धुकं आणतंय नाकी नऊ

Red lights on a foggy night

अजय तिवारी

धुक्यानं चादर अंथरली असं आपण म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ सकारात्मक घेतला जातो; परंतु धुक्याची चादर बरेचदा मायेची नसते, तर जीवघेणीही ठरते. कुन्नूरजवळ बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातापासून दृश्यमानता कमी होण्याच्या विविध तक्रारींपर्यंत आणि शेतीशी निगडीत समस्यांपासून तण जाळण्याच्या घटनेपर्यंत देशात अनेक ठिकाणी धुकं नाकी नऊ आणताना दिसत आहे. त्याचाच हा वेध.
धुकं ही वातावरणात उद्भवणारी पर्यावरणीय घटना आहे. धुकं पडायला प्रदूषण हेच मुख्य कारण आहे. गेल्या काही दिवसांमधल्या बातम्या पाहिल्या तर धुकं सर्वांगीण परिणाम कसं करतं आणि त्याने एकूणच मानवी जीवन कसं कह्यात ठेवलं आहे, हे स्पष्ट होतं. दिल्ली, पुणे आदी ठिकाणच्या विमानतळांवर धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं विमानं काही काळ उतरू शकली नाहीत. काश्मीरमध्ये धुक्यामुळे हवाई दलाचं हेलिकॉप्टर कोसळलं. धुक्यातून मार्ग कसा काढायचा, हे माहीत असल्यानं एखादा नेता किंवा अधिकारी हेलिकॉप्टरने अपेक्षित ठिकाणी पोहोचल्याच्या बातम्या गाजतात, परंतु भौगोलिक माहिती आणि हवामानाची अचूक माहिती असणारे असे तज्ज्ञ विरळच. अनेकदा धुक्यामुळे दृश्यमानता एकदम पाचशे मीटरवर येते. त्यामुळे हेलिकॉप्टर, विमान उडू शकत नाही. रेल्वेगाड्या एक तर रद्द कराव्या लागतात किंवा त्यांचा वेग अतिशय कमी होतो. गेल्या आठवड्यात समोरचं न दिसल्यानं रेल्वेनं एका हत्तीला उडवलं. मोठा अपघात होता होता वाचला. ‘धुक्यात हरवली वाट’ असं म्हणणं सोपं असतं; परंतु या हरवलेल्या वाटा कितीजणांचे बळी घेतात, याची मोजदादच नसते. उत्तर भारतात धुकं पडण्याचं प्रमाण जास्त असतं. धुक्यामुळे समोरचं न दिसल्याने वाहनं एकामागून एकावर आदळण्याच्या घटना दर वर्षी घडतात. दृश्यमानता कमी झाल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांसाठी धुकं धोकादायक ठरु शकतं.
