चंदीगड विद्यापीठातील विकृती

सतिंदर सिंग

 भारतात एकीकडे लैंगिक शिक्षणाबाबत उघड बोललं की कान टवकारले जातात. संस्कृतीरक्षक जागे होतात; परंतु ‘पॉर्न फिल्म’ पाहण्याचं प्रमाण प्रचंड आहे. योग्य वयात भावनांचं उद्दिपन करण्याचं प्रशिक्षण मिळालं नाही की मुलं-मुली कोणत्याही थराला जातात. भावनांचं नियमन हे सर्वात महत्त्वाचं आहे. तेच झालं नाही तर वाममार्ग निवडला जातो. चंदीगड विद्यापीठात जे झालं, ते अशाच विकृतीतून घडलं आहे.

पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातला स्नानगृहातल्या मुलींचे व्हिडीओ काढण्याचा घृणास्पद प्रकार सरत्या आठवड्यामध्ये चर्चेचा विषय ठरला. यासंदर्भात बाथरुमच्या दरवाजाखालून मुलींचा व्हिडीओ बनवणार्‍या तरुणीला अटक करण्यात आली. या मुलीने स्वत:चा व्हिडीओ तिच्या सिमल्यातल्या प्रियकराला पाठवला. फॉरेन्सिक टीम मोबाईलची तपासणी करत आहे. या घाणेरड्या प्रकाराला सामोरं जाणार्‍या मुलींचं हे पहिलंच वर्ष आहे. त्यामुळे मुली एकमेकांना फारशा ओळखत नव्हत्या. पंजाब राज्य महिला आयोगाने विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना न्याय दिला जाईल, असं आश्‍वासन दिलं. विद्यापीठाच्या वसतिगृहातली एक विद्यार्थिनी दररोज वसतिगृहात राहणार्‍या मुलींचे व्हिडीओ बनवत असे, असा आक्षेप आहे. कपडे बदलताना किंवा आंघोळ करतानाचा हा व्हिडीओ ती मैत्रिणीला पाठवायची. काही दिवसांपासून मुलींचं तिच्याकडे लक्ष होतं; मात्र शनिवारी मुलींनी तिला रंगे हाथ पकडलं. चौकशी करण्यात आली तेव्हा तिने कबूल केलं की मित्राला हे व्हिडीओ पाठवत असे. मित्राच्या सांगण्यावरूनच ती अशी कृत्यं करत असे. चंदीगड विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याचा आरोप पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे. एका मुलीने शूट केलेला खासगी व्हिडीओ वगळता कोणत्याही विद्यार्थीनीचा कोणताही आक्षेपार्ह व्हिडीओ आढळलेला नाही. हे खरं की खोटं हे येणारा काळच सांगेल पण या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला गेला, हे मात्र खरं.
आपले व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाल्याचं समजलं, तेव्हा विद्यार्थिनींच्या पायाखालची जमीन सरकली. या दरम्यान व्हिडीओ पाहून एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मुलींनी एकच गोंधळ घातला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल इथली मुलं या विद्यापीठात शिकण्यासाठी येतात. आरोपी विद्यार्थिनी एमबीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. काही विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस फॉरेन्सिक पुरावे गोळा करत आहेत. पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी सांगितलं की, ही गंभीर बाब आहे. त्याची चौकशी केली जात आहे. पूर्वी सर्वच बसस्थानकांवर मिळणारी पिवळी पुस्तकं लपून वाचण्याचं प्रमाण खूप होतं; परंतु त्यातून विकृतीकडे वळण्याचं प्रमाण कमी होतं. अलीकडच्या काळात मात्र दृकश्राव्य माध्यमातून काहीही पहायला मिळतं. त्यातून लैंगिक भावनांवर काबू ठेवता आला नाही, की बलात्कारासारखे प्रकार होतात. पॉर्न फिल्मचं मार्केटिंग किती तेजीत आहे, हे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राज कुंद्राच्या प्रकरणावरून लक्षात आलं होतं. लहान मुलांच्या ‘पॉर्न फिल्म’ पहायला बंदी असली तरी बेडरूमच्या आत पती-पत्नीनं काय पहावं, यावर बंदी घालता येत नाही; परंतु अशा प्रकारच्या फिल्म शाळकरी, महाविद्यालयीन मुलं-मुली पाहतात, तेव्हा त्यांच्या मानसिकतेवर नकळत परिणाम होत असतो. त्यातही अशा फिल्म व्यावसायिक पद्धतीनं केल्या जात नसतील आणि त्याचा गोरज धंदा होत नसेल, तर त्याकडे एक वेळ दुर्लक्षही करता येईल; परंतु अजाणतेपणी कुणाच्या शरीराचा अशा कारणांसाठी वापर होत असेल, तर ते गैर आहे.
