आगोठ शेतकर्‍यांंचा कसोटीचा काळ

बळवंत वालेकर

लग्न समारंभाचा उच्चांक गाठणारा, हळदीमुळे  गाजलेला, गर्दीमुळे स्मरणात राहणारा मे  महिना संपला व  पाऊस देणारा जून महिना सुरू झाला. 7 जूनला मृग नक्षत्राचा प्रारंभ होतो. शेतकरी पावसाची अपेक्षा करीत पेरणी करतो व नांगरणीसाठी सज्ज होतो. पावसाची रिपरिप, सोसाट्याचा वारा, ढगांचा कडकडाट व विजांचा चमचमाट सहन करण्याची क्षमता तयार होते.  पेरणी, लावणी व नांगरणीची आणि लावणीची कामे सुरळीत होण्यासाठी तो आगोठीची कामे उरकण्यात तो दंग होतो. सर्वत्र यंत्र युगाचा उदय झाल्यामुळे माणूस आळसावला आहे. शेतकर्‍याची कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत आहे. पारतंत्र्य काळात विकासाचा सूर्य खेडोपाडी उगवलेला नव्हता.  गावाकडे जाण्यासाठी पाऊलवाट  हीच वहिवाट होती. शेतकर्‍यांच्या साथीला फक्त बैलगाडी होती. पाऊस पडला की गावाकडे तसेच भातशेतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद होत. पर्यायाने बैलगाडी बंद होत असे. म्हणून बैलगाडीच्या सहाय्याने होणारी कामे पावसाची सर पडण्यापूर्वी उरकली जात. सर्वत्र अठराविश्‍व दारिद्य्र असल्यामुळे कच्ची घरे होती. मातीची घरे पेंढ्याने अगर गवताने शाकारली जात. पेंढारू घरे ऊन, वारा व पावसामुळे काळीकुट्ट होत. म्हणून ती दरवर्षी शाकारावी लागत. केंबळी (ऊन व पाऊस खाल्ल्यामुळे काळाकुट्ट झालेला पेंढा) राबासाठी उपयुक्त ठरतो. पूर्वी राब शेणाने तयार करून ते केंबळी अगर पाला- पाचोळ्याने भाजत असत. अशा राबात केलेल्या पेरणीत 21 दिवसांच्या कालावधीनंतर रोपे लावणीयोग्य होतात. तर अति मेहनतीने तयार केलेली रोपे 18 दिवसांत लावणीयोग्य होतात. अलिकडे  राब शेणाऐवजी (शार्ट कट) कृत्रिम खताच्या सहाय्याने तयार करतात. पूर्वी मृग नक्षत्राचा पाऊस अखंडित पडत असे.  म्हणून काही शेतकरी 20-20 खंडीच्या शेतीची लावणी वट पौर्णिमेला पूर्ण करीत असत.  
(हे काहींना अतिशयोक्ती पूर्ण  वाटेल). या हंगामात गावात दिवसा माणसे दिसत नसत. बाजारपेठा ओस पडत. एस्.टी. मध्ये प्रवाशी कमी होत.  शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढलेली आढळे.
पूर्वी दळणवळणाची साधने   नव्हती. बैलगाडी हेच शेतकर्‍याचे वाहन होते. सर्वत्र कच्चे रस्ते होते. पावसाची पहिली सर येताच हे रस्ते बंद होत. म्हणून घराला लागणार्‍या वस्तु – किराणा माल, कापड-चोपड, घोंगड्या, गुरांचे खाद्य इ. पाऊस पडण्यापूर्वी बैलगाडीने बाजारातून आणित. पूर्वी मिक्सर, ग्राइंडर, रोटीमेकर, कटर, वॉशिंग मशीन अजिबात नव्हत्या. घरटीने भात भरडले जाई. पाखडून तूस व भात वेगळे केले जात असे. जात्याने तांदूळ दळून भाकरी साठी पीठ काढले जाई. घरा घरात उखळ-मुसळ, जाते – घरटे कुर्‍हाड, विळा, कोयता, खरळ यांना मानाचे स्थान होते. घरटी तसेच जाते-वरवंट्यास वापरल्यामुळे (घर्षण झाल्यामुळे) टाकी देत असत. आता यंत्र युग सुरु झाल्यामुळे टाकी देऊन उदर निर्वाह करणार्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरापासून दूर असलेल्या विहिरीतून पोहर्‍याच्या सहाय्याने पाणी काढून ते हंड्यात भरत. हे हंडे डोक्यावरून वाहून आणत असत. पाणी भरण्याचे काम महिला सूर्योदयापूर्वी करीत. त्यानंतर दिवसभराची कामे त्या उरकीत असत. अवयवांची भरपूर हालचाल व प्रदूषण विरहित वातावरण असल्यामुळे महिला   आजाराला सहसा बळी पडत नसत. गरोदर महिला दैनंदिन  कामे करता करता खाजगी  सुईणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूत होत. आजच्यासारखी हजारो रुपये उकळणारी सिझरिंगची पद्धती नव्हती.
