तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावर कोणती गाणी आहेत ते सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो, अशा आशयाचे एक वचन आहे. त्या धर्तीवर देशातील मिडिया आणि समाजामध्ये काय चर्चा चालू आहे ते सांगा, त्या देशाचे भविष्य सांगतो असे कोणी म्हणू लागला तर ते आपल्यासाठी फारसे आशादायक नसेल. कारण, गेल्या दोन-पाच वर्षांमध्ये आपल्याकडच्या सर्वाधिक चर्चा या हिंदू-मुस्लिम, देवी-देवतांचे वा महापुरुषांचे मानापमान अशांभोवतीच अधिक फिरताना दिसतात. 15 ते 35 वयोगटातील तरुणांची संख्या मोठी असलेल्या जगातील काही थोड्या देशांमध्ये भारत एक आहे. पंधरा ते वीस कोटी लोकसंख्येच्या मध्यमवर्गाची हुकुमी बाजारपेठ आपल्यापाशी आहे. आयटीसारख्या तंत्रज्ञान वापरू शकणार्यांची मोठी फौज आहे. अशा स्थितीत खरे तर तरुणांची स्वप्ने, आशाआकांक्षा, नवनवीन कल्पना, त्यातील अडचणी हे आपल्या समाजातले चर्चेचे, बोलण्याचे विषय असायला हवेत. दुसर्या बाजूला, शिक्षणातून गळती होणार्यांचं प्रचंड प्रमाण, कमालीची गरिबी आणि वाढती बेकारी हेदेखील या देशाचे वास्तव आहे. ऐंशी कोटी लोकसंख्येला सरकारतर्फे गेले कित्येक महिने जवळपास फुकट धान्यवाटप चालू आहे. देशातील लोकांचा असंतोष त्यामुळेच दबून आहे की काय अशी अनेकांना शंका आहे. कालपरवा घरगुती गॅसच्या किमती आणखी वाढल्या आणि ग्रामीण बेरोजगारीमध्ये जून महिन्यात उच्चांकी वाढ झाल्याचा अहवाल सीएमआयई या संस्थेने दिला. या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा विचार करणारे अनेक लोक आहेत. समाजात चर्चा आणि बोलणे यावरही व्हायला हवे. पण हे विषय बाजूला पडतात किंवा पाडले जातात. महत्वाचे ठरतात ते समाजाच्या धार्मिक अभिमानाचे विषय. हे आधी कोणी सुरू केले आणि कोणी कोणाला प्रत्युत्तर दिले याचा विचार करणेही निरर्थक आहे. महंमद पैगंबर यांच्याविषयी भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा वाद इतका धुमसत राहतो की, त्यातून खून पडतात. दुसरीकडे याचा सूड म्हणून की काय अनेक गोष्टी केल्या जातात. चार वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्विटवरून महंमद झुबेर या पत्रकाराला तुरुंगात टाकले जाते. कर्नाटकामध्ये एका नाटकामध्ये मुस्लिम कलाकारांची संख्या जास्त असल्याचे कारण देऊन बजरंग दलातर्फे त्याचा प्रयोग बंद पाडला जातो. आणखी कोणत्या तरी ठिकाणी हिंदू देवतांची चित्रे असलेल्या वर्तमानपत्राच्या कागदात मांस गुंडाळून दिल्यामुळे धर्माचा अपमान झाल्याचा गुन्हा दाखल होतो. लोक दिवसचे दिवस याच गोष्टींवर हिरीरीने चर्चा करतात. अनेक सुबुध्द तरुणांना यातच डुंबून राहणे आवडते. पैगंबराच्या अवमाननेबाबत अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचा खून करण्याचा आरोप असलेले मुस्लिम तरुण हे अतिशय शिक्षित व सुस्थित गटातील आहेत. कर्नाटकातील बजरंग दलाचे कार्यकर्तेही चांगले शिकलेले आहेत. या तरुणांना आपापल्या समाजाच्या अशाच थरांमधून सुप्त पाठिंबाही मिळत असतो. माणसे एरवी चोर्या, लांड्यालबाड्या, फसवाफसवी किंवा भ्रष्टाचार करतात. तरीही त्यातून त्यांच्या धर्मांचा किंवा त्या त्या धर्मातील वंदनीय व्यक्तींनी दिलेल्या शिकवणुकीचा अपमान होतो असे त्यांना वाटत नाही. मात्र दुसरा कोणीतरी काहीतरी बोलला म्हणून मात्र लगेच यांचा मानभंग होतो. एरवी माणसे देवाच्या मंडपात दारू पितात, जुगार खेळतात, अचकट-विचकट नाचतात, महिलांचा अनादर करतात. पण यातून धर्माचा अपमान होतो असे कोणालाही वाटत नाही. हीच माणसे नेहमी चवीचवीने जे मांस खातात ते बांधून मिळालेल्या रद्दी पेपरमध्ये देवाचा फोटो होता या कारणावरून त्याचा अपमान झाल्याचे ठरवून टाकतात. एकविसाव्या शतकातल्या प्रगतीशील म्हणवल्या जाणार्या देशात हे सर्व घडू दिले जाते. याला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी खरे तर राजकीय पक्षांची आणि सत्तेत असलेल्यांची असते. धर्माचा दुराभिमान ही एक पोकळ गोष्ट असल्याचे या पक्षांनी व विविध सरकारांनी लोकांना सांगायला हवे. पण उलट हेच पक्ष या लोकांना उत्तेजन देतात. आपल्या राजकारणासाठी फक्त सोईने एकाच बाजूने बोलतात. यात आपल्या तरुणांचे केवढे नुकसान होते आहे याची त्यांना पर्वा नाही. या तरुणांच्या ओठावर खेळवली जाणारी ही पोकळ अभिमानाची गाणी नाहीशी होण्यासाठी आम जनतेनेच आता आवाज वाढवायला हवा.
ओठावरली गाणी…

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026