गुंतागुंत वाढली

अंमली पदार्थांचे सेवन, वहन हा आपल्या देशात गंभीर गुन्हा आहे आणि ते बाळगणेही गुन्हेगारी कृत्यात मोडते. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या यासंदर्भातील आरोपांखाली झालेल्या अटकेमुळे गेले अनेक दिवस गाजत असलेले प्रकरण सुरुवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि अनेक प्रश्‍न निर्माण करणारे होते. आता त्यातील गुंतागुंत इतकी वाढली आहे की या प्रकरणात कारवाई करणारे मुख्य अधिकारी आपल्यालाच अटक होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या पत्नीला सत्याचा विजय होईल असा जाहीर धीर देण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही गुन्हेगारी विषयावरील वेब सिरीजपेक्षा अधिक गुंतागुंतीची ही केस बनलेली आहे. आधीच त्याला हिंदू मुस्लीम असे स्वरूप देण्यात आले. त्यात बॉलीवूड म्हटल्यावर ते सॉफ्ट टार्गेट असते. या महिन्याच्या प्रारंभी पहिल्या शनिवारी अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीने संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या एका क्रूझवर छापा टाकला. या विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या पथकाच्या सहाय्याने हा छापा टाकला आणि तेथे असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान व अन्य आठ तरुण तरुणींना दुसर्‍या दिवशी, रविवारी अटक केली. त्यानंतर या छाप्यात सहभागी असलेले दोन जण या विभागाशी संबंधित नसलेले लोक असल्याचे लक्षात आले. त्यापैकी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला आणि फरार असलेला गोसावी याचा ठावठिकाणा लागला असून तो लवकरच शरण येईल. भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी हा दुसरा अद्याप फरार आहे. त्यानंतर या प्रकरणातील एक पंच समीर वानखेडे यांच्याच मैत्रीतला आणि अनेकदा साक्षीदार बनल्याचे उघड झाले. आता आर्यन खान प्रकरणातीलच एका पंचाने समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्या दरम्यान, या प्रकरणी व्यक्तिगत पातळीवर रोजच्या रोज नवनवीन खुलासे करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे याचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे कसे आहे आणि त्याचे आधी लग्न मुस्लीम डॉक्टरशी झाले होते आदी या प्रकरणाशी संबंधित नसले तरी लोकांच्या मनात हिरो बनत चाललेल्या समीर वानखेडेला बचावात्मक पातळीवर आणले. ते राखीव कोट्यातून भारतीय रेव्हन्यू सर्व्हिस मध्ये आले आणि ते त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून प्राप्त केले असे सिद्ध करण्याचा मलिक यांचा प्रयत्न दिसतो. समीर वानखेडे याने मलिक यांच्या जावयाला काही महिने तुरुंगाची हवा खायला लावली होती, त्याचा ते व्यक्तीश: बदला घेत आहेत असे म्हणता येते. मात्र त्या प्रकरणीही कोणतेही पुरावे नव्हते, हेही लक्षात घ्यायला हवे. आर्यन खाननेही कोणतेही अंमली पदार्थांचे सेवन केले नाही, त्याच्याकडे ते सापडले नाहीत. व्हॉट्सअपच्या चॅटच्या आधारे त्याला तुरुंगात ठेवले गेले आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील शाहरूख खान यांच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते; त्यातील आठ कोटीचा हिस्सा वानखेडेंचा होता, असा गंभीर आरोप पंच प्रभाकर साईल यांनी केला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक हन्सल मेहता यांनी वानखेडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सत्यमेव जयते, असे ट्वीट केले आहे. दरम्यान 3000 किलो अंमली पदार्थांचे कंटेनर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योजक मित्र अदानी यांच्या बंदरात सापडले. त्याची अजिबात चर्चा नाही की कारवाई नाही. त्याबद्दल कोणी पोस्टही टाकत नाहीत. हे प्रकरण सुरू झाल्यापासून उत्साही हिंदुत्ववादी समीर वानखेडेंना हिरो मानून आर्यन खान हा कसा बिघडलेला मोठ्या बापाचा मुलगा आहे, असे अनेक पोस्ट पाठवत होते. आता समीर वानखेडे हाही अंशतः मुसलमान असल्याचे स्पष्ट होत आहे आणि त्याचे पंच फरार आहेत. जो आहे तो खंडणी गोळा करण्यासाठी ही कारवाई केल्याचे निदर्शनास आणत आहे. राज्य सरकारला बदनाम करायचा अजेंडा केंद्र सरकारने उचलला असेल तर ते राजकीय म्हणून ठीक म्हणूयात. मोठ्या हिरोचा, अतिश्रीमंत मुलगा म्हणजे व्यसनीच असणार असे गृहित धरणार्‍या समाजाचे काय करायचे? या प्रकरणात कोण खरा कोण खोटा हे कळेलच. पण समाज आपल्या डोळ्यांवर चढवून बसलेली झापडे कधी काढणार, हा अधिक मोठा प्रश्‍न आहे.

Exit mobile version