उन्हाचा प्रकोप, उडवी झोप

उर्मिला राजोपाध्ये  

तप्त तापमान देशाचा मोठा भाग भाजून काढत आहे. पूर्वी ऐन उन्हाळ्यातही सुसह्य वातावरण असणारे भूभाग आता उन्हात तळपताना दिसत आहेत. उन्हापासून दिलासा देणारी थंड हवेची ठिकाणंही आता होरपळताना दिसत आहेत. वातावरणातला हा बदल मानवी शरीरावर अनेक घातक परिणाम घडवताना दिसतो. डोळे, मेंदू यासारख्या महत्त्वपूर्ण अवयवांना ही धग अधिक जाणवते. विविध अंगांनी दाह देणार्‍या उन्हाचा हा मागोवा.

उन्हाळा ऐन बहरात असण्याचा सध्याचा हा काळ. दरवर्षी उच्चांकी तापमानाचे मागील आकडे ओलांडले जात आहेत. ग्रीष्माच्या तापाबरोबरच ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात कमालीची वाढ होत असून असह्य तलखी अनुभवायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात येणार्‍या भूभागांची संख्या वाढत असून पाण्याचं दुर्भिक्ष्य, जनावराच्या दाण्या-पाण्याचा प्रश्‍न, पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी होणारी माणसांची फरपट तसंच पायपिट आणि मुख्य म्हणजे असह्य उन्हामुळे सोसावा लागणारा शारीरिक त्रास या सगळ्यातच कमालीची वाढ झाली असून वाढत्या उष्णतेमुळे होणार्‍या विकारात मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्याही नोंद घेण्याजोगी आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वी ठराविक भागांना उन्हाचा अधिक तडाखा बसत असे. देशातला काही भाग या तलखीनं होरपळला जाई. देशाच्या काही भागात पर्जन्यमान जास्त असतं, कुठे थंडीचा कहर अधिक असतो त्याचप्रमाणे ठराविक भूभाग अतिउष्ण म्हणून ओळखला जाण्याचा एक काळ होता. त्या व्यतिरिक्तच्या भागात भर उन्हाळ्यातही पारा पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर चढलेला जुन्या पिढीनं पाहिला नसेल. उन्हाळा तीव्र असणार्‍या काळातही महाबळेश्‍वर, पाचगणी, माथेरान यासारखे भाग थंड असायचे. उष्णता वाढली तरी हवेतली आर्द्रता मर्यादित असल्यामुळे तसंच प्रदुषणाचे परिणाम नसल्यामुळे पुणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये उन्हाळ्यातही सुसह्य वातावरणाची अनुभूती मिळायची. वाळ्याचे पडदे, माठातल्या पाण्याचा गारवा, थंडावा देणार्‍या फळांचं सेवन, आजूबाजूची दाट वृक्षवल्ली यासारख्या निसर्गघटकांचा साधा शेजारही उन्हाळा सुसह्य करुन जायचा. मात्र आता चांद्यापासून बांद्यापर्यंत उन्हाचा प्रकोप बघायला मिळत असून विदर्भ, मराठवाडा, खानदेशाप्रमाणे राज्याच्या अन्य भागांमध्येही वातानुकुलन यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे.  साहजिकच वातावरणातला हा बदल अनेक दुष्परिणाम घेऊन येत आहे.
