जनतेशी नाळ जुळलेला नेता

डॉ. किसन माने

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा आज पहिला स्मृतिदिन. आमदार म्हणून निवडून येण्यात आबासाहेबांनी जागतिक विक्रम केला. 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र त्यातून बाहेर येऊन त्यांनी जिद्दीने पुन्हा विजय खेचून आणला. त्याची ही हकिगत. एका आगामी पुस्तकातून.

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांच्या राजकारणात एकाच मतदारसंघात एकाच पक्षातून एकरावेळा निवडून येणारे भाई डॉ. गणपतराव देशमुख महाराष्ट्रातील राजकारणातील एक आदर्श आणि अभ्यासपूर्व व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 साली झाला. तब्बल अकरा वेळा सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भारतात ते एकमेव आमदार आहेत. समानतेच्या तत्वामुळे कोणतेही जातीपात मानणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती म्हणून लोक त्यांना भाई, आबासाहेब, ऋषितुल्य असे अनेक नावाने लोक त्यांना संबोधत असत. शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील ज्येष्ठ राजकारणी व्यक्तिमत्व असणारे सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून येऊन तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांचे 10 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे.
आपल्या तरुण वयापासून ते एक लढवय्या नेतृत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. आपली वकिली पेशा सांभाळत असताना आपण या आपण पण या समाजाला काहीतरी देण लागतो. या भावनेतून त्यांनी दिन दुबळ्या गरीब पुरुष महिला, मागासलेले, शेतकरी कामगार यांच्यासाठी अनेक लढाया त्यांनी लढल्या.
1978 च्या पुलोद राजवटीत आणि 1999 च्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषविले आहे. कायमस्वरुपी दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या सांगोल्याचा आज जो काही कायापालट झालेला आहे. त्या पाठीमागे भाई गणपतरावांचे प्रयत्न, चिकाटीने काम करण्याची जिद्द आहे. साठच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी आंदोलनानंतर राजकारणाचा बाज हा पक्षाची ध्येय धोरणे व वैचारिक पायावर आधारित होता. मार्क्सवादी विचारांना प्रमाण मानणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने गरीब लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, उपेक्षितांच्या प्रश्‍नांवर विधानसभेत अनेक वेळा त्यांनी आवाज उठविला आहे. वयाच्या 90 व्या वेळी सुद्धा पायाला भिंगरी सावल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या गाठीभेटी घेणे सोडले नव्हते. विधिमंडळात त्यांचे मुद्देसूद भाषण आणि त्यांची प्रश्‍न मांडण्याची पद्धत अनेक राजकारणी लोकांना प्रेरणादायी ठरले आहे.
आपले साडेपाच दशकाच्या आमदारकीच्या काळात त्यांनी आधी समाजकारण आणि नंतर राजकारण या मुलतत्वावर काम केले आहे. विधेयकाच्या चर्चेत अनेक वेळा सहभाग घेऊन एक उत्तम संसद पट्टू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. सध्या महाराष्ट्रात वैयक्तिक स्वार्थ व लाभ मिळवणे आपल्याच पक्षाला अडचणीत आणून स्वतःचे हित बघणार्‍या राजकीय नेत्यांनी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचा आदर्श घ्यावा असे सर्व लोकांच्या भावना निर्माण झाल्या आहेत.

