राजीव गांधी हत्या कटातील सहाही दोषी आरोपी आता तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला. यापूर्वी याच प्रकरणातील पेरारीवलन या आरोपीची सुटका झाल्यानंतर अन्य सहा आरोपींच्या तुरुंगमुक्तीचा मार्ग मोकळा झाला. राजीव गांधी यांची हत्या तमिळनाडूतील पेरांबदूर येथे ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता झाली होती. धनू नावाच्या मुलीने कमरेला बाँब बांधल्या स्थितीत राजीव यांना फुलांचा हार घालण्याचे नाटक केले व नंतर स्फोट घडवला. त्यात ती स्वतः ठार झालीच पण राजीव यांच्यासह अन्य काही जणही मारले गेले वा जखमी झाले. श्रीलंकेत एलटीटीईशी लढण्यासाठी भारतीय सैन्य पाठवण्यात आल्याच्या रागातून तमीळ अतिरेकी संघटनेने ही हत्या घडवून आणली. हत्येमागचे खरे धागेदोरे उलगडले का याविषयी शंकाच आहे. कारण, हत्या झाली तेव्हा राजीव सत्तेत नव्हते आणि श्रीलंकेतील कारवाई होऊन तीन वर्षे लोटली होती. श्रीलंकन तमीळ अतिरेक्यांनी त्यांच्या भारतातील सहानुभूतीदार कुटुंबियांच्या मदतीने हा प्रकार घडवून आणला. यातील 26 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यापैकी बहुसंख्य भारतातील तमीळ होते. नलिनी ही त्यातील प्रमुख. मानवी बाँब झालेली धनू या नलिनीच्या घरीच राहिली होती. नलिनीनेच तिला त्या दिवसासाठी एक पोषाख घेऊन दिला होता आणि तीच तिला राजीव गांधी यांच्या सभेसाठी घेऊन गेली होती. प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी उपस्थित राहून ती पाहणारी एकमेव व्यक्ती नलिनी हीच होती. बाकी शिक्षा झालेल्यांवर कटाला मदत केल्याचा आरोप होता. ते प्रत्यक्ष हत्येत किंवा कट रचण्यात सहभागी नव्हते. मात्र कटवाल्यांना त्यांची सहानुभूती नक्कीच होती. या सर्व आरोपींना एकाएकी तुरुंगातून सोडले गेलेले नाही. यातील नलिनीसह बहुतांश आरोपी हे भारतातील असल्याने ते अजाणता या प्रकरणात ओढले गेले अशी एक सार्वत्रिक भावना तमिळनाडूमध्ये तयार झाली. त्याच दरम्यान सोनिया गांधी यांनी नलिनीला देहान्ताची शिक्षा दिली जाऊ नये असे आवाहन केले. तमिळनाडू मंत्रिमंडळाने तसा ठराव केला. त्यानुसार एप्रिल 2000 मध्ये राज्यपालांनी आपल्या अधिकारात तिची शिक्षा कमी करून आजन्म कारावासाची केली. इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रपतींकडे याबाबत अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये पेरारीवलन, मुरुगन व इतरांना फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. तमीळ अतिरेकी संघटना श्रीलंकेत तमीळ वंशियांचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करू मागत होती. त्यामुळेच तिला तमिळनाडूमधूनही पाठिंबा होता. संघटनेचा लोकशाहीवर विश्वास नव्हता. तिने आपल्या विरोधकांची श्रीलंकेत व अन्यत्र अत्यंत क्रूर हत्याकांडे केली. यात श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती प्रेमदास यांच्यासह कित्येक मंत्री, पत्रकार, विचारवंत इत्यादींचा समावेश होता. अशा संघटनेच्या कटवाल्यांना वा सहानुभूतीदारांना लोकशाही प्रक्रियेचा व न्यायालयाच्या सहृदयपणाचा फायदा दिला जावा का हा कळीचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर देणे सोपे नाही. तमीळ अतिरेक्यांची संघटना आता जवळपास नामशेष झाल्यात जमा आहे. श्रीलंकेच्या सैन्याने तिच्याविरुध्द तितकीच क्रूर कारवाई केल्यामुळे ते शक्य झाले. त्यापूर्वी लोकशाही मार्गाने या फुटिरतावाद्यांशी संवादाचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले होते. आज श्रीलंकेची हालत अतिशय वाईट असताना हा प्रश्न पुन्हा डोके वर काढणारच नाही याची हमी नाही. आरोपींना खरोखरचा पश्चात्ताप झाला आहे का हेही कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच आरोपींना सोडावे की न सोडावे हा पेच होता. पण शेवटी, आपली लोकशाही व्यवस्था आणि उच्च मूल्य मानणारी न्याययंत्रणा यांनी तो सोडवला. गांधी परिवाराने या आरोपींबाबत दाखवलेली उदारता हीदेखील असाधारण स्वरुपाची म्हणायला हवी. सोनियांनी नलिनीला फाशी देऊ नये असे आवाहन केले. तर प्रियांका गांधी यांनी नलिनीची तुरुंगात जाऊन भेट घेतली व तिच्या सुटकेची मागणी केली. सध्या आपल्याकडे सरकारवर साधी टीका केली तरीदेखील देशद्रोही ठरवून हल्ले केले जातात वा तुरुंगात धाडले जाते. त्या पार्श्वभूमीवर, अगदी लहान असताना आपल्या पित्याचा छिन्नविच्छिन्न देह पाहावा लागलेल्या मुलीचे हे कृत्य अलौकिकच म्हणावे लागेल.
सोडावे की न सोडावे

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026