धुकं कसं तयार होतं, कोणकोणत्या घटकांवर परिणाम करतं, हे समजून घेतलं पाहिजे. कमी तापमानामुळे वातावरणात पाण्याच्या कणांचं संक्षेपण करून धुकं तयार होतं. पृष्ठभागाच्या पातळीवरही ढग तयार झाल्यामुळे दृश्यमानता कमी होते. वातावरणातली स्थिरता आणि वारा नसताना शहरांमध्ये प्रदूषण जास्त होतं, तेव्हा असं धुकं तयार होऊ शकतं. जंगलातल्या आगीच्या धूरातूनदेखील धुकं तयार होतं. अशा वातावरणात श्‍वास घेणं आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरतं. धुक्याचे दोन परिणाम होतात. पहिले प्रत्यक्ष आणि दुसरे अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष घटकात दृश्यमानता कमी असते. यामुळे अपघात होतात. दृश्यमानता कमी झाल्यानं शरीरावर परिणाम होत नाही. परंतु, धुक्याचे प्रत्यक्ष परिणाम मात्र जास्त घातक असतात. धूळ आणि इतर कणांचे प्रमाण वातावरणात जास्त असल्यास श्‍वास घेण्यात अडचणी येतात. त्वचेला त्रास होतो. मुख्य परिणाम यांपैकी एक म्हणजे नाकाला त्रास होतो. डोळ्याला खाज सुटते आणि सतत खोकला येतो. धुकं आणि धूर जास्त आणि दीर्घ काळ टिकणारा असेल, तर काही दिवसातच ब्रोन्कोस्पाझमची समस्या उद्भवू शकते. श्‍वासोच्छवास, दमा आणि छातीत दुखणं ही त्याची लक्षणं. प्रदूषणामुळे वाढणारं धुकं काही लोकांच्या जीविताला धोका निर्माण करू शकतं, एवढी ही समस्या घातक आहे. धुक्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हवामानाचे अंदाज लक्षात घेऊन उपाययोजना करणं महत्त्वाचं असतं. धूर आणि धुकं वाढतं, तेव्हा दरवाजे आणि खिडक्या बंद करणं, शक्य तितकं घर न सोडणं, मुखपट्टी वापरणं, घराबाहेर व्यायाम करणं टाळणं, जादा पाणी पिणं आवश्यक ठरतं.
धुक्यामुळे वाढलेली एकविसाव्या शतकातली आव्हानं आता भीषण रूप घेत आहेत. याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे राजधानी दिल्लीचा ‘गॅस चेंबर’ होणं. निसर्गातल्या मर्यादित स्रोतांचा केलेला अमर्याद वापर निसर्गचक्रात बदल होण्यास कारणीभूत ठरत आहे. जलवायू परिवर्तन, जैवविविधतेवर विपरीत परिणाम, जागतिक तापमानामध्ये वाढ यांचा परिणाम समुद्रात वेळोवेळी प्रचंड वादळं निर्माण होण्यास, अवेळी पाऊस पडण्यास तसंच काही भागात दुष्काळ पडण्यास निमित्त ठरत आहे. माणसाचा निरंतर विकास होत आहे. मात्र, पर्यावरणामधलं हे असंतुलन या विकासमार्गात मोठा अडथळा निर्माण करत आहे. भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या दिवसांमध्ये वायुप्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. वायुप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांपैकी कार्बन, नायट्रोजन, सल्फर, सूक्ष्म कण यांचा समावेश आहे. हे घटक वाहनांच्या इंधन ज्वलनातून, औद्योगिक प्रक्रियेतून, वीजनिर्मितीसाठी जाळल्या जाणार्‍या कोळशापासून, बांधकामाच्या प्रक्रियेतून तसंच शेतात उरलेल्या पदार्थांच्या जाळण्यातून निर्माण होतात, हवेत पसरतात. कमी तापमानामुळे आणि हवेच्या कमी गतीमुळे ही प्रदूषित हवा जमिनीलगत स्थिरावते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातल्या दहा प्रदूषित शहरांपैकी नऊ शहरं भारतात आहेत. वायुप्रदूषणाची झळ जगातल्या अनेक देशांनी आणि शहरांनी सोसली आहे. मात्र, संकटावर परिश्रमपूर्वक उपायही शोधून काढला आहे. नियंत्रण मिळवलं आहे. लंडन शहराला 1952 मध्ये औद्योगिक आणि वाहनांच्या प्रदूषणामुळे निर्माण होणार्‍या धुक्याचा सामना करावा लागला होता. ‘ग्रेट स्मॉग ऑफ लंडन’ म्हणून हे ओळखलं जातं. त्या काळात दृश्यमानतेत कमालीचे अडथळे निर्माण झाले. हजारो लोकांचा जीव गेला. तातडीने उपाय करण्यात आले. मात्र त्यानंतर धूरविरहित इंधनाचा वापर करून स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यात आणि वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. चीनच्या बीजिंगमध्ये वाढलेल्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उत्सर्जनाची कठोर मापकं स्वीकारण्यात आली. कर्तव्यदक्ष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हवेचं सातत्याने निरीक्षण, प्रदूषणावर देखरेख सुरू झाली. याचा एकत्रित परिणाम म्हणजे हवेतल्या सूक्ष्म कणांवर 35 टक्के नियंत्रण आलं. मेक्सिकोचे रहिवासी 1970 ते 80 हे दशक विसरू शकणार नाही. या दशकानं भीषण वायुप्रदूषण पाहिलं. मोठी मनुष्यहानी सोसली. या संकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाय करण्यात आले. वाहनांचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांना वाहन शेअरिंगची सवय लावणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देणं, वाहतुकीसाठी कार्यक्षम इंधनाचा वापर, सायकलींचा वापर, रस्त्यांची देखभाल, सौर ऊर्जेचा वापर, घनकचर्‍याची योग्य विल्हेवाट यावर भर देण्यात आला. त्यातून मग प्रदूषण कमी झालं.
