अंधार दूर व्हावा

जीवन सुरळीत चालले आहे याची अनुभूती येण्यासाठी घरात वीज असावी लागते, इतके आपले आयुष्य विजेच्या असण्यावर अवलंबून आहे. घरातील अनेक उपकरणे विजेवर चालतात आणि ती नसली की ती कुचकामी ठरतात. काळोख पडल्यावर येणारा आंधळेपणा दिव्याच्या प्रकाशामुळे दूर होतो, त्यामुळे दिवा लागणे दिलासादायक असते. मात्र हीच वीज काही परिस्थितीमध्ये जीवघेणीही होऊ शकते. विशेषतः पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ती सगळा ओला परिसर आपल्या शक्तीने भारते आणि एरव्ही अत्यंत उपयुक्त असलेली हीच वीजशक्ती अत्यंत धोकादायक बनते. पावसाच्या मुसळधार धारांनी मानवी वस्तीभोवती पहारे उभी केल्यावर, ही पाण्याची तटबंदी विजेच्या संपर्कात येण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे ती खंडित करण्याचा निर्णय जिवीतहानी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. परंतु काही वेळा परिस्थिती अशी बनते की, इच्छेनुसार ती बंद करता येत नाही आणि गरज वाटेल तशी सुरूही करता येत नाही. रायगड, कोंकण भागांत गेली दोन वर्षे आलेल्या वादळाच्या काळात हे जसे दिसले तसेच सध्या पुराच्या वेढ्यात सापडलेल्या प्रदेशांच्या बाबतीत देखील दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात, 22 जुलैपासून रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांना महापुराचा जोरदार फटका बसला. अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेला पूर, तसेच काही ठिकाणी झालेले दरड कोसळण्याचे प्रकार यामुळे या तालुक्यांमधील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत झाला. महाड आणि पोलादपूर तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आणि तेथील वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. अर्थात, महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी अद्याप सुमारे दोनशेच्या आसपासच्या गावांतील जवळपास सत्तर हजार रहिवासी अजूनही अंधारात आहेत. अभूतपूर्व अतिवृष्टीतून आलेल्या महापुरामुळे महाड व पोलादपूर तालुक्यातील अडीचशेहून अधिक गावांतील ऐंशी हजारांहून अधिक जणांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. पूर ओसरल्यानंतर महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीचे काम हाती घेण्यात आले. राज्यातील विविध भागांतून वीजमंडळाने पथके बोलावली हे कौतुकास्पद आहे. परंतु पूर ओसरून काम सुरू होण्यात बराच काळ गेला. पूर आल्यानंतरही दोन दिवसांहून अधिक काळ पावसाचा जोर कायम राहिल्याने मदतकार्य आरंभण्यास विलंब झाला, हे देखील तितकेच खरे. राज्यातील मंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी सुरू झाल्यानंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही विजेची परिस्थिती पाहण्याच्या उद्देशाने या भागांचा दौरा केला होता. गम्मत म्हणजे शरद पवार यांनी दौर्‍यामुळे प्रशासनावर दबाव येऊन ते करत असलेल्या मदतकार्यात अडथळा निर्माण होत असल्याकारणाने दौरे टाळा असा सल्ला दिला, त्या दिवशी ऊर्जामंत्री डॉ. राऊत दौर्‍यावर होते. अर्थात येथील पूरपरिस्थिती अभूतपूर्व होती आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही मदतकार्यासाठी तसेच पूरग्रस्तांना उमेद देण्यासाठी देखील महत्त्वाची असल्याने त्यांनी त्याचाही आढावा घेतला हे बरे झाले. सौर दिव्यांनी वीज नसलेल्या भागांत प्रकाश निर्माण करण्याची त्यांनी घोषणाही केली. सौरऊर्जेकडे अनेक अर्थाने महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिला जात असला तरी निदान काही काळासाठी रायगड, कोंकण भागासाठी तो किती भरवशाचा पर्याय आहे हे तपासून पाहायला हवे. कारण तीन महिने तरी या भागांत भरपूर पाऊस पडतो आणि आकाशात सूर्याचे दर्शन घडत नाही. उर्वरीत आठ नऊ महिन्यांसाठी तो चांगलाच पर्याय आहे हे निश्‍चित. मात्र त्यातून केवळ घरात प्रकाश आणि रस्त्यावर प्रकाश निर्माण होतो. बाकी गोष्टींसाठी पारंपरिक विजेवरच अवलंबून राहावे लागते. छोटे मोठे उद्योग अद्याप पूर्णपणे सौरऊर्जा प्रणालीवर चालू शकत नाहीत. आता महाड तालुक्यातील दोन अतिउच्चदाब वाहिन्यांचे टॉवर पुरामुळे कोसळले. परिणामी चार उपकेंद्रांत बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीत प्रगती होत असली तरी टॉवर उभे राहीपर्यंत वेळ लागेल आणि त्याला कोणताही अन्य पर्याय नाही. सरकारी आकडेवारीनुसार या भागांत उच्चदाब असलेले 88 खांब उखडले गेले होते, त्यातील 20 खांब पुन्हा उभारण्यात आले आहेत. या विजेवर स्थानिक रुग्णालये आणि आता कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणाची प्रक्रिया या सगळ्यांवरच त्याचा परिणाम झालेला आहे. विजेची दुखणी अनेक आहेत आणि त्याच्या पुनर्उभारणीसाठी लागणारा निधीही प्रचंड आहे. मात्र सातत्याने या पायाभूत सुविधेकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यातूनही हा पुरामुळे निर्माण झालेला अंधार दूर व्हायला वेळ लागत आहे.

Exit mobile version