वाढत्या उन्हात शरीराचं संरक्षण केलं नाही तर होणारी हानी अटळ असेल. शरीरातलं पाणी, क्षार कमी होण्यापासून डोळे, मेंदू इथपर्यंत त्याचा त्रास जाणवू शकतो. म्हणूनच या सगळ्या बदलांकडे सजगपणे पाहिलं आणि त्यानुसार राहणीमान, विशेषतः आहार ठेवला तर वाढता उन्हाळा किंवा प्रदूषण यांचे विपरित परिणाम होण्यापासून आपण चार हात दूर राहू शकतो. या गोष्टी सोप्या असतात; फक्त त्या काळजीपूर्वक आणि सातत्यपूर्ण केल्यास आपसूक फायदे मिळतात. आहारातले बदल आपल्या शरीर यंत्रणेवर अनावश्यक ताण येऊ देत नाहीत. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाजवीपेक्षा अधिक वाढत नाही. उष्णतेचा किंवा पित्ताचा त्रास असणार्‍यांनी या काळात अधिक सजग राहिलं पाहिजे. हलका व्यायाम, व्यायामापूर्वी आणि नंतर पुरेसं पाणी पिणं आणि त्यानंतर रात्री झोपेपर्यंत तहान लागण्याकडे दुर्लक्ष न करणं अधिक हिताचं ठरतं. उन्हाच्या या कहरात हलका आहार घेणं सर्वाधिक चांगलं. आपण हिवाळ्यानंतर कमी उष्मांक असलेल्या पदार्थांकडे वळतो; पण आहारातली प्रथिनं कमी होणार नाहीत, याचीही दक्षता घेतली पाहिजे. या काळात भूक मंदावत असली तरी दोन्ही वेळ जेवण घेतलं पाहिजे. कधीही जेवण टाळू नये. उन्हाळ्याचा काळ हा पर्यटनाचा काळ असतो. अनेकजण सहलीवर जातात. तिथे प्रमाणापेक्षा जड खाणं होतं. तुलनेत पाणी कमी जातं. अनेकदा उघड्यावरील पदार्थांवर ताव मारला जातो. तो निश्‍चितच त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच ही चूक टाळणं गरजेचं आहे. म्हणजेच उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. शिळं अन्न खाऊ नका. शिजवून फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळा. आहारात काकडी, बीटचं सॅलेड आणि ताजी फळं आणि पालेभाज्यांचा अधिक  वापर करावा. कलिंगड, द्राक्षं, टरबूज ही या काळात उपयुक्त ठरणारी फळं आहेत. या उष्ण दिवसांमध्ये पॅकबंद अन्नपदार्थ, रासायनिक प्रक्रिया केलेली थंड पेयं टाळलेली चांगली. त्याऐवजी गरजेनुसार नारळाचं पाणी, लिंबू अथवा कोकम सरबत आवर्जून घ्यावं. ते शक्य नसेल तर पाण्यात चिमूटभर साखर आणि मीठ टाकून प्यावं. आहारात ताक, दही आणि दुधाचं प्रमाण वाढवावं. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी ग्लासभर ताक प्यायल्यास फायदा होतो. या काळात मांसाहार प्रमाणात ठेवावा. महत्त्वाचं म्हणजे तो ताजाच घ्यावा.
या उष्ण काळात आहाराप्रमाणे विहाराचीही काही पथ्य पाळणं गरजेचं ठरतं. उन्हाची काहिली वाढत असताना कोणते कपडे घालावेत, नेमकं काय टाळावं आणि काय घालावं हेच कळत नाही. म्हणूनच कपडे निवडताना काही गोष्टींचा विचार अगदी सावधपणे करायला हवा. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून बचाव होण्यास मदत होते. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या काळात सैल कपडे वापरणं योग्य ठरतं. अंगावर सैलसर आणि तलम कापड लागेल तेवढं कमी गरम होईल. कमी गरम होण्यासाठी सुती कपड्यांचा वापर करावा. अतिशय घट्ट, अंगाला चिटकणारे कपडे वापरू नयेत. कापड निवडताना काळजी घ्यावी. घाम शोषून घेणारे कपडे वापरावेत. या दिवसांमध्ये सिल्क, सिंथेटिक आणि नायलॉनसारखे कपडे अजिबात वापरू नयेत. उन्हाळ्यात या प्रकारचे कपडे घालणं शरीराला नुकसान देणारं ठरतं. कपडे निवडताना रंगाची देखील काळजी घ्यावी. या दिवसांमध्ये हलक्या रंगाचे कपडे घालावेत. प्रामुख्यानं पांढर्‍या रंगाचे कपडे घालावेत. या दिवसांमध्ये काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नये तसंच भडक रंगाचे कपडेही घालू नयेत. सूर्यप्रकाश शोषून घेणारे कपडे चक्क कपाटामध्ये ठेवून द्यावेत. दागिन्यांबद्दल बोलायचं तर उन्हाळ्यात ईअर रिंग्जव्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट वापरू नये. पुरुषांनीही कमीत कमी अ‍ॅक्सेसरीज वापरणं चांगलं. यामुळे कमी गरम होतं. मेटलच्या गोष्टींचा कमी वापर केल्यासही उकाड्याचा त्रास कमी प्रमाणात जाणवतो.
