हेमंत देसाई
कोरोनाचं संकट जवळपास दूर झालं असताना आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची आणि सर्व पातळ्यांवरील स्थिती सुधारत असताना एक सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. नागरिकांची क्रयशक्ती वाढत असल्यामुळे देशातलं उत्पादन आणि उद्योगविश्व नव्या उमेदीनं कार्यप्रवण झालेलं दिसत आहे. तरुणाईच्या उद्योगशीलतेला मोठं पाठबळ मिळताना दिसणं अत्यंत आश्वासक आहे.
अलिकडच्या काळातली विविध क्षेत्रांमधली भारताची प्रगती नजरेत भरण्याजोगी आहे. विशेषत: कोव्हिड महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेला जबर झटका बसलेला असताना अनेक क्षेत्रांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यापूर्वी सरकारकडून अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा झाली होती आणि त्याकडे तरुणाईबरोबरच नागरिकांच्या एका वर्गाचं लक्ष वेधलं गेलं होतं. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन, कुशल कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण, स्टार्ट अप इंडिया यासारख्या योजनांमुळे देशात एक प्रकारची वातावरणनिर्मिती झाली होती. स्मार्ट सिटीसारख्या योजना आणि घोषणाही लक्षवेधी ठरत होत्या. मात्र कोरोनासारखं संकट आलं आणि तब्बल दोन वर्षांचा प्रदीर्घ काळ ठाण मांडून बसल्यामुळे देशपातळीपासून वैयक्तिक पातळीपर्यंत प्रत्येक स्तरावरील आर्थिक घडी विस्कटली. ही घडी पुन्हा बसणार की नाही आणि बसली तरी त्यासाठी नेमका किती वेळ लागेल याविषयी सगळ्यांनीच तीव्र चिंता व्यक्त केली. मोठमोठ्या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था क्षतिग्रस्त होताना दिसत असताना भारतासारखा देश यातून कसा बाहेर पडणार याविषयी अनेकांना अनेक शंका होत्या. त्यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी परकीय गुंतवणुकीचा ओघ आणण्यासाठी अनेक परदेश दौरे केल्याचं आणि त्याचा परिणाम दिसत असल्याचं अनेकांच्या स्मरणात होतं. मात्र कोरोनाकाळात सगळ्याच उद्योगांना फटका बसत असताना आता त्यावर काय परिणाम होईल आणि त्यातून देशातल्या उद्योगविश्वाला नेमकं काय गमवावं लागेल याविषयीदेखील विविध मतं मांडली जात होती. आता मात्र कोरोनाचं संकट जवळपास दूर झालेलं असताना आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची आणि सर्व पातळ्यांवरील स्थिती सुधारत असताना एक सकारात्मक चित्र बघायला मिळत आहे. नागरिकांची क्रयशक्ती वाढत असल्यामुळे देशातलं उत्पादन आणि उद्योगविश्व नव्या उमेदीनं कार्यप्रवण झालेलं दिसत आहे.
बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सुकाणू गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे भांडवली बाजारात आनंदाचं वातावरण आहे. देशाच्या भांडवली बाजारातली ही आजवरची सर्वात मोठी सार्वजनिक भागविक्री आहे. दुसरी लक्षवेधी बातमी म्हणजे चालू वर्षात केवळ एप्रिलमध्येच 17 लाख एअर कंडिशनर्सची विक्री झाली आहे. एप्रिल 2021 च्या तुलनेत ही विक्री दुप्पट आहे आणि एप्रिल 2019 मधल्या आकडेवारीपेक्षा 30 ते 35 टक्के जास्त आहे. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या, म्हणजे एप्रिल महिन्यात भारताच्या निर्यातीत 24 टक्के वाढ झाली असून ही निर्यात 38 अब्ज डॉलर्स झाली आहे. जगातल्या विविध राष्ट्रांमधलं ऊर्जा संकट आणि वाढलेल्या किंमतींमुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीला मदत झाली आहे. या उत्पादनांची निर्यात सात अब्ज डॉलर्स इतकी झाली तर अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात नऊ अब्ज डॉलर्स इतकी झाली. थोडक्यात, सर्वच काही नकारात्मक आहे असं मानण्याचं कारण नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे आता भारतातला व्यापार आणि उद्योगाचं वातावरण कोरोनाच्या खाईतून बाहेर येत आहे. ‘झेप्टो’ या इन्स्टंट ग्रोसरी स्टार्ट अपने वीस कोटी डॉलर्स इतक्या भांडवलाची उभारणी केली आहे. वाय कॉम्बिनेटरच्या नेतृत्वाखाली ही भांडवल उभारणी झाली आणि स्थापनेनंतरच्या नऊ महिन्यांमध्येच कंपनीचं मूल्यांकन 90 कोटी डॉलर्स इतकं झालं.
