पाऊस, वादळ आणि पाणी

यंदाच्या मान्सूनचा परतीचा पाऊस सुरू झाला असून तो दसर्‍याच्या आसपासपर्यंत असणार आहे. यंदाचा पावसाळा आधी तौक्ते आणि आता अजून ज्याचे पडसाद उमटत आहेत त्या गुलाब चक्रीवादळाने गाजले. या वादळांनी महाराष्ट्र राज्यात कधी नव्हे असे थैमान यंदा घातले. ते संपत नाही तोवर नवीन शाहीन या चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले. गुलाब चक्रीवादळाने ओडिशा आणि आंध्रप्रदेशात धडक दिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील वरील प्रदेशात उमटले. अवघ्या एका आठवड्यात आलेल्या या चक्रीवादळाचा परिणाम सुदैवाने भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण, भारतीय किनार्‍यापासून दूर गेले आहे. तथापि, भारत आणि शेजारच्या हिंदी महासागरातील देशांतील मच्छिमारांना शनिवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता व आधीच समुद्रात असलेल्यांना सुरक्षित भागात त्वरीत जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र या वादळाची दिशा ओमानच्या समुद्राकडे सरकत असल्याने आणि कालांतराने त्याची तीव्रता कमी होत जाणार असली तरी भारतीय किनारपट्टीतील राज्यांत मुसळधार आज सोमवारपर्यंत पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. गुलाब चक्रीवादळाचा एक परिणाम हा राज्यातल्या मराठवाडा आणि विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागात दिसून आला आणि अंदाजे अकरा लाख हेक्टर शेतजमीन या वादळामुळे उद्ध्वस्त झाली असे सरकारचे आकडे सांगतात. या भागांतील उभी पिके नष्ट झाली आहेत. तसेच, या बेसुमार मुसळधार पावसामुळे राज्यातल्या बहुसंख्य सगळ्या धरणांमधला पाणीसाठा 100 टक्क्यांंवर पोहोचला. गेल्या कित्येक वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरणांतला पाणीसाठा 100 टक्क्यांवर गेला आहे. नाशिक शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीला प्रथमच पूर आला. नदीकाठची लहान मंदिरे पाण्याखाली गेली. प्रशासनाने सतर्कतेने फार नुकसान झाले नाही. धरणांमधल्या पाणीसाठ्यामुळे येत्या उन्हाळ्यातली पाण्याची समस्या सुटली आहे हे खरे, मात्र आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारपुढील समस्या या गुलाब चक्रीवादळामुळे नष्ट झालेल्या पिकांमुळे आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे तीव्र झालेली आहे. ही हताश परिस्थिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात केलेल्या विधानातून स्पष्ट होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रावर एकानंतर एक अशी चक्रीवादळाची संकटे येत आहेत. गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, मग तौक्ते आले आणि आता गुलाब चक्रीवादळाचे संकट आहे. राज्य सरकार अजूनही निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या हानीची नुकसान भरपाई देत आहे. त्यात आता विदर्भ-मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातल्या दहापैकी सात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने सगळी पिके नष्ट झाल्याने शेतकरी हताश बनला आहे. सोयाबीन सडून गेले व ऊस मुळासह गळून पडल्याचे सगळीकडे दृश्य असून त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. कारण, कापूस, कांदा, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन अशी सगळीच पिके वाया गेली आहेत. तसेच, या वादळाने आलेल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या अविश्‍वसनीय अशी शेकड्यांत गेली होती. पीके काढताना शेतकरी मरण पावले. हजारो जनावरे वाहून गेली आणि काही शेतात नुसताच गाळ दिसत असल्याचे दृश्य दूरपर्यंत आहे, असे शेतकरी बांधव सांगत आहेत. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद या ठिकाणी बोटी आणि हेलीकॉप्टरच्या सहाय्याने लोकांना वाचवावे लागले. आधीचा पंचनामा पूर्ण करेपर्यंत पुढे आणखी पाऊस येतो. पूरस्थितीमुळे पंचनामे करणे अवघड होऊन बसतेच, शिवाय, माणसाला वाचविण्याचे काम प्राधान्याने करावे लागते. या भागात सरासरीपेक्षा सव्वापट ते दुप्पट अशा प्रमाणात पाऊस झाला असून त्यात गावांतील विस्थापित झालेल्यांचीही स्थिती केविलवाणी आहे. या सातत्याने बदलत चाललेल्या पाऊस, वादळ, पाणी परिस्थितीचा देशावर तसेच महाराष्ट्रावर परिणाम होत राहणार आहे. पावसाचे ऋतुचक्र बदलले आहे आणि त्याची तीव्रता आणि आघातप्रदेश यामध्येही बदल झाला आहे. अशा प्रकारच्या नुकसानीत केवळ शेतकर्‍यांचे नुकसान होत नाही तर त्याचा आर्थिक भार सगळ्यांवर येतो. पीकपाण्याची पारंपरिक गणिते आणि पद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज असल्याकडे हे बदल अंगुलीनिर्देश करीत आहेत. निसर्गाच्या बदलाचा कल पाहून आपणही बदलण्यास तयार झालो तर संकटे कमी होतील हे निश्‍चित!

Exit mobile version