साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सलग दुसर्यांदा मराठवाड्याकडे गेला आहे. गेल्या वर्षी माजी सनदी अधिकारी असलेले भारत सासणे यांच्याकडे अध्यक्षपद होते. कथाकार म्हणून त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आता माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची वर्धा इथं होणार्या 96 व्या साहित्य संमेलनासाठी निवड झाली आहे. चपळगावकर यांनी तरुणपणाच्या काळात काही कविता वा कथा लिहिल्या होत्या. ललित साहित्याच्या अंगाने त्यांनी काही व्यक्तिरेखाही रेखाटल्या आहेत. मात्र त्यांची खरी ओळख ही त्यांनी निर्माण केलेल्या वैचारिक साहित्यामुळे आहे. काही काळ ते मराठीचे प्राध्यापकही होते आणि त्यांना साहित्यिक होण्याचं आकर्षण होतं. तसंच राजकीय क्षेत्रात वावरावं असंही वाटत होतं. पण चरितार्थ करणंही आवश्यक होतं. त्यामुळे आपण वकिली व न्यायक्षेत्राचा रस्ता निवडला असं त्यांनी एके ठिकाणी आठवणींमध्ये म्हटलेलं आहे. पण तो रस्ता चुकला नाही. उलट तिकडून फिरून त्यांना तो साहित्य संमेलनाच्या प्रांगणात सन्मानाने घेऊन येत आहे. हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील नेते गोविंदभाई श्रॉफ, संपादक अनंत भालेराव इत्यादींशी न्यायमूर्तींचा घनिष्ट संपर्क होता. दैनिक मराठवाडा या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग होता. यातूनच त्यांनी रामानंद तीर्थ, भालेराव इत्यादींची चरित्रे लिहिली आणि या लढ्याचाही इतिहास लिहिला. अलिकडच्या काळात ब्रिटीश आल्यानंतरच्या महाराष्ट्रातील प्रबोधनकाळातील नेत्यांवर त्यांनी साक्षेपी लेखन केले आहे. त्यातील न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग इत्यादींवरच्या लेखनातून नेमस्त म्हणवल्या जाणार्या राजकारणाने ब्रिटीशविरोधी स्वातंत्र्यलढ्यात किती महत्त्वाची भूमिका बजावली हे स्पष्टपणे अधोरेखित होते. नामदार गोखले यांच्या भारत सेवक समाजावरही त्यांनी विस्ताराने लिहिलं आहे. गांधी-नेहरुंची चरित्रं सार्वजनिक जीवनातून उखडून टाकण्याच्या सध्याच्या काळात त्यांनी या दोघांवर लिहिलेली अलिकडची दोन पुस्तकं तर अतिशय महत्वाची आहेत. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महात्मा गांधींच्या कल्पनांचं आणि राजकारणाचं कसं योगदान राहिलेलं आहे हे त्यांनी साधार दाखवलं आहे. तर पंडित नेहरूंच्या चरित्राचा त्यांनी नव्याने घेतलेला शोध मराठी वैचारिक प्रांतात मोलाची भर घालणारा आहे. आधीच न्यायमूर्ती व त्यातही वैचारिक लिखाण करणारे यामुळे ललित साहित्याशी त्यांचा संबंध कितपत असेल अशी शंका काहींना येऊ शकेल. पण चपळगावकर यांनी हैदराबाद संस्थानातील विविध माणसांवर लिहिलेल्या व्यक्तिरेखा, न्यायाच्या गोष्टी या नावाने न्यायदान करताना आलेल्या अनुभवांवर आधारित कथा आणि तुमच्या माझ्या मनातलं यासारखे ललित लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचा दीर्घ काळ संबंध होता. सध्या ते कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. शुध्द ललित, कथात्म किंवा संज्ञाप्रवाही लेखन हे एकेकाळी साहित्यात मानाचं स्थान पटकावून होते. पण काळाच्या ओघात सामाजिक विचार आणि त्याबाबतच्या चर्चा यांनी साहित्य, नाटक, चित्रपट या सर्वांमध्ये प्रवेश केला आहे. मराठी समाजाला तर चर्चा आणि वाद यांचे आकर्षणच आहे. या पाश्वर्र्भूमीवर चपळगावकर यांची निवड ही रास्तच म्हणावी लागेल. यापूर्वी य.दि. फडके किंवा सदानंद मोरे यांच्यासारखे इतिहाससंशोधक आणि रा.ग. जाधव यांच्यासारखे वैचारिक लेखक यांनी हे पद भूषवलेले आहे. त्याच क्रमाचा पुढचा भाग म्हणून ही निवड मानावी लागेल. महाराष्ट्राचे सुदैव असे की सेक्यूलर आणि समतोल विचार मांडणारे तसेच गांधी-नेहरू इत्यादींच्या स्वातंत्र्यलढ्याचा योग्य तो आदर बाळगणारे असे अनेक व्यासंगी लेखक मराठीत अजूनही आहेत. शिवाय त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान दिला जाऊ शकतो. देशातील अत्यंत विद्वेषपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठाच दिलासा आहे. हा वारसा टिकवून ठेवण्यात मराठी जनांना जे यश आले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. साहित्य महामंडळालाही याबाबत धन्यवाद द्यायला हवेत. या अधिवेशनासाठी लेखक-संपादक सुरेश द्वादशीवार यांचे नाव विदर्भातून आले होते, पण शिंदे-फडणवीस सरकारातील कोणा नेत्याने तो प्रस्ताव हाणून पाडला अशी चर्चा आहे. ती खरी मानली तरीही द्वादशीवारांना पर्याय म्हणून चपळगावकर यांचे नाव मान्य करावे लागणे हेही दिलासा देणारे आहे. न्यायमूर्तींचे अध्यक्षीय भाषण विचारप्रवर्तक ठरावे या शुभेच्छा.