लालपरी कडाडली

गेले काही महिने महागाईने डोळे वटारलेले आहेत. त्यात काही दिवसांपासून रोजच्या जगण्यातील भाज्यांच्या दरातही मोठी वाढ दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्य जनता आपले सातत्याने कोलमडू लागलेले बजेट सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना लोकांच्या रोजच्या कामधंद्यासाठी आवश्यक असलेला एसटीचा प्रवासही महागला आहे. गेले काही महिने होत असलेली इंधनदरातील भरमसाठ वाढ त्याला प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. मात्र हे करत असताना परिवहन विभागाच्या सुमारे 93 हजारांहून अधिक कर्मचारी तथा अधिकारी वर्गाला दिवाळीची गोड भेट देत समतोल साधण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो. परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिवाळीसाठी एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याची घोषणा केली असून, दिवाळीची भेट म्हणून अधिकार्‍यांना पाच हजार रूपये, तर कर्मचार्‍यांना अडीच हजार रूपये देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गेले काही महिने एसटी वाहतूक जवळपास सगळीकडे पूर्ववत होऊन धावू लागलेली आहे. अर्थात, इंधनाच्या दरांत वाढ झाल्याबरोबर सगळ्याच गोष्टींचे भाव वाढतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. कारण, इंधन हे वाहतुकीशी संबंधित असलेला महत्त्वाचा घटक आणि कोणत्याही मालाची वाहतूक महागली की त्याचा भार संबंधित सर्व वस्तूंवर पडत असतो. त्यानुसार इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीसोबत टायर, गाड्यांचे सुटे भाग आदींच्याही किंमती वाढलेल्या आहे. त्याचा भार एसटीच्या तिजोरीवर पडतच होता. गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आणि अलीकडच्या काळात तर ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. या काळात एसटीचे तिकीट दर स्थिर ठेवले गेले होते. मात्र आता तो बोजा सहन करता येत नसल्याने नाईलाजाने तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आणि तो तात्काळ म्हणजे राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत सदर भाडेवाढ प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली. सदर भाडेवाढ महामंडळाच्या अखत्यारीतील सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना लागू होणार आहे. ही वाढ किमान पाच रुपये असून, ती कमाल 185 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे दिवाळी अवघ्या आठ दहा दिवसांवर येऊन ठेपलेली असताना प्रवाशांच्या खिशावर त्याचा जादा भार पडणार आहे. जाहीर केलेल्या माहितीनुसार, नव्या भाडेवाढीत साधी गाडी, शयन-आसनी वाहन, शिवशाही, शिवनेरी व अश्‍वमेध या बससेवांच्या पहिल्या टप्प्यासाठी सूट देण्यात आली असून, दुसर्‍या टप्प्यानंतर, म्हणजे सहा किलोमीटरनंतरच्या अंतरासाठीच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ती दरवाढ पाच रुपयांच्या पटीत असणार आहे. तसे करण्यामागे रुपयाचे घसरलेले मूल्य आणि सुट्या पैशांसाठी होणारी डोकेदुखी हे कारण असावे. या भाडेवाढीमुळे जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई, पुणे, दापोली, रत्नागिरी अशा लांबच्या बसप्रवासाला जादा पैसे द्यावे लागतील. मुंबई ते अलिबाग या प्रवासासाठी जनतेला पंचवीस रुपये जादा द्यावे लागतील. याबरोबरच, लालपरीला राज्याच्या कानाकोपर्‍याशी जोडणार्‍या कर्मचारी व अधिकारी वर्गाला दिलासा देणे ही चांगलीच गोष्ट आहे. कोरोना काळात त्यांच्यावरही मोठे आर्थिक संकट आले होते आणि त्याच्याशी जुळवून घेताना त्यांचेही कंबरडे मोडले होते. महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी कर्मचार्‍यांनी लावून धरली होती. आपल्या मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत हा कर्मचारी वर्ग अजूनही आहे. त्यादृष्टीने परिवहन मंत्र्यांनी वेळीच महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. सध्या कर्मचार्‍यांना मिळत असलेल्या 12 टक्के भत्त्यात आणखी पाच टक्के भर पडणार असल्याने त्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. तरी अन्य मागण्यांसाठी संपावर जायचा निर्धार कायम दिसतो.दिवाळीच्या निमित्ताने मिळणार्‍या या बोनसस्वरूपी आर्थिक लाभाने त्यांचे मनोबल वाढेल आणि दिवाळीचा यंदाचा तरी सण अधिक आनंदाचा करण्याची संधी मिळेल, अशी रास्त अपेक्षा होती. सर्वसामान्य प्रवाशांना यात अल्पसा दिलासा म्हणजे रात्री धावणार्‍या रातराणी सेवांचे तिकीट दर हे दिवसा धावणार्‍या बसेसच्या दराच्या तुलनेत 18 टक्के जास्त होते. ही अतिरिक्त दरवाढ रद्द करण्यात आली असल्याने दिवसा व रात्री धावणार्‍या बसेसचा तिकीट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे एका अर्थी रातराणीचा प्रवास 18 टक्क्यांनी स्वस्त झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Exit mobile version