तोतयांचे सूत्रधार कोण?

1971 मधील नगरवाला प्रकरण आता खूपच कमी लोकांना आठवत असेल. नवी दिल्लीतील संसद मार्गावरच्या स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाला एक फोन आला. त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आवाजात एका व्यक्तीने साठ लाख रुपये तयार ठेवण्यासाठी सांगितले. कोणतीही लिखापढी न करता इतकी रोख रक्कम दिली जाणे हा सर्वच व्यवहार संशयास्पद होता. पुढे चौकशी चालू असतानाच नगरवालाचा गूढरीत्या मृत्यू झाला. या प्रकरणामागे नक्की कोण होते हे कधीच बाहेर आले नाही. याची आता आठवण होण्याचे कारण म्हणजे सध्या दिल्लीत व मुंबईत एक तोतया आणि भामट्यांची गाजत असलेली प्रकरणे. पहिले किरण पटेल याचे आहे. पंतप्रधान कार्यालयात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून त्याने काश्मीरमध्ये एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा भेटी दिल्या. राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज घ्यायला पंतप्रधानांनी मला सांगितले आहे किंवा काश्मीरमधील सफरचंदांच्या मळ्यांचा विकास करण्याची योजना आखायची आहे किंवा हॉटेल व्यवसायाला कशी चालना देता येतील याचा अभ्यास चालू आहे असे दावे तो करीत असे. कामाच्या निमित्ताने तो काश्मीरभर सर्वत्र फिरला, त्याचे फोटो व व्हिडिओ वेळोवेळी त्याने आपल्या सोशल मिडिया खात्यांवर टाकले. तो अगदी थेट सीमारेषेवरच्या गावांमध्येदेखील गेला. कहर म्हणजे त्याला या सर्व काळात झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. देशात केवळ चाळीस लोकांना अशी सुरक्षा पुरवली जाते. थेट गृह मंत्रालयाकडून याबाबतचे आदेश येत असतात. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अतिमहत्वाची सुरक्षा काढून घेतल्याने मध्यंतरी बराच विवाद झाला होता. अशा स्थितीत एका तोतया इसमाला ज्या रीतीने अशी सुरक्षा पुरवली गेली तो सर्वच प्रकार संशयास्पद आहे. किरण पटेल तिसर्‍या भेटीवर असताना स्थानिक पोलिसांना संशय आला व त्यांनी जाळे टाकून त्याला अटक केली.
गृह मंत्रालयाचे अपयश
या सर्व प्रकरणात अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे सरकार कडेकोट गुप्तता आणि शिस्त पाळणारे म्हणून ओळखले जाते. सरकारी कार्यालयांमध्ये वार्ताहरांनादेखील सहजासहजी प्रवेश आणि माहिती मिळत नाही. दिल्लीमध्ये अगदी वरिष्ठ पत्रकारांना मिळणारी अधिस्वीकृती काढून घेण्यात आली आहे. असे असताना एक इसम पंतप्रधानांच्या कार्यालयाचे नाव घेऊन काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील विभागात इतके दिवस खुलेआम फिरू शकतो हे अविश्‍वसनीय आहे. 