यता आहे यावर चर्चा सुरू आहे. त्याचा गोषवारा असा की जर महाराष्ट्रात संपूर्णत: निर्बंध उठवले गेले तर सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या पन्नास लाख लोकांपर्यंत जाऊ शकते. त्यापैकी दहा टक्के रुग्ण लहान मुले असू शकतात. म्हणजे पाच लाख मुलांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. परंतु आधी तज्ज्ञ लाट कशाला म्हणतात हे आधी लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे दररोज रुग्णसंख्या वाढत राहिली तर ती लाट आहे असे मानले जाते. त्याचा सर्वात उच्चतम बिंदू कोणता आणि तो कधीपर्यंत येऊ शकेल याचे काही गणिती आराखडे मांडले जात असतात. त्यानुसार देशामध्ये जर तिसरी लाट आली तर ती दुसर्‍याला लाटेपेक्षा सौम्य असेल. दुसर्‍या लाटेत सर्वोच्च रुग्णदर दिवशी चार लाख रुग्णांचा होता. या तिसर्‍या लाटेत हे प्रमाण साधारणत: दोन लाखाच्या घरात असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, तिसरी लाट येण्याबद्दलही अनेकांच्या शंका आहेत. याचे कारण पहिल्या लाटेने व आता सुरू असलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये अनेक जण या आजाराप्रती प्रतिकारशक्ती निर्माण करू शकलेले आहेत. ज्याला समूह प्रतिकार शक्ती म्हणतो, ती विकसित झालेली असणार. त्याचबरोबर लसीकरण आधीच सुरू झालेले असल्यामुळे रुग्ण आढळत राहिले तरी लाट येईल का याबद्दल शंका आहेत. कारण सगळेजण सावधगिरी म्हणून लॉकडाऊन उठविण्याची कोणतीही घाई करत नाहीत. त्याचबरोबर अजून एका मुद्द्याकडे वैद्यकीय शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणजे लाट ही आता काही चिंतेची बाब नाही, तर या विषाणूला वेगळे रूप धारण करण्यासाठी मिळणारा वाव ही चिंतेची बाब असणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने डेल्टा प्लस जातीच्या रुपाची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात त्याचा पहिला रुग्ण रत्नागिरीमध्ये दगावला आहे. देशातील ज्येष्ठ विषाणुतज्ज्ञ आणि लस अभ्यासक डॉक्टर गगनदीप कांग यांनी तिसर्‍या लाटेबद्दल महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या मते, तिसरी लाट विषाणूबद्दल नसून मानवी स्वभावाबद्दल असेल. कारण अजून काही प्रकारचे अभ्यास बाकी आहेत. उदा. ज्यांचे लसीकरण झालेले आहे, त्यांच्या रक्त तपासण्या होऊन या नवीन जातीला प्रतिकार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाले की नाही हे समजले पाहिजे. जर विषाणूच्या या नव्या अवताराला लसीतून मिळणार्‍या संरक्षणातून मार्ग काढता येत असेल तर मग ती आपल्यासाठी चिंतेची बाब ठरू शकते. डेल्टा प्लस ही नवीन साथ बनेल का, हे सांगण्याएवढी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या म्हणण्याचा मुद्दा असा की विषाणूची ताकद त्याच्या पसरण्याच्या आणि साथीमध्ये रूपांतर होण्यामध्ये आहे. ते होऊ द्यायचे की नाही हे सर्वस्वी मानवी व्यवहारावर स्वभावावर, म्हणजेच अंतिमत: आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे.

Exit mobile version