भाजपचा एअरो शो 

बंगळुरुमध्ये अलिकडेच एअरो शो पार पडला. देशोदेशींच्या विमान कंपन्या त्यात सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने विमानांच्या चित्तथरारक कसरती झाल्या. देशात आणि महाराष्ट्रात भाजपचाही असाच एअरो शो चालू आहे. सत्तेची उंचच उंच उड्डाणे आणि कसरती त्यात पाहायला मिळत आहेत. देशातील 140 कोटी लोक भाजपच्या कसरतींवर खूष आहेत, असा पंतप्रधानांचा दावा आहेच. त्यामुळे तो खरा असला पाहिजे. दहा दिवसांपूर्वी नाशिकमध्ये राज्य भाजपची बैठक झाली. त्यात राज्यातत दोनशे आणि लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा दौरा झाला. लोकसभेच्या सर्व म्हणजे 48 जागा जिंकणार असं त्यांनी जाहीर केलं. तसं झालं तर गेल्या साठ वर्षांमध्ये नेहरू-गांधी आणि काँग्रेसला न जमलेला विक्रम भाजपच्या नावावर जमा होईल. इंडिया टुडेतर्फे अलिकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मात्र वेगळेच होते. महाविकास आघाडी एकत्र लढली तर तिला 48 पैकी 34 जागा मिळतील असे त्यात म्हटले होते. अलिकडेच अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आरंभी भाजप अतिशय त्वेषाने उतरला होता. सेनेचे निवडणूक चिन्ह काढून घेण्यासाठी त्याने आकांडतांडव केलं. सेनेच्या उमेवाराला अर्ज दाखलच करता येऊ नये असा प्रयत्न झाला. नंतर वातावरण आपल्या विरोधात आहे असं लक्षात येताच माघार घेतली. आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकही पक्षाला जड जाते आहे. अन्यथा, नाकातोंडात नळ्या असलेल्या गिरीश बापटांना प्रचारात आणण्याची गरज पडली नसती. चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबात उमेदवारी आहे तर कसब्यात टिळकांच्या कुटुंबियांना का नाही असा प्रश्‍न उघडपणे विचारला जातो आहे. हा असंतोष पुण्यापुरता मर्यादित राहणारा नाही. पहाटेच्या शपथविधीपासून ते एकनाथ शिंदे यांना फोडण्यापर्यंत जे उपद्व्याप केले गेले त्यावर खुद्द भाजपचेच मतदार नाराज आहेत. मोदींपासून ते खालपर्यंत सर्व नेते मोठमोठी भाषणे करतात, पण प्रत्यक्षात काही मिळत नाही असाही एक असंतोष सर्वत्र आहे. महागाई, बेकारी आणि सरकारी धोरणे याबाबत व्यापक नाराजी आहे. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून अमरावती विधानपरिषदेत भाजपचा झालेला पराभव हे त्याचेच उदाहरण आहे. अलिकडे अदानी प्रकरणावरून नरेंद्र मोदी यांनी काही न बोलणे आणि भाजपने हात झटकण्याचा प्रयत्न करणे हेदेखील कोणालाही पटलेले नाही. देशातील तमिळनाडू, केरळ, आंध्र, तेलंगणा, ओरिसा, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपला लोकसभेत फार मजल मारता येईल अशी लक्षणे नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपने गेल्या वर्षी मोठे यश मिळवले तरी विरोधी समाजवादी पक्षानेही चांगली लढत दिली होती. त्यामुळे इतर राज्यांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडून अर्धे काम झाले आहे. उरलेले अर्धे पूर्ण करण्याची तयारी चालू आहे. पण भाजपने कितीही आतषबाजी केली तरी त्याला महाराष्ट्र भुलेल असे नव्हे. शिवसेनेच्या फुटीची प्रतिक्रिया झेलणे भाजपला सोपे जाणार नाही.

Exit mobile version