धर्मनिरपेक्षतेकडे…

गेल्या आठवड्यात बांगलादेशात दुर्गापूजेच्या कार्यक्रमांदरम्यान अल्पसंख्यांक हिंदूवर झालेल्या हल्ल्यात किमान सहा जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते. पोलिसांनी आतापर्यंत जवळपास पाचशे जणांना अटक केली आणि हिंसाचाराशी संबंधित सत्तरहून अधिक गुन्हे दाखल केले. पंतप्रधान शेख हसीना यांनी कठोर कारवाईचे आश्‍वासन देताना त्यांच्या सरकारने या घटनांचा स्पष्टपणे निषेध केला. देशाच्या परराष्ट्र व्यवहार खात्याने जारी केलेल्या एका निवेदनात, 50 वर्षांपूर्वी बांगलादेशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणारे स्थानिक काही समाजघटक अजूनही हिंसा, द्वेष आणि धर्मांधता भडकवण्यासाठी त्यांच्या विषारी कथांचा प्रसार करत आहेत, हे खेदजनक आहे. तथापि, मुस्लिम बहुल बांगलादेशात जातीय हिंसाचाराची ही पहिलीच घटना नाही. असे अनेकदा हल्ले झाले आणि बांगलादेशाच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचा कस लागत राहिला आहे. आता पुन्हा एकदा तसा कस लागत असताना बांगलादेशने स्वत:ला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत आणि त्याबद्दल लवकरच तेथे मोठे बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. मात्र दोन्ही देशांतील धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्या काही प्रमाणात भिन्न आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षता हिंदुत्वाला जीवनपद्धती मानते तर बांगलादेशातील धर्मनिरपेक्षता ही धर्माबाबतची तटस्थता संबोधली जाते. असो. एकेकाळी भारताचा भाग असलेल्या, फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान बनलेल्या आणि नंतर काही वर्षांतच भारताच्या साह्याने पाकिस्तानपासून तुटून स्वतंत्र देश बनलेल्या बांगलादेशातील घडामोडी आपल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कारण आपल्या देशातही अलिकडच्या काळात घटनेच्या धर्मनिरपेक्षतेबाबत मोठे संकट निर्माण झालेले आहे. बांगलादेशातील नव्याने धर्मनिरपेक्षतेला मजबूत करण्याबाबतची महत्त्वाची घोषणा बांगलादेशचे माहिती राज्यमंत्री मुराद हसन यांनी केली. ‘बांगलादेश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. 1972 साली राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांनी प्रस्तावित केलेल्या घटनेकडेच देश परतेल. बांगलादेश धार्मिक कट्टरवाद्यांचे आश्रयस्थान होऊ शकत नाही. इस्लाम हा आमचा राज्यधर्म नाही. आम्ही पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली संसदेत विधेयक लागू करून मूळ राज्यघटनेकडे परत जाऊ, धर्मनिरपेक्षता हा बांगलादेश आणि भारतीय संविधानाचा अविभाज्य पैलू आहे. त्याद्वारे नागरिकांना, अल्पसंख्यांकांना त्यांच्या जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क बहाल केला जातो. धर्माचा संघर्ष बिंदू बनवून बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक समुदायामध्ये संघर्ष निर्माण करण्यासाठी धर्माच्या नावाने अफवा पसरवल्याने दंगली भडकतात. काही ठिकाणी धर्माचा वापर डोक्यातील धर्मवेडेपणाला भडकविण्यासाठी त्याला राष्ट्रवादाचेही रूप देण्यात येते. आपल्याकडेही ते आपण नित्य पाहतो. तेच तेथेही घडत आहे. गंमतीची गोष्ट अशी की देशाच्या फाळणीच्या वेळी हिंदू आणि मुस्लीम म्हणून दोन स्वतंत्र राष्ट्रे बनली तरी धर्म हा काही सगळ्यांना एकत्र ठेवू शकत नाही हे अल्पावधीतच सिद्ध झाले. कारण मुस्लीम म्हणून एक आहेत असे सांगितले गेले तरी पाकिस्तान एकत्र राहू शकले नाही. ते भाषेच्या अस्मितेवरून भंग पावले. म्हणूनच आपण बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांना त्याच दृष्टीने पाहिले पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या देशात मुस्लिम बांधवांवर हल्ले केले जातात. धर्माचा अतिरेक हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांना कलंकित करतो, हे समजले पाहिजे. मात्र भारताचा आणि बांगलादेशाचा धर्मनिरपेक्षतेचा प्रवास खूप वेगळा आहे. पन्नास वर्षांपूर्वी जन्माच्या वेळीस बांगलादेश एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून घोषित झाला तरी त्याची पुढची अनेक वर्षे देशाला इस्लामची ओळख देण्यात गेली. 1988 मध्ये तो धार्मिक देश बनला. तेथे लोकशाहीचाही प्रवास सलग राहिला नाही. मात्र नव्वदच्या दशकात संसदीय लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर घटनेतून धर्मनिरपेक्षता काढून टाकणे बेकायदा ठरवले गेले. कारण, हे कलम मार्शल लॉच्या आदेशानुसार करण्यात आले होते व हा मार्शल लॉ बेकायदा होता. भारतात अजूनही धर्मनिरपेक्षतेच्या पैलूवर चर्चा सुरू आहेत, त्या तीव्र होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपला एक निकटचा शेजारी पुन्हा धर्मनिरपेक्षतेची मुळे मजबूत करू पाहात आहे, ही चांगली गोष्ट आहे. बांगलादेशाने भारतापासून याबाबतीत कायम प्रेरणा घेतली आणि तेथील न्यायव्यवस्थेनेही या गोष्टींना समर्थन दिले. यासंदर्भात भारताने आपली धर्मनिरपेक्षतेची भूमिकाही मजबूत करायला हवी. धर्म हा सगळ्यांना एकत्र ठेवणारा घटक असू शकत नाही, हे त्यांना कळले आहे. आपण इतके धर्म आणि जातींमध्ये विभागूनही अखंड राहिलो, त्याचे कारण आपण एकच एक धर्म अशी ओळख न होऊ देता, धर्मनिरपेक्षतेला आपले स्वातंत्र्य मानले तीच गोष्ट महत्त्वाची.

Exit mobile version