म्हातारी मेल्याचे दुःख

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन-चार वर्षात अभूतपूर्व घटना घडल्या. कालपर्यंतचे शत्रू आज एकाएकी एका ताटात जेवू लागले. एकदा नव्हे अनेकदा, तसे पाहायला मिळाले. 2014 पर्यंत सेक्यूलर आणि धर्माच्या आधारे राजकारण करणारे असे दोन स्पष्ट गट होते. सर्व हिंदूंनी किंवा मुसलमानांनी एकत्र यावे असे आवाहन करणे पूर्वी घटनाविरोधी आणि विघातक मानले जात होते. त्याला प्रतिष्ठा नव्हती. भाजपवाल्यांना त्याची जाणीव होती. म्हणूनच, वाजपेयी सरकारने राममंदिराचा मुद्दा बाजूला ठेवला होता. मोदी सत्तेत आले. खाली डोके वर पाय अशी स्थिती झाली. पूर्वी जे जे त्याज्य होते ते ते शिरोधार्य झाले. पूर्वी नथूराम गोडसेचे नाव घ्यायलाही भाजपवाले घाबरत. आता त्याची मंदिरे बनू लागली. गोरक्षा करण्याच्या नावाखाली खून केले तरी ते माफ होऊ लागले. पूर्वी असे राजकारण करणार्‍या पक्षाला इतर पक्षांनी जवळ केले नसते. पण आता काँग्रेस, कम्युनिस्ट आणि इतर पक्ष सोडून तमाम इतर पक्षांनी भाजपला या ना त्या मार्गाने मदत केली आहे. यामुळे तत्व, ध्येय, तत्वावरची निष्ठा यांना काही महत्व आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बाकीच्यांचे सोडा. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहा. हा एक काँग्रेसी परंपरेतलाच सबगोलंकारी पक्ष आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव आहे. पण त्याचे अनेक कार्यकर्ते जुन्या मुशीतले आहेत. यशवंतराव चव्हाणांपासूनची सेक्यूलर परंपरा मानणारे आहेत. खुद्द शरद पवार यांच्या मातोश्री शेकापच्या सदस्या होत्या. अशा या पक्षाचे नेते आता भाजपशी संगत करून सत्तेच्या पंगतीला बसले आहेत. अशा वेळी आजवर एका विचाराने ज्यांनी राजकारण केले असेल त्यांचे काय झाले असेल? प्रत्यक्ष राजकारणात नसलेले पण ते जवळून पाहणारे अशांची संख्या आपल्याकडे खूप आहे. प्रत्यक्ष सदस्य नसले तरी एकेका पक्षाबाबत त्यांना आस्था असते.

तत्वाचा मुडदा

फुले-शाहू-आंबेडकरांमुळे महाराष्ट्रात विशिष्ट परंपरा तयार झाली आहे. डावे आणि आंबेडकरवादी सोडाच, पण काँग्रेसवाल्यांवरही या परंपरेचा आजवर दाब होता. आता मात्र वातावरण उलटे झाले आहे. सनातनी परंपरेचा उदोउदो चालू झाला आहे. आणि मुख्य धारेतले पक्षही याच्याशी जुळवून घेऊ लागले आहेत. या घटनांमुळे अत्यंत धोकादायक असे संदेश प्रसारित झाले आहेत. तत्व असे काही नसतेच, राजकारणात सत्ता महत्वाची असते हे सूत्र ठळक झाले आहे. सत्तेचे ओंगळवाणे खेळ पूर्वीही दिसले होते. पण त्यावेळी किमान जातीयवादी पक्षांना दूर ठेवले जात होते. आता कसलाच विधिनिषेध राहिलेला नाही. आज जे तरुण राजकारणाकडे पाहत असतील त्यांचा विचार करा. तत्वावर श्रध्दा ठेवणे मूर्खपणाचे आहे हेच त्याला रोज कानीकपाळी सांगणार्‍या या सर्व घटना आहेत. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो असे एरवी म्हटले जाते. भाजपच्या रुपाने काळ सोकावत चालला आहे हे खरेच आहे. पण इथे तत्वावरची श्रध्दारुपी म्हातारी मरणे हे अधिक दुःखदायक आहे. गुंडांच्या टोळ्यांची आपापल्या इलाख्यात दहशत असते. ज्या टोळीची दहशत जास्त तिची सत्ता अधिक हा साधा हिशेब असतो. राजकारण या पातळीला आणून बसणे हे धोकादायक आहे. आज भाजपच्या हिंदुत्वाची इतर सर्वांना दहशत वाटते. इतर सर्वच पक्ष हिंदुत्वाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात. अधिकाधिक देवळात जातात. परशुराम जयंती वगैरे पूर्वी कधी ऐकलेलेही नाहीत अशा दिवसांचे उत्सव साजरे करतात आणि त्यांच्या शुभेच्छा देऊ लागतात. देव, धर्म यांच्यापासून राजकारण बाजूला काढण्याच्या फुल्यांपासून सर्व महानुभावांच्या प्रयत्नांना आग लावली जाते. हाच भाजप सत्तेत येऊन माध्यमांची तोंडे बंद करतो. विरोधकांना इडीची भीती दाखवतो. विरोधी पक्षांनी याविरुध्द लढावे अशी लोकांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात तेच भाजपसोबत जाऊन त्याची सत्ता मजबूत करतात. शिवाय, तत्व नावाच्या गोष्टीचा मुडदा पाडतात.  