या काळात गारवा मिळावा यासाठी घरोघरी 24 तास पंखे सुरू असतात. काही ठिकाणी एसी सुरू असतात. मात्र या दोहोंचाही विपरीत परिणाम होतो. एसीचे परिणाम अधिक तीव्र असतात. त्यामध्ये त्वचा कोरडी पडणं, केस गळणं, सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, खोकला या आजारांबरोबरच डोळे कोरडे पडण्याच्या आजाराचाही समावेश असतो. सतत सुरू असणार्‍या पंख्यामुळे डोळे कोरडे पडतात. संगणकावर काम करत असताना अधूनमधून 20-25 मिनिटांच्या कालांतरानं दूरवर नजर टाकणं अनेकांना शक्य होत नाही.
कामात व्यत्यय येतो म्हणून अनेकजण सलग चार-पाच तास संगणकावर काम करत राहतात. त्यामुळे काम चांगलं होतं, मात्र शरीरावर दुष्परिणाम होतात. डोळे दुखणं, डोकं दुखणं, अंगदुखीबरोबर डोळे कोरडे पडल्यामुळे काही काळ धूसर दिसणं असा त्रास सहन करावा लागतो. डोळे कोरडे पडल्यामुळे लवकर थकवा येतो. डोळे चुरचुरू लागतात. डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं वाटू लागतं. याच दरम्यान अनेकांना डोळ्यांच्या पापण्यांवर सूज येण्याचा त्रास होतो. याला ‘स्टाय’ असं म्हणतात. शिवाय अ‍ॅलर्जी आणि पिंगेकुला किंवा टिरीगिअम यांचा त्रासही सहन करावा लागतो. या आजारात डोळ्यांमध्ये गुलाबी आणि त्रिकोणी आकाराच्या पेशींची वाढ होते. सध्या डोळे कोरडे पडण्याप्रमाणेच अ‍ॅलर्जी आणि टेरेगिअमचंही प्रमाणही वाढलं आहे.
डोळ्यांचे विकार होण्यास प्रामुख्यानं धूळ कारणीभूत असते. खेरीज परागकण, धूर, सौंदर्यप्रसाधनं, काही झाडं किंवा बुरशी यांच्यामुळे डोळ्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात हे प्रमाण वाढतं कारण या दिवसांमध्ये शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. योग्य काळजी घेतली न गेल्यास काही रुग्णांमध्ये उष्माघातापर्यंतचे गंभीर आजारही बघायला मिळतात. शरीरातलं पाणी कमी झालं की साहजिकच डोळ्यांवरही परिणाम होतो आणि डोळे कोरडे पडतात. दृष्टीचा विचार करता अश्रूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नेहमीच डोळ्यांमध्ये अश्रू किंवा ओलावा असणं ही डोळे निरोगी राहण्यासाठीची प्राथमिक गरज आहे. ती ओळखून भरपूर वारा असणार्‍या ठिकाणी फिरताना गॉगल घालावा, विमानप्रवासात डोळे कोरडे होणार नाही याची काळजी घ्यावी. याखेरीज डोळ्यातल्या तेलाचं प्रमाण कमी झालं असेल तर पुरेसा ओलावा मिळण्याआधीच बाष्पीभवन होऊन अश्रू सुकून जातात आणि त्यामुळेही डोळे कोरडे पडू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार घ्या. यामुळे उन्हाळा सुसह्य होण्यास मदत होईल. 

Exit mobile version