‘आता सूर्यान्मुख झालेच पाहिजे’

प्रा. अविनाश कोल्हे

9 जुलै 2022 रोजी दलित पंँथरच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले, भाषणं/ परिसंवाद झाले. 1 मे 1960 रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात दलित पँथरचे खास स्थान आहे. पँथरबद्दल जसे अनेक वाद आहेत तसंच पँथरच्या स्थापना दिनाबद्दलही आहेत. या संदर्भात पँथरचा एक संस्थापक सदस्य नामदेव ढसाळने ‘माझ्या समाजवादी दीक्षेची गोष्ट’ या लेखाच्या सुरूवातीलाच लिहिले आहे. 9 जुलै 1972 रोजी चर्नीरोड, गिरगाव, मुंबई संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यालयातून खाली उतरून मी व माझे कवी मित्र ज. वि. पवार, दोघांनी ‘दलित पँथर’ या संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून 9 जुलै हा पंँथरच्या स्थापनेचा दिवस मानला जातो. त्यानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी हा दिवस साजरा केला जातो.
त्याकाळी महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या राजकारण, समाजकारण आणि साहित्यकलाविश्‍वाला पँथरने जबरदस्त दणका दिला होता. हा दणका काय होता याचा अचुक अंदाज आज 2022 साली येणार नाही; पण नामदेवच्या ‘त्यांची सनातन दया’ या कवितेतील पहिल्या तीन-चार ओळी वाचल्या तर थोडी कल्पना येऊ शकते. नामदेव लिहतो त्यांची सनातन दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही/ खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही/ बोलून चालून ते सामंतशाहा, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश/ लादलेल्या पडीबाज आयुष्यात फूटपाथदेखील आपली नाही/ माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार. या ओळी काळजीपूर्वक वाचल्या की लक्षात येते की दलित पँंथर काय होती, कोणासाठी होती, कशासाठी होती, काय मागत होती आणि कोणाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करत होती. नंतर जरी राजा ढाले आणि ज. वि. पवार यांंनी 7 मार्च 1977 रोजी दलित पँथर विसर्जित केली तरी आजही पँथर वातावरणात असल्याचे जाणवत राहते.
पँथरच्या निर्मितीच्या वेळची स्थिती काय होती हे समजून घेणे गरजेचे आहे. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताने प्रजासत्ताक लोकशाही मान्य करणारी राज्यघटना स्वीकारली. हा एक आगळाच प्रयोग होता. भारतीय समाजाची रचना गेली अनेक शतकं जातीव्यवस्थेवर आधारित आहे. जातीव्यवस्था केवळ एक व्यवस्था नसून त्यात उच्चनीचतेची, स्पृश्य-अपृश्यतेची भावना कार्यरत आहे. प्रजासत्ताक भारतात ही व्यवस्था कालबाह्य होईल आणि जातीच्या आधारे केले जात असलेले सर्वंकष अन्याय (सामाजिक-आर्थिक-राजकीय आणि सांस्कृतिक) संपुष्टात येतील असा आशावाद होता. प्रत्यक्षात तसं झालं नाही. दलित समाजावर होत असलेल्या अन्याय-अत्याचारात घट होतांना दिसत नाही. याचा अंदाज आल्यावर केंद्र सरकारने पेरूमल समिती गठीत केली. या समितीचा अहवाल 1972 साली संसदेत सादर करण्यात आला. या अहवालाने देशभर खळबळ माजवली. पेरूमल समितीने 1945 ते 1970 या काळात देशात दलितांवर झालेल्या अत्याचारांची जी आकडेवारी दिली त्याने सत्ताधारी वर्ग हादरला. या आकडेवारीत महाराष्ट्राची आकडेवारी होती. याचा स्वाभाविक परिणाम मुंबईतील ढसाळ, ढाले, पवार, डांगळे, चेंदवणकर वगैरे तरूणांवर झाला.
इतिहासाची साक्ष काढली तर असे दिसते की पेरूमल समितीच्या अहवालानंतर महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील बावडा या गावी सवर्ण समाजाने अस्पृश्यांवर बहिष्कार टाकला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील परभणी गावात सवर्णांच्या विहिरीवर दोन दलित स्त्रियांनी पाणी पिऊन ती बाटवली म्हणून त्या दोघींची गावभर नग्नावस्थेत धिंड काढली. पेरूमल समितीचा अहवाल आणि हे वास्तव यामुळे उद्विग्न होऊन दलित तरूणांनी ‘दलित पंँथर’ स्थापन केली.
पँथरने सुरूवातीपासूनच आक्रमक घोषणा आणि कार्यक्रम दिला. 9 जुलै 1972 रोजी स्थापन झालेल्या पँथरला स्वतःचा विद्रोह व्यक्त करायला 15 ऑगस्ट 1972 चा रौप्यमहोत्सवी स्वातंत्र्यदिन समोर दिसला. 14 ऑगस्टच्या रात्री सर्वत्र रोषणाई होत असतांना दलित तरूण हातात काळे झेंडे घेऊन मोर्चा काढत होते. या प्रकारे दलित पँथरने अनेक समविचारी संघटनांसह ‘स्वातंत्र्याचा काळा दिवस’ साजरा केला. या निषेधात पँथरबरोबर इतर जवळपास पंधरा संघटना होत्या. युक्रांद, कम्युनिस्ट पार्टी, लाल निशाण पक्ष वगैरेंच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. या घटनेच्या जोडीने उल्लेख करावा लागतो साधना साप्ताहिकाचा स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी अंकाचा. या अंकात राजा ढालेच्या तो गाजलेला आणि पुढे वादग्रस्त ठरलेला लेख होता. यामुळे दलित पँथर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली.
