आता उरल्यात फक्त आणि फक्त आठवणीच…

उदय खोत

‘आज बरोबर 73 वर्षे झाली त्या घटनेला ….आज 87 व्या वर्षीही तिची जराशी जरी आठवण झाली तरी देखील अंगावर सर्कन काटा उभा राहतो. ते चित्र माझ्या डोळ्यासमोरुन हालत नाही. मी माझ्या आईवडिलांसह आजी,आत्या, काका, काकी, चुलत भाऊ, बहिणीला एका क्षणात गमावले आहे. केवळ पंढरपूरच्या वारीने मिळालेले मानसिक व आत्मिक बळ व मजगावचे ग्रामदैवत मल्हारी दत्तांच्या कृपेनेच वाचलो. हे उद्गार 87 वर्षे वय असलेले व या वयातही पोटाची खळगी भरण्यासाठी भाजीपाला व फळे विक्रीचे दुकान चालविणार्‍या मजगावच्या जगन्नाथ गोरक्षनाथ मुंबईकर यांचे….
रामदास बोट दुर्घटनेला आज 17 जुलै रोजी 73 वर्षे पूर्ण झाली असून मुंबईकर हे मुरुड तालुक्यातील मजगाव गावचे या दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी एकमेव साक्षिदार आहेत.
पंढरपूरच्या वारीसाठी आजी, आजोबा, आई वडिलांसह काका, काकी, आत्या तिचे पती, चुलत भाऊ, बहिण आदी आठदहा जणांबरोबर ते वारी पूणर्र् करून भाऊच्या धक्क्यावरुन रेवसमार्गे मजगावला परतणार होते. मुरुडमधील साठ ते पासष्टजण त्यावेळी बोटीतून प्रवास करणारे प्रवाशी होते.त्यावेळी ते केवळ दहा वर्षाचे होते.ते सर्वजण सकाळी आठ वाजताच भाऊच्या धक्क्यावर पोहचले तिकीटे मिळाल्यामुळे ते खूश होते. अमावस्येचा दिवस असला तरीही स्वच्छ हवामान होते. त्यामुळे कसलीही काळजी नव्हती.
त्याकाळी बॉम्बे शिपिंग कॉर्पोरेशनच्या रामदास व जयंती या दोन प्रवासी बोटी भाऊचा धक्का ते रेवस अशा प्रवाशी वाहतूकीच्या बोटी होत्या. रामदास ही तीन मजली मोठी बोट होती.
वारीहून परतलेल्या तसेच व्यापारी व अन्य प्रवाशांच्या मोठ्या संख्येने बोट पूर्णपणे भरली होती. मुरुड जंजिर्‍याचे नबाबही याच बोटीने मुरूडला येणार होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे येणे रद्द झाले. सकाळी नऊ वाजता तिने धक्का सोडला आणि सपासप पाणी कापत ती काशाच्या खडकाजवळ आली.काळच जणू न्यायला यावा तसा हवामानात एकदम बदल झाला.सोसाट्याचा वारा वाहू लागला व जोराजोरात पाऊस पडू लागला बोटीचे पडदे सर्वांनी बंद करुन घेतले. आधीच तिरकी चालत असलेली रामदास बोट एका मोठ्या लाटेवर भरकटली. कॅप्टनने तिला सुकाणूच्या सहाय्याने वळवण्याचा प्रयत्न करताच ती एका बाजूला कलंडली तसे प्रवाशीही त्या बाजूकडे सरकले एका बाजूला वजन होताच बोटीत पाणी घुसले कॅप्टनसह सर्वजण घाबरले आणि काय होत आहे हे कळायच्या आतच बोट बूडू लागली.धावा…वाचवा….सर्वत्र आर्त किंकाळ्यांनी… आक्रोशाने आसमंत भरुन गेला… काहींनी बाहेर उड्या मारल्या.. तर कित्येक जण बुडू लागले. मुंबईकरांचे आजोबा मच्छीमारच होते. त्यांच्या गळ्यात असलेल्या चाकूने त्यांनी समय सूचकता दाखवित बोटीचे पडदे फाडून आई आजी व इतरांसह त्यांना बोटीतून बाहेर खेचून काढले त्यांच्या केसांना धरून ते मोठ्या हिमतीने पाण्यात पोहू लागले. त्यांनी मुंबईकरांना बाहेर काढताच शेजारच्या कोंडाजी यांनी त्यांना आपल्या पाठीवर बसवले. समुद्राचे पाणी बोटीत घुसताच बोटीतील ब्रॉयलरचा स्फोट झाला आणि त्यातील गरम पाण्याने कित्येकजण भाजले तर पलटी झालेल्या बोटीखाली दाबले गेले त्यांना जल समाधी मिळाली. दरम्यान बोटीतील बाहेर पडलेल्या पाण्यावर तरंगत असलेल्या एका मोठ्या बोयाला पकडून मुंबईकरांचे आजोबा, मुंबईकर कोंडाजी व अन्य पाचसहा जण पहाटे पर्यंत आलेल्या संकटाशी टक्कर देत होते. एका हेलिकॉप्टरने काहींना वाचवले. रेवसकडून आलेल्या एका बोटीने आमच्याकडे दुर्लक्ष करीत निघून जाणे पसंत केले. बर्‍याच वेळाने आलेल्या दुसर्‍या एका बोटीने आम्हाला वर घेतले. बोटीत आग पेटवून गरम केले. तेव्हा कुठे धागधूगी आली. त्यांनी रेवसला सोडून अलिबागला जिल्हाधिकार्‍यांना खबर दिली. पोलीस गाडीने आम्हाला दवाखान्यातून उपचार करून घरी सोडण्यात आले.दुसर्‍या दिवशी रात्रौ दहा वाजता त्या काळात चालणार्‍या युनियनच्या खाजगी गाडीने मजगावला घरी पोहचलो.काळाच्या आक्राळविक्राळ जबड्यातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलो होतो. काळ आला होता पण वेळ मात्र आली नव्हती. माझ्या डोळ्यादेखत माझे आई वडिल व नातेवाईक गेले. दुर्घटनेची माहिती सांगतांना त्यांच्या वार्धक्याने सुकलेल्या डोळ्यातही अश्रू टपकतात. पण काळापुढे हार न मानताही रेवस भागातील मच्छीमारी बोटीवर अनेक वर्षे खलाशी म्हणून त्यांनी काम केले. त्यांची तिन करतीसवरती मुलेही कामाधंद्याला लागली आहेत. तर ते स्वतः छोट्या मुलाच्या भाजीपाला फळे विक्रीच्या दुकानात आजही न थकताभागता काम करीत आहेत.आजूनही त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. शासनाकडून आजवर ना कोणी दखल घेतली ना मृत पावलेल्यांना मदत केली. याची खंत त्यांना अद्यापही वाटत आहे. अलिबाग तालुक्यातील बारक्याशेठ मुकादम याच दुर्घटनेतून बचावलेले त्यांचे काही तिन वर्षांपूर्वीच निधन झाले.नांदगावचे अल्लिमिया बाळू(हलडे), रकबीचंद जैन हे देखील याच बोटीतून बचावलेले त्यांचे निधन कधीच झाले आहे.परंतु मुंबईकर हे आता एकमेव बचावलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उरले आहेत ईश्‍वराने त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.

Exit mobile version