पवारांचा धोबीघाट

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शक्तिप्रदर्शनांमध्ये परस्परांवर टीका करताना कोण कोणत्या थराला जाणार हेच सर्वात औत्सुक्याचे होते. त्यानुसार, अजितदादांनी इतक्या वर्षात आपल्यावर झालेला कथित अपमान आणि इतर गोष्टींबाबत साठलेली मळमळ बाहेर काढली. शरद पवार हे आपले दैवत व गुरु आहेत असे पुन्हा पुन्हा सांगत त्यांनी काकांची प्रतिमा छिन्नविच्छिन्न करण्याचा प्रयत्न केला. इतकी वर्षे दुटप्पी आणि निसरड्या भूमिका घेणे, सहकार्‍यांचा विश्‍वासघात करणे याबाबत पत्रकार व विरोधक शरद पवारांवर टीका करीत आले. अजिबात विश्‍वासार्ह नसलेले राजकारणी असे बिरुद त्यातूनच त्यांना चिकटले. आज, एकेकाळी त्यांचा वारसदार समजल्या जाणार्‍या, पुतण्यानेच त्याचे पुरावे दिले. भाजपसोबत युती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कशा बैठका झाल्या होत्या याची ठोस उदाहरणे सांगितली. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी आडून आडून बरेच वार केले. कालपर्यंत सावलीसारखे वावरणार्‍या या सहकार्‍यांचे हे आरोप खोडून काढणे शरद पवार यांना सोपे जाणार नाही. शरद पवार यांनी आपल्या मेळाव्यात अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेबाबत पूर्ण मौन पाळणे हे अनेक अर्थांनी सूचक होते. मात्र त्यांनी भुजबळांना मुख्य लक्ष्य बनवले. आपल्या गटात नेमके किती आमदार याचा त्यांनी कोणताही दावा केला नाही. शिवाय, उद्या कदाचित पक्षाचे चिन्हही गमवावे लागू शकते असे सूचित केले. एकूण आजच्या दोन्ही मेळाव्यांनंतर शरद पवार गटाची आगामी वाटचाल बरीच खडतर असेल, हे स्पष्ट झाले. 83 वर्षांच्या धुरंधर पवारांनी आपल्या भाषणाची अखेर, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे म्हणून करणे हे धीरोदात्त व त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे असले तरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे बजावणारेही होते.
गुगलीची परतफेड
बुधवारच्या शक्तिप्रदर्शनामध्ये अजितदादांचा गट भारी ठरणार हे गेल्या दोन दिवसांमध्ये स्पष्ट झालं होतंच. अजित पवार व सहकार्‍यांनी बाहेर कोणतीही चर्चा न करता थेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याअर्थी त्यांच्या मागे बहुसंख्य आमदार असल्याचा काही ना काही ठोस पुरावा असणार हे अपेक्षितच होते. आजतागायत ही संख्या नेमकी किती हे त्यांनी सांगितलेले नाही. मात्र संघटनेवरची त्यांची पकड आणि आता मिळालेली सत्ता लक्षात घेता आमदार त्यांच्या बाजूला झुकणार हे उघड होतं. तेच झालं आहे. शरद पवारांना सोडून भाजपशी जुळवून घेण्याचं समर्थन दादा गट कशा रीतीने करतो हाच कळीचा मुद्दा होता. उद्या महाराष्ट्रात लोकांपर्यंत जाताना आमदारांना व इतर कार्यकर्त्यांनाही याच प्रश्‍नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे दादांनी त्याचा निःसंदिग्ध खुलासा करणं अपेक्षित होतं व त्यांनीही ते जोरदारपणे केलं. शरद पवार यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात किती वेळा भूमिका बदलल्या याचा पाढा वाचला. पुलोद स्थापना, राजीव काँग्रेसमध्ये फेरप्रवेश, सोनियांच्या इटालियन असण्याचा मुद्दा करून राष्ट्रवादीची स्थापना इत्यादींची उदाहरणे देऊन त्यांनी पवार यांनी आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे धोरणे आखली व कार्यकर्ते त्यांच्यामागे जात राहिले असे सांगितले. 