370 वे कलम रद्द झाल्यानंतर सध्या हा विभाग थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. मुलकीच नव्हे तर अतिवरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांचा वावर इथे असतो. सामान्य काश्मिरी नागरिकाला बाहेर पडल्यानंतर दहा वेळा ओळखपत्र दाखवावे लागते. या पाश्‍वर्र्भूमीवर, किरण पटेलने निव्वळ बोलबच्चनगिरी करून वरिष्ठ मुलकी व पोलिसी अधिकार्‍यांच्या समवेत इतका काळ काढावा हा प्रकारच अद्भूत आहे. यामुळे अनेक तर्कवितर्कांना वाव मिळतो. पटेलला वरिष्ठ वर्तुळात वावरण्याचा त्याला सराव असावा आणि त्यातील कमकुवत दुव्यांचीही त्याला कल्पना असावी. पटेल प्रकरण थोडक्यात निभावले हे सुदैव. पण पटेलचा एखादा भाईबंद या वर्तुळात घुसून सहज मोठा घातपात घडवू शकतो, हेच या प्रकारावरून दिसून येते. इतक्या प्रकारचे दहशतवादी हल्ले आणि अतिरेकी कारवाया झेलल्यानंतरही आपली सरकारी व पोलिसी यंत्रणा काही शिकलेली नाही असेही म्हणता येईल. पटेल हा मूळचा बडोदा, गुजरातचा आहे. त्यामुळे सध्या सरकारी गडकोटांचे दरवाजे गुजरात असा मंत्र म्हटल्यानंतर आपोआप उघडतात की काय अशी शंका येते. तसे असेल तर ते भयंकर धोकादायक आहे. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे वेषांतर करून बराच काळ कसे पाकिस्तानात जाऊन राहिले होते याच्या खर्‍याखोट्या बर्‍याच कहाण्या सांगितल्या जात असतात. त्यांच्या नाकाखाली एक तोतया इसम भारतीय सरकारी यंत्रणेला इतक्या किरकोळीत उल्लू बनवत असेल तर डोवाल यांचा पराक्रम काही फार मोठा नाही असे कोणाला वाटू शकेल.
थेट फडणवीसांच्या घरात
पटेलने आर्थिक फसवणूक केल्याचे अजून तरी उघड झालेले नाही. त्यामुळे असे फिरण्यामागे त्याचा नक्की काय हेतू होता हे सर्व भारतीयांना समजायला हवे. ते करताना सरकारी यंत्रणेतील भोके उघडी झाली तरी हरकत नाही. पण कोणत्याही स्थितीत हे प्रकरण गुप्ततेच्या नावाखाली दडपले जाता कामा नये. दुसरे प्रकरण मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या घरात घडले आहे. अनिल जयसिंघानी नावाचा एक कथित सट्टेबाज आणि त्याची मुलगी अनिक्शा यांची ही भानगड आहे. अनिलच्या नावावर अनेक राज्यात जुने गुन्हे आहेत. ते रद्द करण्यासाठी अनिक्शाने देवेंद्रांची पत्नी अमृता यांना लाच देऊ केली असा आरोप आहे. आता अनिक्शा व अनिल या दोहोंनाही अटक करण्यात आली असली तरी यातही अनेक बाबी गूढ आहेत. अनिक्शाविरुद्ध अमृता यांनी वीस फेब्रुवारीला पोलिसांत तक्रार  केली. मात्र जवळपास महिनाभरानंतर इंडियन एक्स्र्पेसने बातमी दिली तेव्हा ही माहिती उघड झाली व अनिक्शाला अटक झाली. इतक्या दिवसात पोलिसांनी का कारवाई केली नव्हती हे मोठे कोडे आहे. अनिक्शाने अमृता यांना डिझायनर कपडे वा किमती दागिने अशा भेटी दिल्या होत्या. वडिलांची व जिची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशा व्यक्ती इतक्या सहज फडणवीसांच्या घरी पोचू शकत असतील व पत्नीशी सलगी जमवू शकत असतील तर ते आश्‍चर्यकारक व धोकादायक आहे. आता जयसिंगांनींनी अमृता यांना ब्लॅकमेल करून दहा कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा लावण्यात आला आहे. फडणवीस हे गृहमंत्रीदेखील आहेत. त्यांना हे गुन्हे घडल्याचे आधीच ठाऊक होते. असे असूनही इतके दिवस कारवाई का रोखण्यात आली आणि नंतर हळूहळू एकेक आरोप का वाढवण्यात आले याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. विरोधकांचा कट वगैरे आरोप करून राजकीय फाटे फोडण्याने काही साधणारे नाही.

Exit mobile version