‘केरला स्टोरी’चा बनाव

केरला स्टोरी नावाच्या चित्रपटाने सध्या वादळ उठवले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाच्या प्रचारात या चित्रपटाची तरफदारी केली. त्यामुळे भाजपला फायदा होण्यासाठीच तो काढण्यात आला असावा असा संशय निर्माण झाला आहे. केरळातील हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून मुस्लिम होण्यास भाग पाडले जाते व नंतर आयसिसच्या कारवायांमध्ये ओढले जाते असा या चित्रपटाचा कथाभाग आहे. आयसिस ही अत्यंत क्रूर व भयानक धर्मवेडी असलेल्यांची दहशतवादी संघटना आहे. मध्यंतरी आपल्याकडील ओलिस व्यक्तींचे डोके उडवतानाचे व्हिडिओ तिच्यातर्फे सर्रास प्रसारित केले जात असत. इराक, सीरीया इत्यादी भागांमध्ये काही काळ तिने बरेच बस्तान बसवले होते. मात्र तिच्या प्रचाराला भारतातील मुस्लिम तरूणदेखील फारसे बळी पडले नव्हते. अशा स्थितीत कित्येक हिंदू तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतर करून आयसिसमध्ये नेले जात आहे असे वातावरण या चित्रपटाने निर्माण केले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जाहिरातबाजी करताना 32 हजार तरुणींचे धर्मांतर झाल्याचा दावा दिग्दर्शकानं केला होता. यावर अर्थातच तीव्र प्रतिक्रिया उमटली. अशा तरुणी दाखवून दिल्या तर त्याला कोट्यवधी रुपयांचे बक्षिस दिले जाईल अशा घोषणा काही मुस्लिम संघटनांनी केली. पण प्रश्‍न त्या संघटनांपुरता नाही. असले भडक आणि समाजात विष पसरवणारे दावे पसरवणारे लोक हा सर्व समाजाचा प्रश्‍न आहे. सर्वांनी त्याचा जोरदार निषेध करायला हवा. ते सोडून पंतप्रधान मतांच्या फायद्यासाठी असल्या विखारी आणि प्रचारी चित्रपटाला उचलून धरतात हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य आहे. आयसिसने नायजेरिया आणि अन्य काही आफ्रिकी देशातील मुस्लिम महिलांना बंदिवान करून गुलाम म्हणून वापरल्याच्या अनेक कहाण्या यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याविरुध्द मोठी मोहिम राबवण्यात आली. त्यातूनच पुढे आयसिसचा बर्‍याच प्रमाणात खातमा झाला. केरला स्टोरीसारखे चित्रपट ही समग्र वस्तुस्थिती लोकांसमोर मांडत नाहीत. उलट हिंदू तरुणींची जबरदस्तीने धर्मांतरे होत असल्याच्या खोट्या समजाला आणि अफवांना बळ मिळेल अशा रीतीने काही चित्रण करतात. कलाकृती म्हणून हा चित्रपट परिणामकारक झाला असेलही. पण परिस्थितीचा एक तुकडा व तोही तोडफोड करून राजकीय हेतूने लोकांसमोर मांडणे याला चांगली कलाकृती म्हणता येत नाही. सेन्सॉरने संमती दिलेली असल्याने हा चित्रपट बंद पाडणे वा त्यावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाणे हे गैर आहे. मात्र हा चित्रपट म्हणजे जणू काही प्रातिनिधिक चित्र असून केरळात वा कर्नाटकात सर्रास हिंदू मुलींची धर्मांतरे चालू आहेत असा जो प्रचार भाजप आणि त्यांचे परिवारवाले या निमित्ताने करू पाहत आहेत तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. यापूर्वीही काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने हेच करण्यात आले. काश्मिरी पंडितांच्या दुःखांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाला. भाजपचे हे खोट्या प्रचाराचे राजकारण आणि सिनेमावाल्यांची त्याला मिळणारी साथ ही चिंताजनक गोष्ट आहे.     

Exit mobile version