2004 च्या निवडणुकीत विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद न घेण्यात आपल्याला डावलण्याचा हेतूच होता असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला. भाजपसोबत जाण्यासाठी काकांनी 2017 व 2019 मध्ये तयारी केली होती आणि नंतर त्यांनी मला तोंडघशी पाडले असे दादांचे म्हणणे आहे. यासाठीच्या बैठका उद्योगपतींच्या मध्यस्थीने झाल्या होत्या हे सांगणे म्हणजे तर काकांना गर्भित इशाराच म्हणायला हवा. यामुळे आजवरच्या कुजबुजीला आता थेट प्रत्यक्षदर्शीचा दुजोरा मिळाला आहे. अलिकडेच पहाटेच्या शपथविधीचा वाद उफाळून आला होता. त्यावेळी आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांनी विकेट दिली होती अशी शेखी शरद पवार यांनी मिरवली होती. आज मोदी आणि शाह यांनी अजितदादांकरवी त्याची परतफेड केली आहे.
भाजपचाच फायदा
भाजपचे हिंदुत्व अधिकाधिक कडवे आणि मोदींचे सरकार अधिकाधिक हुकुमशाही होत चालले आहे. विरोधक व माध्यमे यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अशा पक्ष व राजवटीसोबत आपण का गेलो याचे जनतेला पटेल असे समर्थन देणे हे अजितदादा आणि मंडळींसोबतच मोठे आव्हान आहे. शरद पवार हे संख्येच्या व ताकदीच्या दृष्टीने दुबळे असले तरी या मुद्द्याच्या आधारे दादांच्या गटाविरुध्द रान उठवणार हे उघड आहे. शरद पवार यांची लोकप्रियता आणि राज्यातले सर्वसाधारण वातावरण लक्षात घेता दादांना हा मुद्दा जड जाईल हे नक्की. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी खुद्द शरद पवार हेच कसे भाजपसोबत जायला अनुकूल होते हे ते सांगणार हे तसे अपेक्षितच होते. या निमित्ताने पवारांची विश्‍वासार्हता नष्ट करणे व पवारांचा आपल्याला छुपा पाठिंबा आहे असे सूचित करणे असे दुहेरी डावपेच दादा गट खेळेल हे आज स्पष्ट झाले. पवारांना याचा अंदाज असेलच. कसलेल्या पहिलवानाप्रमाणे त्यांच्याकडे याला काहीतरी तोड असेलच. कदाचित पूर्वीच्या तपशीलात न जाता भाजपच्या हिंदुत्ववादावर अधिकाधिक प्रखर टीका करणे हे त्याचे उत्तर असू शकेल. आजच्या भाषणात त्यांनी तेच केले. शिवसेनेच्या व भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे असे ते म्हणाले. भाजपचा समाजात द्वेष पसरवण्याचा व दुही माजवण्याचा उद्योग याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. ती अधिक प्रखर होत जाईल असे दिसते. तसे झाले व लोकांनी ती उचलून धरली तर भूतकाळाला धरून केलेल्या दादांच्या वैयक्तिक आरोपांना फारसा अर्थ उरणार नाही. दादांनी काकांना आता निवृत्त व्हा असं थेट सांगणं हेही सर्वांना मानवेल असे नाही. आपल्यावर अन्याय झाला आहे असे म्हणण्याचा दादांना कितपत अधिकार आहे हाही प्रश्‍नच आहे. अंतिमतः, या भांडणातले तत्वाचे मुद्दे संपून हा पवारांच्या घरातला धोबीघाट झाला तर त्यात फक्त आणि फक्त भाजपचाच फायदा आहे.

Exit mobile version