हवामान बदलाच्या चर्चा उंची हॉटेलांमधून नेहमी होत असतात. त्यासाठी जागतिक परिषदा भरवून मोठमोठे वायदे आणि ठराव केले जातात. मात्र या बदलाचा सर्वाधिक फटका ज्याला बसतो त्या शेतकर्यांचा यात क्वचितच सहभाग असतो. भारतातील बहुसंख्य शेती हवामानावर अवलंबून आहे. पाऊस, ऊन वा थंडी यात जराही बदल झाले तर त्यांचा शेतकर्यांना मोठा फटका बसतो. अलिकडे तर थोड्या वेळात ढगफुटीसारखा पाऊस, बाराही महिने पडणारा पाऊस, पावसामुळे पळून जाणारी थंडी, नंतर येणार्या तिच्या लाटा, समुद्री भागातदेखील 40 अंश सेल्सिअसच्या वर जाणारे उष्णतामान असे हवामान गेल्या काही वर्षांपासून आपण सर्व जण पाहत आहोत. गेल्या वर्षी अतिपावसामुळे विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनची नासाडी झाली. आता कोकणातील आंब्याची पाळी आहे. यंदा पावसाळा लांबल्याने अपेक्षित थंडी पडली नाही. सर्वत्रच ती उशिरा सुरू झाली त्यामुळे कोकणाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा मोहोर कमी किंवा उशिरा आला आहे. अनेक ठिकाणी तुडतुडे किंवा अन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्याही तक्रारी आहेत. याच दरम्यान हापूसची पहिली पेटी मुंबईत रवाना अशा बातम्या येत असतात. देवगडहून असा आंबा गेल्या महिन्यात गेला. त्याला चार ते पाच हजार रुपये डझन असा भाव मिळाला. गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्यातील काही बागायतदारांच्या हापूस व केशरच्या पहिल्या बारा पेट्याही वाशी बाजारात पाठवल्या गेल्या. पण हे अपवाद आहेत. रत्नागिरीच्या बागायतदारांच्या अंदाजानुसार पहिल्या टप्प्यात यंदा अपेक्षेच्या जेमतेम दहा टक्केच पीक हाती येणार आहे. खरा हंगाम मार्च नव्हे तर एप्रिलमध्येच सुरू होईल. बराचसा आंबा मे महिन्यातच बाजारात येईल आणि त्यामुळे दर पडतील. अर्थात तसे पाहायला गेल्यास ही दरवर्षीचीच स्थिती झाली आहे. थंडीच्या चढउतारामुळे अपेक्षित वेळेत मोहोर न येणे, एकदा गळून जाऊन पुन्हा मोहोर येणे हे वारंवार घडू लागले असून तो टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. याबाबतची पीक विमा योजनाही निरुपयोगी आहे. शिवाय विविध विभागांसाठी विविध हप्ते वगैरेंसारख्या त्याच्या अटी त्रासदायक आहेत. आंबा बागायतदार याबाबत आवाज उठवत असतात. रत्नागिरीत 26 जानेवारीला धरणे आंदोलनाचा कार्यक्रम होता. रायगडमधील शेतकर्यांचे मेळावे वा मागण्या नियमितरीत्या चालू असतात. पण त्याचा म्हणावा तसा असर झालेला नाही. यातच गेल्या काही वर्षांपासून लवकर येणार्या कर्नाटक आंब्याच्या स्पर्धेने आपले शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिसायला हापूससारखाच असला तरी त्याची चव अगदीच सामान्य असल्याचा अनुभव आहे. मात्र तो हंगामात आधी व तुलनेने स्वस्तात उपलब्ध होत असल्याने कोकणातील शेतकर्यांना फटका बसतो आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य कृषी पणन थेट आंबा विक्रीची जी सोय केली असून त्यासाठीची नोंदणी सध्या चालू आहे. तिचा लाभ शेतकर्यांनी घ्यायला हवा.