संतांचे संगती तरणोपाय

वसंत चौलकर

भावाशिवाय देव जसा कळत नाही. तसा गुरुशिवाय अनुभव मिळत नाही. गुरुशिवाय खरंतर ज्ञानही प्राप्त होत नाही. संत साहित्यात संतांनाच त्यांच्या भक्तांनी गुरु मानलं आहे. म्हणूनच तर ‘संतांचे संगती तरणोपाय’ असं ज्ञानदेवांनी म्हटलंय. अज्ञानाच्या निद्रेतून जाग्या करणार्‍या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं तुकाराम महाराजांनी वक्तव्य केलंय.

योग मात्र विधी येणे नोहे सिद्धी । वायाचि उपाधी दंड धर्म ॥1॥
भावेविन देव नकळे निःसंदेही । गुरुविन अनुभव कैसा कळे ॥2॥
तपेवीन दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेवीन हित कोण सांगे ॥3॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूंचे संगती तरणोपाय ॥4॥
भगवंताला आपलंस करण्याची अनेक साधनं सांगितली जातात, असं सलं तरी त्यात भाव असणं हे महत्त्वाचं आहे; हे ज्ञानदेव पुन्हा एकदा ठासून सांगतात. योग, याग आणि इतर विधी केल्या तरी त्यातून सिद्धी प्राप्त होणार नाहीत, असं ते सांगतात. कारण योग हा अत्यंत कठीण मार्ग आहे. योगाच्या वाटेने कुंडली जागृत करुन ब्रह्म समाधाची अनुभव घेण्याचा मोह अनेकांना येतो. परंतु योगाचा मार्ग म्हणजे कठीण घाट एकट्याने चढून जाण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे, असं म्हणावं लागेल. ज्ञानेश्‍वरी मध्येही ज्ञानेश्‍वर महाराजांनी योगाच्या वाटेने भगवंतांची प्राप्ती करुन घेणे, म्हणजे दुःख पदरात पाडून घेण्यासारखं आहे, असं सांगितले आहे. महाराज म्हणतात.
योगाचिया वाटा ।
जे गेले गा शुभटा ।
तया दुःखाचिया वाटा ।
भागा आला ॥
म्हणून योग भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. देवाला आपलंसं करण्याचा साधा बेत याग म्हणजे यज्ञ. त्यामुळे यज्ञाचाही अनेकजण अवलंब करतात. परंतु यज्ञ करणं हे सुद्धा अत्यंत कठीण काम आहे. द्रव्य, वेळ यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्याचा विधीही अत्यंत क्लिष्ट आहे. सर्व साधनं जमवून यज्ञ करण्याचा प्रयत्न केला. त्यात थोडं जरी उणं राहिलं तरी पूर्णाहूती होत नाही. त्यामुळे केलेला सर्व खटाटोप वाया जातो त्यातूनही अत्यंत सावधानतेने विधी पार पाडून यज्ञाची पूर्णाहूती झालीच, तर त्यातून दंभ म्हणजेच ‘अहंकार’ निर्माम होण्याची शक्यता असते. जिथं अहंकार येतो तिथे देव राहत नाही. म्हणून योग आणि याग या विधींनी भगवंतांची प्राप्ती होण्याऐवजी अहंकाराची बाधा होण्याची भितीच जास्त असते.