कोरोनामुळे सर्वजण घरी बसून असताना ऑनलाइन व्यवसाय भरभराटीला आला. त्यामुळे लोकांना घरच्या घरी वाणसामान, भाज्या, फळे, कपडेलत्ते, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींची खरेदी करण्याची सवय लागली. आता तर ऑर्डर दिल्यानंतर जेवढ्या वेगानं माल घरपोच देईल तेवढा त्या कंपनीचा धंदा बरकतीस येतो. ‘झेप्टो’चा माल तर ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये घरी येतो. ‘झेप्टो’ हा स्टार्ट अप सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांमध्येच ‘कैसर परमनेंटे’ या नवीन गुंतवणूकदाराने आपला निधी कंपनीत ओतला. खेरीज नेक्सस व्हेंचर पार्टनर्स, ग्लेड ब्रुक कॅपिटल आणि लॅची ग्रूम या सिलिकॉन व्हॅलीतल्या कंपन्यांनी आपली झेप्टोमधली गुंतवणूक वाढवली. परिणामी, झेप्टोमधल्या विविध कंपन्यांचा एकूण निधी आता 36 कोटी डॉलर्सपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एखाद्या नव्या कंपनीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडवल येतं तेव्हा ग्राहकांचा त्या कंपनीवरचा विश्वासही प्रकट होतो आणि त्या कंपनीच्या भविष्याबद्दलची खात्रीदेखील वाढते. आदित पलिशा आणि कैवल्य व्होरा या दोन बालमित्रांनी ‘झेप्टो’ सुरू केली. दोघेही स्टॅनफोर्ड विद्यापीठात संगणक विज्ञान शिकत होते. परंतु दोघेही अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परतले आणि झेप्टोची स्थापना केली. उभयतांचं वय अवघं 19 वर्षं आहे. परंतु या दोघांचं डोकं अफलातून आहे. केवळ दहा मिनिटांमध्ये सेवा देण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची कार्यक्षमतादेखील वाखाणण्यासारखी आहे.
झेप्टोमुळे गूगलचं पाठबळ असणारी ‘डन्झो’, सॉफ्टबँक समूहाचं समर्थन असणारी ‘ब्लिंकइट’ आणि नॅस्पर्स लिमिटेडचं छत्र असणारी ‘स्विगी’ या कंपन्याही हादरल्या असणार. भारताची रिटेल बाजारपेठ एक ट्रिलियन डॉलर्सची आहे. त्यामध्ये ‘अॅमेझॉन’ आणि ‘वॉलमार्ट-फ्लिपकार्ट’ या कंपन्या आघाडीवर आहेत.
गेल्या तिमाहीत झेप्टोची उलाढाल 800 टक्क्यांनी वाढली. आता झेप्टोमध्ये एक हजार माणसं काम करतात. लवकरच ही कंपनी मुंबईच्या काही ठरावीक भागांमध्ये कॉफी, चहा यासारख्या गोष्टीही उपलब्ध करून देणार आहे. झेप्टोसारख्या कंपनीच्या यशामुळे भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये व्यवस्थापकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आपणही नवा स्टार्टअप सुरू करावा, असं वाटू लागलं आहे.
एकीकडे केंद्र सरकारकडून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसाठी नुकतंच 820 कोटी रुपयांचं अर्थसाह्य मंजूर करण्यात आलं आहे. बँकेला आर्थिक सर्वसमावेशकतेच्या उपक्रमासाठी आणि बँकिंग व्यवस्था न पोहोचलेल्या देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी सेवा पुरवण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेतली 77 टक्के खाती ग्रामीण भागात उघडली गेली आहेत. एकूण सव्वापाच कोटी खात्यांपैकी जवळपास निम्मी खाती महिलांची असून त्यात एक हजार कोटी रुपये जमा आहेत. या बँकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी 7.8 लाख खाती उघडण्यात आली आहेत. पोस्ट पेमेंट्स बँकेमुळे ग्रामीण अर्थव्यवहार वाढणार आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे तिथल्या उद्योजकतेला चालना मिळणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बंगळुरूमधल्या ‘ओपन’ या निओ बँकिंग फिनटेक पोर्टलने पाच कोटी डॉलर्सची भांडवल उभारणी केली आहे. त्यात सिंगापूरच्या ‘टेमसेक’, अमेरिकेतल्या ‘टयगर ग्लोबल’ आणि ‘थ्रीवनफोर कॅपिटल’ या भारतीय कंपनीनं गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीचं मूल्यांकन एक अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचलं आहे. यापूर्वी या स्टार्ट अपमध्ये गूगल, व्हिसा, जपानची सॉफ्टबँक यांनी गुंतवणूक केली होती. ‘ओपन’ ही भारतातली शंभरावी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. एक अब्ज डॉलर्स इतकं मूल्यांकन असणारी ही कंपनी युनिकॉर्नमध्ये मोडते. अशी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध नसते.
2020-21 च्या आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे की सर्वात जास्त युनिकॉर्न असणार्या देशांचा विचार करता अमेरिका आणि चीननंतर आता भारताचा क्रमांक लागतो. यापूर्वी ब्रिटन तिसर्या स्थानावर होता. मात्र आता भारताने त्याला मागे टाकलं आहे. या अशा स्टार्ट अप कंपन्यांमध्ये उज्ज्वल भविष्याची चाहूल दिसल्यामुळे देश-विदेशामधले अव्वल आणि नामांकित गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. भारतात रतन टाटा यांच्यासारखे ख्यातकीर्त उद्योगपतीदेखील तरुण-तरुणींच्या कल्पक उपक्रमांना आर्थिक पाठबळ उभं करुन देत असतात.
थोडक्यात, उद्योजकतेमधली घराणेशाही संपून, कोणतीही आर्थिक पार्श्वभूमी नसणार्या युवावर्गाला व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी सध्याचं वातावरण अनुकूल असणं ही अतिशय दिलासादायक बाब आहे.






