मजुरांच्या मजुरीचा विजय

ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या घोषणेचा असतो. त्यानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र तसेच साहित्य आणि शांततेचे पारितोषिक जाहीर झाले आणि शेवटचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. अर्थशास्त्र आपल्या जीवनावर खूप प्रभाव टाकणारे असले तरी त्यातील क्लिष्टतेमुळे तसेच, हा विषय समजून घेण्यासाठी गणितांची प्रमेये जाणून घ्यावी लागत असल्याने, त्यापासून लांब राहण्याची प्रवृत्ती असते. यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल हे अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. डेव्हीड कार्ड, जोशुआ अँग्रीस्ट आणि गिडो अँबिन्स या तीन विजेत्यांनी आपल्या नित्याच्या जगण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्‍नांंना ठोस उत्तरे दिली आहेत आणि महत्त्वाचे गैरसमजही दूर केले आहेत. त्याचबरोबर अर्थशास्त्र माणसाच्या जगण्याशी किती जवळून जोडले गेलेले आहे ते समजून घेण्यासाठी नवीन संशोधन पद्धती प्रस्थापित केली, ज्याला ‘नैसर्गिक प्रयोग’ असे म्हटले जाते. या पद्धतीचा उपयोग काही वर्षापूर्वी भारतातील पाऊसपाणी आणि शेतकर्‍यांची मिळकत यातील संबंध शोधण्यासाठी केला गेला होता. त्याच तत्वाचा वापर करुन या तीन अर्थशास्त्रज्ञांनी रोजगार, मजुरी, स्थलांतर, वेतनवाढ या रोजच्या प्रश्‍नांंना वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी ठोस उत्तरे दिलीच, शिवाय त्याबद्दल असलेले काही प्रतिकूल आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनही बदलून टाकले आहेत. त्यांनी नेमके काय योगदान दिले हे पाहण्यासाठी आपण आपल्याला पडणार्‍या काही प्रश्‍नांकडे पाहूया. सर्वसाधारणपणे असा समज आहे आहे की जेव्हा एका प्रदेशात स्थलांतरित येतात तेव्हा तेथील स्थानिकांचा रोजगार बुडतो. उदा. आपल्याकडे उत्तर प्रदेश, बिहारमधून येणार्‍या मजुरांमुळे, स्थानिकांचा रोजगार बुडतो असे मानून काही राजकीय पक्ष बचावात्मक भूमिका घेत असतात. तसेच, शिक्षणातील अतिरिक्त गुंतवणूक ही त्या विद्यार्थ्याला भविष्यकालीन अतिरिक्तमिळकतीची हमी असते का? असाही प्रश्‍न आपल्याला पडतो. याचे उदाहरण म्हणजे आपण आपल्या मुलांना चांगले, जास्तीचे शिक्षण देतो, जेणेकरून आपल्याला वाटते की त्यांना त्यांचा अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी फायदा होईल. अजून एक प्रश्‍न चर्चिला जातो तो म्हणजे वेतनवाढ केली रोजगाराच्या संधी कमी होतात का? म्हणजे जर नोकरी देणार्‍या मालकाला जास्तीचा पगार द्यावा लागला तर त्याचा कल कमी लोकांना नोकरी देण्याकडे असेल. म्हणजे नोकरीच्या संधी कमी होतील. या सर्व प्रश्‍नांबाबत या अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिले की आपण जसे समजतो तसे वास्तव असेलच असे नाही. आपली मते चुकीची आहेत कारण हा जो या दोन घटकांमध्ये आपण कार्यकारण भावाचा संबंध जोडतो, तो तसा असेलच असे नाही. 1980 च्या दशकात क्युबामधून लोकांना जायचे असेल तर जा, असे फिडेल कॅस्ट्रोने सांगितल्यावर अनेक जण मायामी येथे आले. डेव्हीड कार्ड यांनी या घटनेच्या अभ्यासातून दाखवून दिले की स्थानिकांच्या वेतनावर, रोजगार संधींवर या स्थलांतराचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. वेतनवाढ आणि नोकरीच्या संधी यातील कार्यकारणभावही तपासण्यासाठी अशा ‘नैसर्गिक परिस्थितीतील घडामोडींचा अभ्यास’ त्यांनी प्रस्थापित केला. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, पगार वाढवले की लोकांना कमी नोकर्‍या उपलब्ध होतात. मात्र अमेरिकेतील वेगवेगळ्या वेळी झालेल्या किमान वेतनवाढीतून त्यांनी दाखवून दिले की पगार वाढले तर रोजगाराच्या संधी कमी होतात हा समज चुकीचा आहे. तसाच चुकीचा संबंध शिक्षण आणि मिळणारे वेतन याचा संबंध लावताना होतो, हेही अन्य दोन अर्थशास्त्र जोशुआ अँग्रीस्ट आणि गिडो अँबिन्स यांनी दाखवून दिले. अर्थशास्त्राचा अंतर्भाव सामाजिक शास्त्रांत होत असल्याने अन्य विज्ञानांप्रमाणे शोध लावण्यासाठी ठरवून प्रयोग करण्यावर खूप मर्यादा असतात. कारण त्यासाठी आवश्यक असलेले ‘परिस्थिती नियंत्रण’ शक्य नसते. ते प्रयोगशाळेत करता येत नाहीत. भारतासारख्या मजूरप्रधान, कृषीप्रधान आणि शिक्षणाची मोठी दरी असलेल्या देशाच्या दृष्टीने या शोधांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण आणि वेतनातील इथले संबंधही या पद्धतीने समजून घेता येतात आणि समाजाला अधिक योग्य दिशेने जाण्यास धोरण आखता येते. तसेच, भारतातील मजूर आणि कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्‍न सोडवता येईल आणि वेतनवाढ केल्याने अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल, आणि रोजगाराच्या संधी कमी होतील, ही भिती आणि आडाखे खरे नाहीत, हे जाणून सुधारीत धोरणे आणता येतील. आपल्या कळीच्या प्रश्‍नांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेली आहे. त्याचा आपण उपयोग केला पाहिजे.

Exit mobile version