इरले व घोंगडी झाले इतिहासजमा आगोठ हा शेतकर्‍यांचा कसोटीचा काळ असतो. शेताच्या बांधबंदिस्तीची कामे वेळीच उरकावी लागतात.  घराची शाकारणी, गुरांच्या वाड्याची डागडुजी करावी  लागते. जळणासाठी लाकूड फाटा आणून तो वाळवून त्याची साठवणूक करावी लागत असे.  कारण सुकी फाटी असतील तरच पावसाळी चूल पेटते. व हंगामात  वेळीच जेवण होते. गुरांसाठी-विशेषत; नांगरणी करणार्‍या गुरांसाठी-पेंढा खरेदी करावा लागतो. त्याची गोठ्यात साठवणूक केली जाते. घराची व वाड्याची दुरुस्ती होते. वेळ प्रसंगी छप्पर बदलावे लागते. भात बियाण्याची विशेष काळजी  घेतो. बैललगाडी सतत वापरात असल्यामुळे बैल मांडवात (घराजवळ) बांधलेले असतात. पूर्वी रेडे राना-वनात सोडलेले असत. पेरणीपूर्वी त्यांना शोधून आणत. नांगरणी करणे हे अति कष्टाचे व त्रासाचे काम असते. म्हणून नांगर्‍यास अति महत्त्व असते. तो आधीच बुक करावा लागतो. शिवाय त्यास अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. पूर्वी ट्रॅक्टर व पावर टिलर नव्हते. म्हणून नांगर वादातीत होता. नांगर तयार करण्यासाठी इसाड, लुमणी, जोकड, शिवला, पालवा, या वस्तू विशिष्ट आकाराच्या असाव्या. त्या राना वनात जाऊन शोधाव्या लागत. त्यानंतर सुतार त्या लाकडाची साफसफाई करून नांगर तयार करतो. नांगराचा फाळ साधारणतः  जमिनीत 6 ते 8 इंच खोल जावा लागतो. शिवाय बैलाच्या उंचीनुसार नांगर तयार करावा लागतो. बैलाचा व रेड्याचा नांगर यांच्या  जोडणीतही फरक असतो.  नांगरणी करताना दगड धोंडे व झाडाची मुळे आड आल्यामुळे  नांगर मोडतो, नांगरणीत अडथळा येऊ नये म्हणून नांगर त्वरित दुरुस्त करावा लागतो. पूर्वी रस्ते नव्हते. चिखल व दगड- धोंड्यातून वाट तयार करावी  लागे. नांगर खांद्यावर टाकून बैल सोबत घेऊन नांगर्‍या अनवाणी  शेतापर्यंत जात. पडत्या पावसात,  थंडी वार्‍यात नांगरणी करावी  लागते, वेळप्रसंगी पडत्या पावसात बांधावर जेवण उरकावे लागते. नांगर्‍यास घोंगडीचा आधार असतो, प्लॅस्टिक कापड, खोल, रेनकोट पूर्वी नव्हते,  नांगर्‍यासाठी घोंगडी खरेदी  केल्यानंतर तिचा खडबडीतपणा जाण्यासाठी ती मळावी लागते. शिवाय रोठ घालावी लागते.  तरच ती वापरण्यायोग्य होते व  दीर्घ काळ टिकते. घोंगडीमुळे नांगर्‍याचे दोनही हात मोकळे  असतात. एका हाताने नांगर व दुसर्‍या हाताने पालवा धरु शकतो. घोंगडीमुळे मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, ऊन, थंडी यांपासून संरक्षण होते. घोंगडीला ऊब असते. डोक्यावर ती व्यवस्थित बसण्यासाठी विशिष्ट तर्‍हेने बुचडी बांधावी लागते. तिच्या निर्‍या दोन इंच रुंदीच्या असतात. बुचडी घट्ट बांधण्यासाठी वळीव सुतळ वापरतात. दिवसभर चिखलात व पावसात असणारी घोंगडी कडकडीत वाळण्यासाठी रात्री   चुलीवर (पूर्वी गॅस सिलेंडर नव्हते) टांगलेल्या विशिष्ट  आकाराच्या लाकडी बेचकीवर टाकीत असत. चूल पेटताच ती कडकडीत वाळत असे. नांगर्‍याचे काम अति कष्टाचे असते. म्हणून त्यास सकाळी न्याहरी, दुपारी जेवण व रात्री पोस्त व जेवण द्यावे लागते. फाळधुणीच्या दिवशी तो पाहुणाच असतो, आता घोंगडी लुप्त झाली आहे.
इरले – पावसाळा, लावणी व इरले हे समीकरण ठरलेले होते, लावणी करताना, गुरे राखताना, घराबाहेर पडताना इरले हवेच. इरले डोक्यावर घेतल्यामुळे दोनही हात काम करण्यास मोकळे, असतात. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा तसेच ऊन यापासून संक्षण होते. येथे छत्री निरोपयोगी ठरते. ती वार्‍यामुळे उडून जाते. बांबूच्या चिरीव कांबींपासून विशिष्ट आकाराचे इरले बनवितात. त्यासाठी साधारणतः ओला बांबू वापरतात. इरल्याच्या आच्छादनासठी पळसाच्या पानांचा वापर करतात. पानांना अपेक्षित आकार येण्यासाठी ती खडखडीत वाळवून पाण्यात  बुडवून मऊ करतात. इरल्यावर रचलेली पाने सरकू नयेत म्हणून ती ओल्या काथ्याने अगर झाडाच्या सालीने घट्ट बांधतात. इरल्याच्या प्रत्येक आर्‍यामध्ये 4 इंचांचे अंतर असावे. पावसाळ्यात इरले सर्व ठिकाणी वापरत. आता ही जागा छत्री, रेनकोट, खोल इ. नी घेतली आहे. इरले झटकन वाळत असल्यामुळे घोंगडीप्रमाणे वाळविण्याची गरज पडत नाही. इरले दृष्टीस पडताच पावसाळी वातावरण निर्मिती होत असे. अस्तास गेलेले इरले व घोंगडी चे तंत्र नवीन पिढीने आत्मसात करावे, हे आवाहन !

Exit mobile version