ऑलिम्पिक विजयानंतर

टोकियो ऑलिम्पिक सरले आणि भारताने त्यात आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत एकंदर सात पदके पदरात पाडून घेतली. त्यामध्ये अर्थातच शेवटच्या टप्प्यात स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अ‍ॅथलेटिक्स मधील पहिल्याच वैयक्तिक सुवर्णपदकाने सर्वांवर कळस चढवला. या यशस्वी खेळाडूंचे कौतुक आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू आहे आणि कधी नव्हे इतका भारतीय समाज खेळाकडे यापुढच्यास यशाच्या अपेक्षेच्या भावनेने पाहत आहे. नऊ वर्षांपूर्वी आपण सात पदके जिंकली होती. बिंद्रा यांचे नेमबाजीतील सुवर्ण हे व्यक्तिगत पदक मिळवलेले होते. आताचे कौतुकही काही दिवसांनी ओसरेल आणि आपण याबाबतच्या एकंदर वास्तवाकडे नव्याने पाहणार का हा खरा प्रश्‍न आहे. त्यासंदर्भात दोन-तीन गोष्टी अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऑलिम्पिक ही जागतिक दर्जाची स्पर्धा आहे अन् त्याच्यात जगातले सगळे देश सामील होतात. त्यात व्यक्तिगत तसेच संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरीचा गौरव होतो. ऑलिम्पिक अवघ्या काही दिवसांचे असते आणि ते दर चार वर्षांनी एकदा भरत असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूला फार तर दोन किंवा अधिकाधिक तीन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येते. त्यानंतरचे त्याचे सगळे आयुष्य कसे जाते, हे पाहिले जात नाही. खेळाडूच्या आयुष्याच्या संदर्भात उमेदीचा काळ संपल्यानंतर काय, याला उत्तर नाही. म्हणूनच, इतक्या विशाल लोकसंख्येच्या देशात इतके कमी खेळाडू असण्याचे नेमके कारण काय यावर आपण एक समाज म्हणून कधी विचार करणार हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. समाजाचा मूलभूत घटक म्हणजे कुटुंब आहे. कुटुंबातील पालक आज आपल्या मुलांची खेळाकडे ओढ असल्यास त्यासाठी किती प्रोत्साहन देतात आणि त्यासाठी किती अनुकूल असतात हे पाहायला पाहिजे. त्यातून आपल्याला या देशातील कमी खेळाडू असण्याचे कारण लक्षात येईल. बहुतेकांना खेळाडू बनण्यापेक्षा एक चांगली नोकरी आणि कुटुंब आणि घर गाडी मिळवणे हेच यश वाटत असते आणि 99 टक्के लोकांचा कल हा त्याच दिशेने असल्याने त्या आपल्या मुलांनाही त्या दिशेनेच पाठवतात. अर्थात काही प्रमाणात अपवाद क्रिकेटचा आहे. कारण त्याच्यामध्ये असलेला गडगंज पैसा आणि प्रसिद्धीचे वलय त्यांना सातत्याने ते ज्या टीव्हीपुढे बसलेले असतात त्यातून दिसत असते. त्यामुळे आपले जे खेळाडू मोठी कामगिरी करतात त्यामागे त्यांचा व्यक्तिगत संघर्ष हा खूप मोठा असतो. उदा. आता महिला हॉकी संघाचे त्यांनी अखेरच्या टप्प्यापर्यंत ज्या पद्धतीने मुसंडी मारली त्याचे कौतुक होते. परंतु त्यांची व्यक्तिगत संघर्षाची कहाणी ऐकली तर डोळ्यात अश्रू येतील इतके ते भीषण आहे. त्याचबरोबर आपला समाज जाती व्यवस्थेनेही पोखरलेला असल्याने त्यामध्येही अनेक प्रकारचे संघर्ष त्यांच्या जीवनातील उमेदीचा काळ शोषतात. त्यातून खेळासाठीची उर्जा अन्यत्र खर्ची पडते. दुसरा मुद्दा म्हणजे या जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. ते खर्चिक प्रकरण असते. प्रशिक्षणापासून उपकरणापर्यंत व वैद्यकीय सहाय्यापासून त्यांच्या आहारापर्यंतच्या या अनेक बाबतीत महाग असते. आपला देश ज्या गरीब परिस्थितीत जगण्यासाठी झगडत आहे ते पाहता हा खर्च कोणाला उमजत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच सरकारी पातळीवर या खेळाच्या व्यवस्था ज्या सरकारी व्यवस्थापकीय रचनेत आणि राजकारणात गुरफटलेल्या असतात की सर्वात शेवटी खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष जाते. सर्वात दुःखद भाग म्हणजे ही परिस्थिती आपण एक प्रकारे मान्यच केलेलीअसते, त्यामुळे पराभूतपणा हा आधीपासूनच सोबत असतो. आपण एकंदर मुलांच्या शालेय अभ्यासक्रमाकडे पाहिल्यास त्याचा खेळाचा तास किती असतो आणि त्या तासात किती आणि कोणता खेळ खेळला जातो हे पाहिले तरी आपली स्थिती काय आहे हे लक्षात येते. मात्र या ऑलिम्पिकमध्ये काही आशादायक बदल दिसले आहेत. ते म्हणजे आपण योग्य प्रकारे सहाय्य केल्यास नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो असे नवीन पटनाईकसारख्या लोकांनी दाखवून दिले आहे. पुरेसा निधी आणि प्रोत्साहनासाठी पुरेशा व्यवस्था दिल्यास फरक पडतो, हे दिसले आहे. आपण एक समाज म्हणून त्यात व्यापक प्रमाणात सहभागी व्हावे लागेल. त्यानंतरच आपल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिस्थिती सुधारेल, बदलेल. अन्यथा हे कौतुक तात्पुरते ठरेल आणि आपण त्यापुढे फार मजल मारू शकणार नाही.

Exit mobile version