भाजपचे पाप

काही लोकांना वाटते की हे आधीपासूनच असे होते. ते काँग्रेसला शिव्या देतात. पण फरक लक्षात घ्यायला हवा. काँग्रेस हा एक सबगोलंकारी पक्ष होता. स्वातंत्र्यलढ्यात सर्व विचारांचे लोक या पक्षाच्या झेंड्याखाली एकवटले होते. पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधींकडे होते. गरीब आणि अस्पृश्यांच्या प्रश्‍नाबाबत गांधीजी प्रचंड जागरूक होते. त्यांच्यानंतरचे मोठे नेते पंडित नेहरू. त्यांच्यावर समाजवादाचा प्रभाव होता. त्यांच्यामुळे काँग्रेसी सत्तेला सदैव गरिबांचे भान राहिले. पुढे नेते भ्रष्टाचारी व अकार्यक्षम निघाले आणि काँग्रेसची कार्यक्रमपत्रिकाही बदलत गेली. काँग्रेसच्या मार्गाने कष्टकर्‍यांचे भले होणारे नाही असे मानणारे डावे पक्ष एकेकाळी प्रबळ होते. शेतकरी, कामकरी व दलित यांचा व्यापक विचार मांडणारा शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रात काँग्रेसला टक्कर देत होता. या पक्षांकडे ध्येयाने भारून गेलेले असंख्य नेते व कार्यकर्ते होते. त्यांनी सामान्य लोकांना आपल्याकडे खेचून घेतले. काँग्रेस हा त्यांचा तेव्हाचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता. पण त्या राजकारणात डाव्यांच्या ध्येयवादाबद्दल आदर होता. तो सरसकट चिरडला जात नव्हता. शेकाप व समाजवाद्यांचे अनेक नेते काँग्रेसमध्ये गेले. पण त्यातील अनेकांनी आपली तत्वे मरेपर्यंत सोडली नाहीत. शिवाय इडीला घाबरून काँग्रेसमध्ये गेले असा प्रकार कधी घडला नाही. विरोधी नेत्यांमधीलच नव्हे तर एकूणच राजकारणातल्या तत्व नावाच्या गोष्टीचा भाजपने आज खून चालवला आहे. खुद्द भाजपमध्येही वाजपेयींसारखे काही विशिष्ट मर्यादा मानणारे नेते-कार्यकर्ते होते. तेही सत्तेच्या हव्यासाखाली गाडले गेले आहेत. पण हे फार काळ टिकणार नाही. आज भाजपची चलती आहे. पण लवकरच त्याच पक्षात टोळीयुद्ध सुरू होईल. कारण, भाजपने शक्ती वाढवण्याच्या नादात सगळे सत्तातूर जमवून ठेवले आहेत. ते आज ना उद्या एकमेकांच्या जिवावर उठल्याखेरीज राहणार नाहीत. ते काय व्हायचे ते होवो. पण राजकारण पूर्णपणे नासवण्याच्या पापाने माखलेले हात भाजपला कधीच धुवून टाकता येणार नाहीत. 

Exit mobile version