राजकारणाविषयी ते स्वतः म्हणतात, ः “राजकारणात प्रवेशानंतर सुरूवातीपासूनच सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे, ही माझी धारणा राहिली आहे. जनतेने राजकर्त्यांना, राजकारण्यांना विश्‍वासाने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणे चुकीचे आहे, असे मी मानतो.’’ असा समाजवादी व लोकहितार्थ दृष्टिकोन ठेवून स्वातंत्र्यानंतरही शेतकरी, शेतमजूर सोशीकतेने जगतो आहे. कर रुपातून शासनाकडे जमा झालेला पैसा सर्वसामान्यांसाठी खर्च व्हावा, असा आग्रह त्यांनी विधानसभेत सातत्याने धरलेला आहे. इतकेच नव्हेतर स्वतः मंत्री असताना वर्तमानपत्रांची रद्दी विकून जमा झालेला पैसा शासनाकडे जमा करणारा विरळाच आमदार व मंत्री म्हणून आबासाहेबांकडे पाहावे लागते.
1995 च्या विधानसभा निवडणूकीत केवळ 192 मतांनी त्यांना पराजय पत्करावा लागला. त्यांचे शल्य आबासाहेबांना कार्यकर्त्यांना फार होते. निवडणूकीनंतर आबासाहेब हेही स्वस्थ बसले नाहीत. अधिक जोमाने कामाला लागले. पिण्याचे पाणी असो, रोजगार हमीचे काम असो, वा सर्वसामान्यांचे कोणतेही काम असो, ते अगदी मनापासून करत असत. सर्वसामान्यांच्या सुखासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. नदीतील पाण्याला कितीही अडथळे आले तरी नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबत नाही. वळसा घालून पाणी पुढे जाते. अगदी त्याप्रमाणे ते हताश न होता वा थांबून राहणे त्यांना कधीच जमले नाही. त्यांनी कुणावरही रोष धरला नाही, का आकस ठेवला नाही. तळपातळीवर काय प्रश्‍न आहेत, ते समजून घेत राहिले. आव्हानांना हार जातील ते आबासाहेब कसले, सरकारच्या विरोधात अनेक लढे त्यांनी उभे केले, मोर्चे काढले, शेतकर्‍यांच्या, शेतमजूरांच्या व कामागारांच्या प्रश्‍नांसाठी त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. एक काम संपले की दुसरे काम हाती घ्यायचे. तेही तितक्याच उत्कंठतेने पूर्ण करायचे या त्यांच्या स्वभावावैशिष्ट्यांमुळे कोणतेही काम करताना त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 1999 च्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले. लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर त्याचा फायदा होईल, यामुळे युती सरकारच्या अशा पल्लवित झाल्या. आणि लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी जाहीर झाल्या. आबासाहेबांच्या विधानसभा निवडणुकीसाठी तर सर्वसामान्य जनता व मतदार मतदान दिवसाची वाट पाहत होते. गावोगावी तसा प्रचार कार्यकर्त्यांनी केला होता. चांगले मताधिक्य घेऊन आबासाहेब विजयी होणार अशा पैजाही गावोगावी लागल्या होत्या. त्याचे कारण 1995 च्या विधानसभेच्या पराभवाचा वचपा लोकांना काढायचा होता. तेवढी जागृती मतदारांमध्ये झाली होती. मतदारांच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी होती. ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे कधीच त्यांनी केले नाही. आबासाहेब म्हणजे प्रेरणा देणारा अखंड स्फूर्तीचा झराच आहे. आबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या वक्तृत्वाला कमालीची धार आली होती. ती 1999 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचार दरम्यान दिसून आली. 1999 च्या विधानसभेची मतमोजणी सोलापूर येथे होती. गावोगावचे लोक वाहने करून होम मैदानावर थांबून होते. मतमोजणीला वेळ लागला आहे. इकडे मतदारांचे ठोके वाढत होते. छातीत धडधड होत होती. मतमोजणीच्या फेरीची लोक आकडेमोड करत होते. पहिल्या फेरीपासूनच आबासाहेब आघाडीवर होते, ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिले. शेवटी 40334 मतांनी विजयी घोषित केल्यानंतर अनेकांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. 1999 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला व भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष व डाव्या आघाडीचे 11 आमदार होते. त्यांना दोन्ही बाजूंनी आमंत्रणे होती. शिवसेना-भाजप युतीने तर आबासाहेबांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ती धुडकावून लावली. आणि काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अन् त्यावेळी आबासाहेबांनी पणन व रोजगार हमी मंत्रीपद घेतले. कारण आपल्या शक्यता व मर्यादा काय हे ते ओळखत होते. आपण काहीही करून चालणार नाही. 1999 मध्ये मंत्रीपदाची शपथ घेऊन आल्यानंतर प्रचंड जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. मेथवडे फाट्यापासून सांगोल्यापर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा माणसेच माणसे होती. सांगोल्यामधून भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला. तो हर्षाचा क्षण आजही मनाला व्यापून टाकतो.
1999 मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गावोगावी फिरतानांची आठवण सांगताना अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, 1999 साली मंत्री झाल्यावर अनेक गावी त्यांचे सत्कार झाले. त्याठिकाणी बर्‍याच वेळा मी त्यांच्यासोबत होतो. महिला त्यांना ओवाळणीसाठी गर्दी करत. त्यांच्या ताटात गणपतराव पैसे टाकीत. ते नियोजन व्यवस्थित पार पडावे व सर्वच स्त्रियांना ओवाळणी मिळावी, यासाठी दहा-दहा रुपयांच्या दहा हजारांच्या नोटा कायम जवळ ठेवत असत. ओवाळणी करण्यासाठी त्यांच्या हातात त्या नोटा देत असत. त्यामुळे सर्व महिला आनंदी व्हायच्या. मळोली (ता.माळशिरस) गावात सत्काराच्या मिरवणूकीमध्ये एक म्हातारी बाई ओवाळण्यासाठी धडपड करीत आमच्याजवळ आली. तिला विचारले, आजीबाई तुम्ही कुणाला ओवाळायला आलाय. तर ती म्हणालीच, आज गरिबांचा देव गावात आलायं. असं सगळे लोक बोलतायत म्हणून मी आलीय. मी आलीय. हे वाक्य ऐकल्यावर मी सद्गदीत झालो. सर्वसामान्यांचे उदंड प्रेम कायमचे लाभण्याचे थोर भाग्य हे त्यांना लाभले. असा नेता पुन्हा पाहावयास मिळणे दुर्मिळ आहे. 1999 साली आबासाहेब विधानसभेला व लोकसभेला पंढरपूर मतदारसंघातून रामदास आठवले उभे होते. त्यावेळी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून रामदास आठवले साहेबांना त्यांनी पाठिंबा दर्शविला. रामदास आठवले साहेबांकडून एक रुपयाही सांगोला मतदारसंघातील निवडणूकीचा खर्च म्हणून त्यांनी घेतला नाही. 

Exit mobile version