असे अनेक उपाय वायुप्रदूषण कमी करण्यास व त्यावर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहेत. आता भारतात ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’च्या माध्यमातून 102 शहरांमध्ये वायुप्रदूषण 20 टक्क्यांपेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट आहे. 2017 हे वर्ष संदर्भ वर्ष धरून 2024 पर्यंत या अभियानातून वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवलं जाणार आहे. स्मार्ट सिटी मिशन, इलेक्ट्रिक वाहन, वायू परिवर्तन इत्यादी मुद्यांचा यात ‘इनोव्हेशन मिशन’ म्हणून सहभाग आहे. प्रदूषणाला कारणीभूत घटकांच्या निर्मितीवर नियंत्रण, विघटन होणार्‍या वस्तूंचा वापर यावर यात भर आहे.
धुक्याचा शेतीवरही विपरित परिणाम होतो. कांद्यावर बुरशी व करपा, वाटाण्यावर बुरशी व कीड, गव्हावर तांबेरा, ज्वारीवर चिकटा आदी रोगांसह कीडींचा, अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांचं यामुळे कंबरडं मोडतं. किटकनाशक, तणनाशक फवारुन शेतकरी दमून गेले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात धुकं अपेक्षित नाही. विमानसेवेमध्ये एक हजार मीटरपेक्षा दृश्यमानता कमी झाल्यास धुकं असल्याचं मानतात.
भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था अणि भारतीय हवामान विज्ञान विभाग एकत्र येऊन पर्यावरण मंत्रालयांंतर्गत हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि पूर्वानुमान देण्यासाठी मोठ्या शहरांसाठी ‘सफर यंत्रणा’ उभारत आहेत. सध्या ही प्रणाली दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई इथे कार्यरत आहे. सर्वसाधारण मुंबईकरांना विरळ धुरकं हाच प्रकार जास्त अनुभवायला मिळत असल्यानं धुरकं प्रकार नेमका काय आहे याबाबत जनसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. यामध्ये डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव हा प्राथमिक त्रास दिसतो. धुरकं हवेमधले अत्यंत सूक्ष्म, तरंगत्या धुळीचे कण आणि इतर रासायनिक कणांमुळे तयार होतो. आपल्या देशात, खास करून उत्तर भारतात दिल्ली शहरात धुरक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात, हिवाळ्यात दिसतो आणि त्या बाबतची प्रमुख कारणं म्हणजे दिल्ली शहराचं स्वतःचं प्रदूषण. वाहनांमुळे तसंच इतर कारणांमुळे होणार्‍या प्रदूषणासोबत शहराच्या आजूबाजूला असलेल्या राज्यांमध्ये शेतात खूट जाळण्यासाठी लावलेल्या आगी हेही कारण आहेच. मुंबईच्या एका बाजूला अरबी समुद्र असल्यामुळे शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक सध्या तरी नियंत्रणामध्ये आहे.

Exit mobile version