मुठ्ठी में दुनिया

भारतात इंटरनेटचा प्रसार झपाट्याने वाढतोय ही शिळी बातमी झाली. पण 2021 च्या मानाने एका वर्षात म्हणजे 2022 मध्ये देशाच्या ग्रामीण भागातील इंटरनेटचा वापर तब्बल 40 टक्क्यांनी वाढला आहे ही मात्र मोठी व ताजी बातमी आहे. निल्सन या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या इंडिया इंटरनेट रिपोर्ट 2023 मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यातही ग्रामीण महिलांमधील इंटरनेटचा वापर 35 टक्क्यांनी वाढला आहे. अपेक्षेनुसार हा वापर मुख्यतः माहिती आणि मनोरंजन यांच्यासाठी होतो आहे. पण विशेष लक्षणीय बाब अशी की, यातले किमान पन्नास टक्के लोक डिजिटल पेमेंटसाठी याचा वापर करत असावेत. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटचे व्यवहार तब्बल 43 टक्क्यांनी वाढले आहेत. आजकाल अगदी खेड्यापाड्यातील पानटपर्‍या किंवा भाजीवाले हेदेखील जीपे वा फोनपे सारख्या सुविधा देऊ करतात आणि ग्राहकांनाही सुट्ट्या पैशांच्या झंझटीपेक्षा असे पैसे देणे सोपे पडते. त्याचेच प्रतिबिंब या आकडेवारीत पडलेले दिसत आहे. एकीकडे जनधन खात्यात किमान रक्कम ठेवणेदेखील बहुसंख्यांना परवडत नाही हे आपण पाहिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही आकडेवारी उल्लेखनीय आहे. कारण, बँक खात्यात पैसे असतील असेच लोक अशी साधने वापरू शकतील हे उघड आहे. ग्रामीण भागात एकच मोबाईल अनेकांनी वापरण्याची पद्धतही यातून उघड झाली आहे. त्यानुसार सुमारे साडेआठ कोटी मोबाईल असे आहेत की जे अनेक जण वापरतात. जाहिरात क्षेत्रासाठी हा तपशील अत्यंत महत्वाचा आहे. एकेकाळी घरात एक वृत्तपत्र अनेक जण वाचत. भाषिक वृत्तपत्राच्या एका प्रतिमागे किमान पाच जण आणि इंग्रजी वृत्तपत्राच्या एका प्रतिमागे किमान दोन किंवा तीन वाचक असतात असे गृहित धरलेले असे. टीव्हीची प्रेक्षकसंख्याही अशीच काढली जात असे. मोबाईल आल्यानंतर मात्र हे गणित बदलले. मोबाईल हा मुख्यतः प्रगत देशात आणि नंतर आपल्याकडे शहरांमध्ये आला. नंतरच्या टप्प्यात हरेक व्यक्तीकडे स्वतंत्र मोबाईल असण्याचा काळ आला. त्यामुळे एका मोबाईलमागे एक ग्राहक आहे असे आतापर्यंत गृहित धरले जात असे. पण भारतातील ग्रामीण भागातील मोबाईल आणि इंटरनेटच्या प्रसाराने या शहरी तर्काला पुन्हा एकवार चकवले आहे. आपल्याकडे एकाच मोबाईलवर अनेकांनी सिनेमा, गाणी किंवा बातम्या पाहणे घडते. त्यामुळे एका मोबाईलमागे अनेक ग्राहक असू शकतात ही जाणीव जाहिरातदारांना होईल. वृत्तपत्रांच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे आता देशातील सुमारे चाळीस ते पन्नास टक्के लोक हे मोबाईलवर वृत्तपत्रे वाचू लागल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे यात तरुणच नव्हे तर चाळीस वर्षांच्या वरच्या ग्राहकांचाही मोठा समावेश आहे. उत्तरोत्तर ही संख्या वाढत जाईल अशीच चिन्हे आहेत. देशात आजमितीला 72 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यातील सुमारे 42 कोटी ग्रामीण भारतातील आहेत. लवकरच शंभर टक्के भारत इंटरनेटच्या कह्यात येईल असे दिसते.  

Exit mobile version