खळखळणारा हास्यझरा

जीवनातील विसंगतीचे निरीक्षण लेखक करतो आणि त्यातून साहित्य जन्माला येते. पन्नास आणि साठच्या दशकातील गावजीवनात आढळणार्‍या भोळ्या भाबड्या, इरसाल तसेच विलक्षण माणसांच्या नमुन्यातील विसंगती हेरून त्यातून विनोदी साहित्य निर्माण करणारे ज्येष्ठ व प्रसिद्ध विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार यांचे निधन मराठी साहित्यात पोकळी निर्माण करणारे आहे. नवकथाकार उदयास यायच्या सुमारास, अद्याप शहरीकरणाचा प्रभाव न पडलेल्या किंवा त्याबद्दल कुतुहलपूर्वक आणि विलक्षण आकर्षण असलेल्या काळात दत्ताराम मारुती मिरासदार यांच्या कथा प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतरच्या चारहून अधिक दशकांत त्यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीमुळे तसेच त्या कथांचे उत्तम सादरीकरण त्यांनी केल्यामुळे वाचकांच्या मनात त्यांचे नाव कायमचे कोरले गेले. त्याबरोबर त्यांच्या कथा, कथेतील लोटपोट हसवणारे प्रसंग आणि आपल्या आसपास आढळणारी भोळी तसेच विक्षिप्त पात्रेही संस्मरणीय झाली आहेत. आजही त्यांच्या कथा ताज्या वाटतात त्याचे कारण तेच आहे. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आणि प्रभावी आहे. त्यात हलक्या फुलक्या विनोदापासून जुन्या काळचे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या उपहास आणि व्यक्रोक्तीपूर्व विनोदाचे नमुने सापडतात. त्यात सर्वांचे परिचित आणि लाडके पु.ल. देशपांडे, व.पु. काळे येतात तसेच त्या आधीचे कसदार विनोदी लेखन करणारे राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे आदी मंडळी येतात. त्यात मिरासदारांनी आपली निखळ विनोद आणि करमणूक करणार्‍या विनोदाची भर घातली. त्यांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा विशेष गाजल्या आणि अनेक कथा महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडपाठ झाल्या. 14 एप्रिल 1927 रोजी पंढरपुरात जन्मलेले मिरासदार सुरुवातीच्या काळात काही वर्षे पत्रकारितेत होते. त्यानंतर ते शिक्षणाच्या क्षेत्रात आले. आधी पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते आणि नंतर ते प्राध्यापक बनले. कथालेखन करत असताना त्यांनी अन्य दोन आघाडीचे कथाकार व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांच्या सोबतीने सत्तरच्या दशकापासून कथाकथन सुरू केले. या त्रयीने कथाकथनाची भुरळ अवघ्या महाराष्ट्राला घातली. माकडमेवा, गप्पागोष्टी, भोकरवाडीतील रसवंतीगृह, चकाट्या, गोष्टीची गोष्ट, भुताचा जन्म आणि इतर कथा भोकरवाडीच्या गोष्टी, माझ्या बापाची पेंड, गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. अंगत पंगत हा ललित लेखन संग्रह, मिरासदारी हा विनोदी लेख संग्रह, गाणारा मुलुख हे नाटक अशी त्यांची मोठी साहित्य संपदा आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील कादंबरी, विनोदी कथा, वगनाटय, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेख इत्यादी सर्व साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह त्यात भूमिकाही त्यांनी केली होती. या चित्रपटातील तसेच ठकास महाठक या चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती. लाडाची मैना हे त्यांनी लिहिलेले वगनाट्य. जावईबुवाच्या गोष्टी आणि गाणारा मुलुख ही पुस्तके त्यांनी लहान मुलांसाठी लिहिली. 1998 साली परळी-वैजनाथ इथे पार पडलेल्या 71 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. अलिकडे काही वर्षांपूर्वी त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. तसेच पु. ल. जीवनगौरव पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने अखेरचा श्‍वास घेतलेले मिरासदार आपल्या कथांमधून अमर झालेले आहेत. त्यांच्या कथनशैलीतून ते कायमचे स्मरणात राहतील. त्यांच्या साहित्यातून आढळणारी ग्रामीण तथा निमशहरी जीवनातील विसंगतीयुक्त तसेच विक्षिप्त आणि इरसाल पात्रे वाचकांना हसवत राहतील. जो श्रोत्यांना खळाळून हसायला लावणारा निखळ विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला, तो वाचकांना कायम हसवत राहील. मिरासदारांना कायम स्मरणात ठेवेल. इब्लीस असो वा बेरकी; वाह्यात असो वा भोळसट, ही सगळी पात्रे अस्सल आहेत. म्हणून ती कायम जिवंत राहतील. हा खळखळणारा हास्यझरा वाचकांच्या मनात कायम वाहात राहील. आयुष्यभर लेखनाचा आनंद आणि हसण्याचे निमित्त महाराष्ट्राला देणार्‍या द. मा. मिरासदार यांना विनम्र श्रद्धांजली!

Exit mobile version