भाव हाच भगवत भक्तीतील अत्यंत भरवशाचा मार्ग आहे. मात्र तो सहज उपलब्ध होत नाही. तर तो कोणत्या बाजारात मिळत नाही. तो आपल्या अंतःकरणातच प्रकट व्हावा लागतो. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये भाव असतो. मात्र त्याच्याभोवती आशा, आकांक्षा, दंभ, अहंकार याची आवरणं असतात. ही आवरणं दूर झाली तरच निखळ भाव प्रकट होतो. भाव आपल्यात कसा असतो, याचं उत्तर द्यायचं झाल्यास जशी एखाद्या दगडातच मूर्ती असते, तसाच आपल्या अंतःकरणात भाव असतो. मूर्ती घडवताना शिल्पकार दगडाची निवड करतो. निवड केलेल्या दगडात दुसरी मूर्ती आणून बसवत नाही. तर त्या दगडामध्येच घडवतो. मूर्ती भोवतीचा अनावश्यक भाग काढून टाकल्यानंतर जशी मूर्ती प्रकट होते; तशीच आपल्या अंतःकरणात अनावश्यक असणार्‍या विकाराची आवरण दूर सारली की, भगवंताविषयीचा भाव प्रकट होतो. त्यानेच भगवंत आवळला जातो, हे ज्ञानदेवांनी हरिपाठात अनेक ठिकाणी ठासून सांगितले आहे.
भावाशिवाय देव जसा कळत नाही, तसा गुरुशिवाय अनुभव मिळत नाही, हे ज्ञानदेव सांगतात. देवाचे लाडके भक्त म्हणून प्रसिद्ध असलेल्या नामदेवाला सुद्धा गुरुच करावा लागला. विसोबा खेचरांची भेट झाली आणि सर्वाभूमी राम देहादेही एक… ही भावना जागृत झाली आणि मग कुळामध्येही तोच देव आहे, याचा अनुभव नामदेवांना आला. भगवंतांचे अवतार असलेल्या रामाला वसिष्ठांचं तर कृष्णाला सांदीपनी ऋषींचे शिष्यत्व स्वीकारावं लागलं. कारण त्याशिवाय खरं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तप केल्याशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि काही दिल्याशिवाय काही पदरात पडत नाही. म्हणून ज्ञानेश्‍वर म्हणतात, ‘अज्ञानातून तरुन जायचं असेल तर साधूची संगतीच उपयुक्त ठरु शकते. साधु-संत हे आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जागे करुन जाग्या करणार्‍या संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, असं सांगताना तुकाराम महाराजही म्हणतात.
काय सांगू आता संतांचे उपकार ।
मन निरंतर जागविती ॥
संतांचे संगती तरणोपाय, असं ज्ञानदेवांनीही म्हटलं आहे.
संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार
मराठी साहित्याचा तेराव्या शताब्दीपासून सतराव्या शताब्दीपर्यंतचा कालखंड भक्ती आणि काव्य, दोन्ही दृष्टीने अद्वितीय असा आहे. या चारशे वर्षात महाराष्ट्रात भक्तीचा असा रसमयप्रवाह होतो की, ज्यात श्रद्धाळू जनसामान्यांनी सुस्नात होऊन असीम आनंद उपभोगला. या काळात जी संतमंडळी कार्यरत होती त्यांनी आपल्या काव्यसाधनेद्वारे भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांचे गुणगान करण्यात तल्लीन होतो. त्यांच्या भावपूर्ण स्वरात जनसामान्य सुद्धा आपली शुद्धबुद्धी हरवून आनंदात नाचत असत.
तेराव्या शतकात मराठी साहित्यात संतांचा एक असा महान समुदाय एकत्रित झाला होता, ज्याला ‘संतमेळा’ म्हणणे उचित होईल. सर्व संत श्री विठ्ठलाचे परम भक्त तर होतेच, पण कवीच्या रुपातही ते कुशल रचनाकार होते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर या समुदायाच्या केंद्रस्थानी असलेले व्यक्तिमत्त्व होते, तर त्यांच्या समकालीन कवि-कवयित्री ‘संतमंडळी’ त्यांचे अभिन्न अंग होते. तत्कालीन परिस्थितीत सर्वच संत विठ्ठला-पांडुरंगांचा जयघोष करीत, एकाच नादात मग्न भक्तीरसात आकंठ डुंबत, जनसामान्यासही त्याचा पावन धारेत पवित्र स्नान घालीत.
