देशातील राजकारणावर आज भारतीय जनता पक्षाची जबरदस्त पकड आहे. तो स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. देशात भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असे वातावरण आहे. बर्याच वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली तरच भाजप-विरोधासाठी डुगडुगतं का होईना पण एक व्यासपीठ कसंबसं तयार होऊ शकेल, हे खरंच आहे. ही स्थिती कधी तरी बदलेल का अशी शंका अनेकांना येते. भाजपवाले तर पुढची पन्नास वर्षे आपणच राज्य करणार अशा डरकाळ्या फोडत असतात. पण भारतासारख्या विशाल देशाचं राजकारण कधीही प्रदीर्घ काळ स्थिर राहू शकत नाही. प्रचंड विषमता, जातिव्यवस्था, उत्तर-दक्षिण भेद असे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळे हे राजकारण नुसतेच प्रवाही नाही तर कमालीची उलटसुलट वळणे घेत असते. सोमवारी ज्यांचं निधन झालं त्या मुलायमसिंग यादव यांच्या राजकारणाचा प्रवास म्हणजे राजकारणाच्या प्रवाहीपणाचे साक्षात उदाहरण म्हणायला हवे. मुलायमसिंग हे मुळात राममनोहर लोहिया यांचे चेले. लोहिया हे समाजवादी. कट्टर नेहर-विरोधक. नेहरू आणि काँग्रेस यांनी देशाची किती हानी केली आहे यावर लोहिया मुद्देसूद मांडणी करीत. काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी इतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असे ते म्हणत. मुलायम, राजनारायण, जॉर्ज फर्नांडिस हे सर्व लोहियांच्या मुशीत तयार झाले. त्यामुळे काँग्रेसला विरोध या सर्वांच्या रक्तात होता. 1990 नंतर काँग्रेस क्रमाक्रमाने विघटित होत गेली. त्यातूनच जनता पक्ष आकाराला आला. तिने भाजप वगळता सर्व पक्षांशी कधी ना कधी तडजोडी केल्या. दुसरीकडे बिगर-काँग्रेसवाद्यांचीही भूमिका बदलत गेली. चरणसिंग यांनी तर 1979 मध्ये तर चंद्रशेखर यांनी 1991 मध्ये पंतप्रधान होण्यासाठी अनुक्रमे इंदिरा आणि राजीव गांधींचा पाठिंबा घेतला. 1996 नंतर जी बहुपक्षीय सरकारे आली त्यात मुलायम, शरद यादव इत्यादी लोक काँग्रेससोबतच्या आघाडीत दिसू लागले. 1999मध्ये मुलायम यांचा पाठिंबा गृहित धरून सोनिया गांधी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. पण मुलायम यांनी त्यांना तोंडघशी पाडले. पण लगेचच दोन वर्षांनी बिगर-भाजप आघाडीच्या सोनियांनी बोलावलेल्या सभेत ते सामील होतानाही दिसले. 2004 च्या निवडणुकांनंतर त्यांनी मनमोहनसिंगांना पाठिंबा दिला. नंतर अणुकराराच्या मुद्द्यावर डाव्यांनी पाठिंबा काढून घेतल्यावर मुलायम यांच्या बळावरच काँग्रेसचे सरकार टिकले. पुढे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि काँग्रेस यांनी विधानसभेला एकदा युती करून निवडणुका लढवल्या. मुद्दा असा की, मुलायम यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात टोकाच्या काँग्रेसविरोधापासून झाली तरी काळाच्या ओघात त्या भूमिकेत त्यांनी बदल केला. एकेकाळी ते आणि त्यांचा समाजवादी पक्ष कट्टर हिंदीवादी व इंग्रजीचे विरोधी होते. पण अखिलेश यादवांच्या काळात ते सर्व बदलले. धर्माचं राजकारण करीत असल्याने भाजपला विरोध ही मुलायम यांची भूमिका अखेरपर्यंत कायम राहिली. त्यांचे व्याही लालूप्रसाद यादव यांनी तर थेट लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा अडवली होती व त्यांच्या पक्षाने आजतागायत कधीही भाजपला मदत होईल अशी कृती केलेली नाही. मुलायम हे इतके ठाम नव्हते. मात्र तरीही त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते एकेकाळी मुल्ला मुलायम म्हणत असत. मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना अयोध्येत बेकायदा जमाव करणार्या आणि हिंसाचाराचा प्रयत्न करणार्या कारसेवकांवर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात काही जणांचे बळी गेले. त्यातून भाजपवाल्यांनी त्यांचा राजकीय धर्मबदल केला. त्यांच्या मृत्यूनंतरही सोशल मिडियातून भाजपच्या अनेक आमदार व नेत्यांनी त्यांना शिव्या घातल्या. पण ज्या कल्याणसिंहांच्या कारकीर्दीत बाबरी मशीद पाडली गेली त्यांनी भाजप सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांना खासदार म्हणून निवडून येण्यासाठी मुलायम यांचीच मदत झाली होती. काल मुलायम यांच्या मृत्यूनंतर सर्वात बोलकी प्रतिक्रिया मुरलीमनोहर जोशी यांची होती. देशात लोकशाही टिकण्यासाठी सर्व पक्षांमध्ये मुलायम यांच्यासारख्या समर्थ नेत्यांची आज अत्यंत गरज आहे असे ते म्हणाले. एका मार्गदर्शक नेत्याचे हे बोल राजकारणातील आगामी बदलांची शक्यता दाखवणारे म्हणायला हवेत.
मुलायम आणि बदल

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026