आज असे म्हणावे लागते की ही प्रसिद्धी, ढसाळ-ढाले यांच्यातील तात्विक मतभेद (आंबेडकरवादी की मार्क्सवादी) वगैरेंमुळे पँथरमध्ये फाटाफुट सुरू झाली. ढसाळ आणि ढालेंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांना पँथरमधून बाहेर काढले. नंतर ढालेंनी तर 1977 साली दलित पँथर बरखास्त करून ‘मास मूव्हमेंट’ काढली. पण नंतर कोणत्याच नेत्याला ‘दलित पँथर’सारखी अफाट लोकप्रियता मिळवता आली नाही.
काही अभ्यासकांच्या मते पँथर एका टप्प्यानंतर प्रभाव पाडू शकली नाही याचे कारण म्हणजे पँथरच्या वैचारिक भूमिकेत अनेक उणिवा होत्या. पँथरने सांस्कृतिक-साहित्यिक लढ्यांवर जास्त लक्ष दिले. त्या तुलनेने आर्थिक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले. पँथर शेतमजुरांचा प्रश्‍न, गायरान शेती वगैरे प्रश्‍नांना कधी जोरकसपणे भिडली नाही. हे संघटन मूलतः शहरी होते.
या आणि अशा अनेक कारणांनी पँथरचा प्रभाव ओसरत गेला. आज पँथर फक्त नावालाच अस्तित्वात आहे. 2022 साली कधी नव्हे तो दलित समाजासाठी पँथरसारख्या लढाऊ, आक्रमक संघटनेची गरज आहे. जागतिकीकरणाने सरकारी रोजगार कमी होत आहेत, शिक्षण महाग होत आहे. अशा स्थितीत दलित समाजासमोर असलेली आव्हानं अधिकच बिकट झालेली आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी फार व्यापक आणि सर्वसमावेशक होती. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यानंतर आंबेडकरी चळवळ एकजातीय पायावर उभी राहिली होती. आजच्या स्थितीत या चळवळीला अधिक व्यापक अधिष्ठान असणे गरजेचे आहे. मात्र यासाठी आजच्या अनेक नेत्यांना स्वतःचे आग्रह-दुराग्रह सोडावे लागतील. आज सुसंवाद तर दूर राहिला साधा संवादसुद्धा होत नाही. यासाठी आंबेडकरी चळवळीत ऐक्य झाले पाहिजे. जशी 1957 साली स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षात लवकरच फाटाफुटीला सुरूवात झाली होती तशीच दलित पंँथरमध्येसुद्धा झाली. हा दुहीचा शाप आजही आंबेडकरी चळवळीला भोवत आहे. यावर मात करायची असेल तर आंबेडकरी चळवळ व्यापक झाली पाहिजे. बाबासाहेबांच्या पक्षाने 1937 सालच्या प्रांतांत झालेल्या निवडणूका मुंबई प्रांतांतून तब्बल तेरा आमदार निवडून आणले होते. आज आंबेडकरी चळवळीतील एकाही राजकीय संघटनेला तेरा नगरसेवकसुद्धा निवडून आणता येत नाही. हे अपयश नजरेआड करता येत नाही.
आंबेडकरी चळवळीचा इतिहास बघितला तर 1959, 1963, 1974 आणि 1989 साली ऐक्याचे फसवे प्रयोग झाल्याचे दिसून येते. यातील ऐक्याचे अनेक प्रयत्न निवडणूकीचा मुद्दा समोर आला की हमखास फुटते हेही लक्षात घेतले पाहिजे. भीमशक्तीचे ऐक्य होऊ नये असं वाटणार्‍या शक्ती जशा बाहेर आहेत तशाच त्या आतसुद्धा आहेत. यातील शोकांतिका अशी की असे व्यक्तिगत स्वार्थ, स्पर्धा, हेवेदावे बाबासाहेबांच्या हयातीतसुद्धा होते. तेव्हासुद्धा बाबासाहेबांचे अनेक सहकारी कटकारस्थानं करत होते. फक्त हे बाबासाहेबांसमोर होत नव्हते, एवढेच. मात्र त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर लगेच व्यक्तिवाद समोर आला. पुढचे रामायण सर्वांना माहिती आहेच.
पँथर टिकू नये, सळसळत्या रक्ताच्या पँथरमध्ये फूट पडावी यासाठी बाहेरच्या शक्ती कार्यरत होत्या असे म्हटले जाते. त्यात तथ्य आहेच. अनेक राजकीय पक्षांनी पँथरच्या नेत्यांना प्रलोभनं दाखवली. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालेसुद्धा. याचा परिणाम असा झाला की राजकीय क्षेत्रात पँथरला कधीही यश मिळाले नाही. पँथरने सुरूवातीला ठरवले होते की राजकीय क्षेत्रात ती रिपब्लिकन पक्षाचा आणि काँगे्रसचा पराभव करेल. प्रत्यक्षात तसं झालं नाही. 1980 साली झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचे निकाल डोळ्यांसमोर ठेवले तर स्पष्ट दिसते की आंबेडकरी जनतेने काँगे्रसला मतदान केले होते. आंबेडकरी जनतेसाठी आजची स्थिती तेव्हा होती त्याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र आज पँथरसारखी संघटना नाही. तरीही आशावादी असण्याला पर्याय नाही. अशा स्थितीत नामदेव ढसाळच्या ‘आत्ता’ या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आठवतात : ‘सूर्यफुले हाती ठेवणार फकीर हजारो वर्षांनंतर लाभला/आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे’.

Exit mobile version