विठ्ठल भक्तीचा हा प्रवाह तेराव्या शतकात प्रगट होऊन निरंतर वाहत-वाहत सतराव्या शतकापर्यंत जनसामान्यास पावन करीत वाहत राहिला. आजही पंढरपूर नगरीत, दक्षिणेतील काशीत, भक्तीभावाचा हा प्रवाह लाखो श्रद्धाळूंच्या कीर्तनात, गायनात, नृत्यात चंद्रभागेतल्या वाळवंटात नाचणार्‍या, पाणाच्या भक्तजनांच्या, रुपात पाहिला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या खेडोपाडी, मंदिरात ‘जय जय रामकृष्ण हरी’ मंत्राचा उद्घोष टाळ-मृदुंगाच्या गजरात आजही ऐकू येतो. पांडुरंगाच्या प्रेमाचे हे वेडे जेव्हा अभंग म्हणत नाचतात तेव्हा उपस्थित जनसागरास भरते येते. मोक्ष त्यांचा दास बनून जातो आणि साक्षात वैकुंठ चंद्रभागेच्या वाळवंटात अवतीर्ण होते. हा अनुपम सोहळा केवळ अवर्णनीय असतो.
केशवाचे ध्यान धरुनि अंतरी । म्हातिके माझारी नाचतसे ॥1॥
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत ॥2॥
कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोराकुंभार हरिभक्त ॥3॥
केशवाचे ध्यान हृदयी धरुन (तो कुंभार) चिखल तुडवीत असताना सदासर्वदा विठ्ठलाचे नाव घेत असतो. गाढ भक्तीमुळे त्याच्या डोळ्यातून निर्झर प्रेमाश्रू वाहत असतात व त्याचा कंठ तेव्हा दाटलेला असतो. कुंभाराच्या कुळात जन्मलेला तो हरिभक्त गोरा कुंभार आहे.
वरती कराकर दोन्ही । पताकाचे अनुसंधानी ॥1॥
सर्व हस्त करिती वरी । गोरा लाजला अंतरी ॥2॥
नामा म्हणे गोरोबाशी । वरती करावे हस्तांसी ॥3॥
गोरा थोटा वरती करी । हस्त फुटले वरचे वरी ॥4॥
संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांचे कीर्तन पंढरपुरात सुरु असताना त्यांनी सर्व श्रोते भाविक मंडळींना सांगितले की सर्वांनी हात वर करावेत व हरिनामाची पताका त्या हातांनी उंच धरावी. सर्वांनी हात वर केले. पण गोरोबा काकास लाज वाटू लागली की आपले थोटे हात वर कसे करावे व पताका कशी धरावी. ही गोराबांची अडचण नामदेव महाराजांनी ओळखली व म्हणाले, गोरोबा आपणही हात वर करावेत. गोरोबा काकांनी हात वर केले आणि काय आश्‍चर्य । त्यांना हात फुटले. थोटे हात जाऊन मनगट व बोटे यासह त्यांचे हात पूर्ववत झाले.
संत गोरोबाकाका हे तर विद्यमान ता.नि. धाराशिव (उस्मानाबाद) या गावचे रहिवासी होते. या गावास तेरढोली असेही म्हणतात. या तेर गावात त्यांचे घर होते. व तेथेच त्यांचा कुंभार कामाचा व्यवसाय चालत असते.त्या गावी त्यांना इनामही होते. गोरोबा हे महाभगवद् भक्त होते. कुंभार काम करीत असताना विठ्ठलाचे नामस्मरण करायचे हा त्यांचा नित्यक्रम माती तुडविताना आनंदभरे नाचावे हाच त्यांचा परमार्थ. इ.स. 1267 हे गोरोबा काकांचे जन्मवर्ष तर त्यांनी समाधी घेतली 1317 व्या वर्षी. अवघे पन्नास वर्षाचे आयुष्यमान त्यांना लाभले. यंदा 2022 साली 28 एप्रिल 2022 रोजो गोरोबा काकांची 705 वी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे.

Exit mobile version