लोककारणाचे यश

रोज नवनवीन विशेषणे लावून आपल्या विरोधकांवर टीका करणे आणि त्यांनी केलेल्या टीकेला जबाब देणे असे सध्याच्या राज्याच्या राजकारणाचे स्वरुप झाले आहे. एकीकडे जनता महागाई, बेकारी, अवकाळी पाऊस अशासारख्या समस्यांना तोंड देत असताना राजकारणी नेते मात्र आपल्याच शाब्दिक तलवारबाजीत मग्न असल्याचे दुर्दैवी चित्र पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्राला पाहावे लागत आहे. अर्थात, याला छेद देऊन लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवर शांतपणे काम करणारे नेते व पक्ष आहेतच. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळावे हा असाच उपक्रम आहे. महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अशा तीन मेळाव्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. तो पाहता सत्तेच्या भोवती फिरणारे आणि वृत्तवाहिन्यांवर तिन्हीत्रिकाळ दिसणारे राजकारण जनतेच्या खर्‍या प्रश्‍नांपासून किती दूर गेलेले आहे याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही. अलिबाग, मुरुड आणि रोह्यात झालेल्या या तीन मेळाव्यात एकूण दहा हजार 578 युवकांनी नोंदणी केली. त्यापैकी तब्बल चार हजार 578 जणांना थेट नोकर्‍या मिळाल्या. नोकर्‍या देणारे आणि नोकर्‍या हवी असणारे यांची सांगड घालून देण्याचे हे काम झाले नसते तर चार हजारांवर तरुण आणखी किती काळ बेकारीत भटकत राहिले असते हे सांगणे कठीण आहे. या तरुणांव्यतिरिक्त इतरही अनेकांना संधीचे नवे दरवाजे लवकरच खुले होतील यात शंका नाही. रायगड जिल्ह्यातच नव्हे तर एकूणच ग्रामीण भागांमधील तरुणांमध्ये शिक्षण, कौशल्य यांची कमी नाही. त्यांच्यात प्रामाणिकपणा व कष्टाळूपणा आहे. काही वेळेला त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव असू शकतो. या मेळाव्यांच्या निमित्ताने कंपन्यांना नेमके काय हवे असते याचा अंदाज या तरुणांना आला असेल. त्यांच्या पुढच्या वाटचालीत तो उपयुक्त ठरेल. आज साधी कॉलेजची पदवी ही मोठी भरारी घेण्यासाठी पुरेशी नाही. मात्र तुमच्यात हुन्नर असेल तर याच पदवीच्या आधारे मोठ्या संधी देणार्‍या दालनांमध्ये तुमचा प्रवेश होऊ शकतो. तुमची कष्टाची व नवीन गोष्टी आत्मसात करण्याची तयारी किती आहे याआधारे तिथून तुम्ही झेप घेऊ शकता. रायगडातील अनेक तरुण-तरुणींनी आज देशा-परदेशात असे यश संपादन केले आहे. वेळोवेळी आम्ही त्याविषयीच्या बातम्या प्रसिध्द करीत असतोच. चांगले टॅलन्ट हे केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरातच मिळू शकते असा गैरसमज अनेकदा बड्या कंपन्यांच्या अधिकार्‍यांमध्ये असतो. अशा मेळाव्याच्या निमित्ताने तो दूर होऊ शकतो. या तीनही मेळाव्यांमध्ये अनेक छोट्या, मध्यम व मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या. त्यांना चांगले उमेदवार यातून मिळाले. यातून एक नवीन वाट तयार झाली आहे. तिच्यावरून बाकीचे तरुण चालू शकतील. देशातील बेकारीचे चित्र गंभीर आहे. एकेकाळी डावे पक्ष त्यांच्यासाठी मोर्चे काढत. गरज असेल तेव्हा शेकाप आजही अशी आंदोलने करतोच व करीत राहील. मात्र काळानुरुप वेगळे लोककारण करण्याचीही गरज आहे. या मेळाव्यांच्या निमित्ताने ते घडले हे अत्यंत महत्वाचे आहे.

Exit mobile version