शेकापचे चिंतन

शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची दोन दिवसीय बैठक रविवारी सांगोल्यात संपन्न झाली. राज्यातील सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगारांसह बहुजन समाजाच्या हिताचा विचार करणारा पक्ष म्हणून आजही शेकापकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे. स्वाभाविकच आहे, कारण शेकापची निर्मिती ही संघर्षातूनच झाली आहे. हा संघर्ष सर्वसामान्यांच्या हितासाठीच होता. मग त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन राज्यकर्ते आणि प्रस्थापितांशी दोन हात करण्याची तयारीही शेकापने दाखविली. आजही अनेकदा असे संघर्षमय प्रसंग येतात त्यावेळी सर्वसामान्य जनतेचा तारणहार म्हणून शेकाप आघाडीवर असतो. पूर्वजांनी घालून दिलेला संघर्षाचा वसा आणि वारसा शेकापची आजची नवी पिढीही त्याच इर्षेने राज्यकर्त्यांशी आणि प्रस्थापितांशी दोन हात करताना दिसते आहे. सांगोला येथे दोन दिवसीय बैठकीत महाराष्ट्रातील युवापिढीतही शेकापचा पुरोगामी विचार रुजविण्याबरोबरच जनतेच्या मुलभूत प्रश्‍नांसाठी राज्यकर्त्यांसह प्रस्थापितांच्या विरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष कशाप्रकारे करावा हा विचार रुजविण्यात आला. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव देशमुख यांच्या मतदार संघातच ही बैठक आयोजित करुन शेकापने गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा आम्ही समर्थपणे चालविणार आहोत हे कृतीने दाखवून दिले. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यभरातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झालेले होते. मध्यवर्ती समितीत जुन्या सदस्यांसह नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश असल्याने बैठकीत विचारमंथन झालेे. याच बैठकीत आ. जयंत पाटील यांनी ज्यांना मते दिली त्यांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली असून राजकारणातून नेस्तनाबूत करुनच विजय मिळण्याची चीड मनात निर्माण झालेली आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दिसत असून, आपल्या सोबत जी गद्दारी झाली आहे त्याचा बदला घेणारच, असा आक्रमक इशाराही दिला. नव्या पिढीच्या वारसदार असलेल्या रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी याच बैठकीत सोशल मिडियाचे महत्त्व अधोरेखित करुन आजच्या घडीला सोशल मिडिया शेकापला किती उपयुक्त ठरु शकतो हे विविध उदाहरणावरुन दाखवून दिले. त्यांचा हा मुद्दा निश्‍चितच स्वागतार्ह असाच आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आहे त्याला सोशल मिडियाच मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला आहे. कारण नव्या पिढीपर्यंत आपले विचार रुजवायचे असतील तर सोशल मिडियासारखे प्रभावी साधन दुसरे नाही. त्यामुळे शेकापनेही अगदी गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत सोशल मिडिया पद निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. राजकारण करण्याबरोबरच समाजकारण करण्यात शेकापचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मग ते संकट कोणतेही असो. अगदी गेल्या दोन वर्षांपासून राज्याला कोरोना साथीने वेढले आहे. ती साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगार निर्माण झाले. त्यावेळी या बेरोजगारांसाठी शेकापने मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला आहे. ज्यांच्या घरातील चुली पेटत नव्हत्या अशा हजारो कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचे काम शेकापतर्फे राज्यभरात करण्यात आले आहे.कोकणात आलेले निसर्ग चक्रीवादळ असो वा जुलैमध्ये आलेला जलप्रलय. या नैसर्गिक आपत्तीतही शेकापने आपदग्रस्तांना सढळ हस्ते मदत पुरविली आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला पिण्याचे पाणी तसेच अन्नधान्य मिळवून देण्यातही शेकापने नेहमीच पुढाकार घेतला आहे. जनसेवा हीच ईश्‍वरसेवा हे ब्रीद उराशी बाळगून शेकाप नेहमीच जनतेच्या उपयोगी पडत आलेला आहे. पण हे करीत असताना त्याचा प्रसिद्धीसाठी शेकापने कधीही उपयोग केला नाही. अन्य राजकीय पक्ष कामापेक्षा प्रसिद्धीकडेच जास्त लक्ष देतात त्या तुलनेनेे शेकापचे कार्य हे प्रसिद्धीपासून दूर राहण्यासारखे असते. पण आता मात्र तसे करुन चालणार नाही. कारण आपण काय करतो हे जनतेला समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी साधन ठरणार आहे. भविष्यातील सर्वच घडामोडी या सोशल मिडियावरुनच चालणार असल्याने शेकापने आता त्याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे. याच बैठकीत शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची तातडीने नुकसान भरपाई द्या, वीज बिलात रास्त सवलत तसेच चित्रलेखा पाटील यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत मांडलेल्या ठरावाला एकमताने मंजूरी देण्यात आली. जनतेच्या प्रश्‍नांसाठी आंदोलनाची आखणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. मध्यवर्ती समितीची ही बैठक पक्ष वाढीसाठी निश्‍चितच उपयुक्तठरणार आहे. यामधूनच नवी पिढीही सजग होणार आहे हे नक्की.

Exit mobile version