चंदीगड विद्यापीठात घडलं, ते दुर्दैवी आहे. आपल्याच मैत्रिणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढण्यात एक युवतीच पुढाकार घेत असेल, तर विश्‍वास तरी कुणावर ठेवायचा, असा प्रश्‍न पडतो. चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहातल्या मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून इंटरनेटवर टाकल्याच्या आरोपाचं प्रकरण आता गंभीर वळण घेत आहे. मुलींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ काढून एका युवतीने सिमल्याच्या आपल्या मित्राला पाठवले आणि त्याने ते इंटरनेटवर अपलोड केले. हा प्रकार कळताच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी रस्त्यावर येणं स्वाभावीक होतं. विद्यार्थिनींच्या आंदोलनामुळे विद्यापीठ आठवडाभरासाठी बंद ठेवावं लागलं. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले. या त्रिसदस्यीय विशेष तपास पथकात फक्त महिला पोलिस अधिकारी आहेत; खरं तर हा सर्व तपास वरिष्ठ महिला अधिकार्‍यांकडेच सोपवायला हवा होता.
पोर्नोग्राफिक व्हिडिओ बनवणं, विकणं किंवा वितरित करणं भारतात बेकायदेशीर आहे; पण असं असूनही पोर्नोग्राफी वाढत आहे. या प्रकरणात जे काही घडलं, त्याबाबत आत्तापर्यंत समोर आलेली माहिती भारतातल्या अव्यावसायिक पोर्नोग्राफी व्हिडिओंच्या बाजारपेठेच्या विस्ताराकडे निर्देश करत आहे. लोक अनेकदा स्वतःसाठी असे व्हिडिओ बनवतात; पण अनेक कारणांमुळे ते इंटरनेटवर पोहोचतात. व्हिडीओ बनवणं आणि पोस्ट करणं आज सोपं झालं आहे.
असा प्रकार केल्यास भारतीय दंड विधानाच्या कलम 292 अन्वये दोषी आढळणार्‍या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे; मात्र असं असूनही भारतात पोर्नोग्राफी वाढत आहे. अनेक वेबसाइट्सशिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या ‘सोशल मीडिया’ सेवांवरही अश्‍लील व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे व्यावसायिक पोर्नोग्राफीपेक्षा हौशी किंवा गैर-व्यावसायिक व्हिडिओंचं जग आहे. यामध्ये प्रोफेशनल कॅमेर्‍यांऐवजी मोबाईल फोन, सेट्सऐवजी प्रायव्हेट रूम आणि कलाकारांऐवजी स्वत:चे व्हिडिओ बनवणारे सामान्य लोक यांचा समावेश आहे.
‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’च्या ताज्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे की, भारतात सरासरी वयाच्या 25 व्या वर्षी मुलं आणि 19 वर्षांच्या वयात मुली लैंगिक संबंध ठेवायला लागतात. अशा परिस्थितीत एकमेकांशी जोडलेल्या लोकांचे असे व्हिडीओ बनवणं आश्‍चर्यकारक नाही.
अनेकदा असे व्हिडीओ पार्टनरच्या संमतीनेही बनवले जातात; परंतु हे व्हिडीओ इंटरनेटवर पोहोचतात तेव्हा समस्या निर्माण होतात. हे प्रामुख्याने दोन प्रकारे घडतं. प्रेमसंबंध तुटल्यानंतर बदला म्हणून असे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले जातात. याला ‘रिव्हेंज पॉर्न’ म्हणतात. यात संमती मोठी भूमिका बजावते. अनेकदा असे व्हिडीओ जोडीदाराच्या संमतीने बनवले गेले असले तरी ते सार्वजनिक करताना संमती घेतली जात नाही. शिवाय कुणीच अशा प्रकारची संमती देणं शक्य नाही. ‘हौशी पोर्नोग्राफी’ ही अशा व्हिडीओंची आणखी एक श्रेणी आहे. यामध्ये समोर दिसणारे लोक स्वत: व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि सशुल्क वेबसाइट किंवा अ‍ॅप आधारित सेवांना विकतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे पूर्णपणे अनियंत्रित क्षेत्र आहे आणि कदाचित त्यामुळेच त्याची भरभराटही होत आहे. 16 आणि 17 वर्षं वयोगटातल्या जवळपास एक चतुर्थांश मुलांनी इंटरनेटवर पोर्नोग्राफिक सामग्रीचा सामना केला आहे. हा अब्जावधी डॉलरचा व्यवसाय आहे. इंटरनेटवर आज सर्वत्र पोर्नोग्राफिक सामग्री उपलब्ध आहे. हा सर्व तपशील लक्षात घेता हे गलिच्छ जग आपल्या घराजवळ आलं आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. 

Exit mobile version