काँग्रेस पुन्हा नव्या-जुन्यांच्या संघर्षात

प्रा.डॉ.अशोक ढगे

भारतीय जनता पक्षाने 75 वर्षांपुढच्या नेत्यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त करत तरुणाईला संधी देण्याचं ठरवलं असलं तरी काँग्रेसला मात्र नव्या पिढीशी काहीच देणंघेणं दिसत नाही. एरव्ही लोकशाही मूल्यांचा गवगवा करणार्‍या काँग्रेसला 22 वर्षं अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जी नावं चर्चेत होती आणि ज्या दोघांमध्ये आता लढत होत आहे, ती पाहता काँग्रेसचा अजूनही ज्येष्ठांवर विश्‍वास दिसतो.

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, या गूढतेवरचा पडदा दूर झाला आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी दाखल केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या उदयपूरच्या जाहीरनाम्यानुसार ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणाचं खरगे यांनी अनुकरण केलं. त्यांनी राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या आधी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचं नाव अध्यक्षपदासाठी घेतलं जात होतं; मात्र खरगे यांचं नाव समोर येताच त्यांनी उमेदवारी मागे घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची खरगे यांच्याशी स्पर्धा आहे. झारखंडचे माजी आमदार कृष्णानंद त्रिपाठी यांनी उमेदवारी दाखल केली होती; परंतु त्यांचा अर्ज बाद झाला. अध्यक्षपदाच्या शर्यतीत खरगे यांचा यांचा विजय निश्‍चित आहे. त्याचं कारण त्यांना गांधी घराण्याचा आशीर्वाद आहे. जी-23 गटातल्या बहुतांश नेत्यांनी आपली तलवार म्यान करून, खरगे यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, थरूर यांना त्यांच्याच राज्यातून विरोध झाला आहे. थरूर यांना फक्त एका ज्येष्ठ नेत्याने उघड पाठिंबा दिला आहे. खरगे यांच्या समर्थकांमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचाही समावेश आहे. गेहलोत स्वतः राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. ते 80 वर्षांचे आहेत. ते काँग्रेसच्या इतिहासातले सर्वात वयोवृद्ध राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार आहेत. खरगे यांच्या राज्याभिषेकानंतर मोठा प्रश्‍न निर्माण झाला. तो म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेस पक्षात तरुणांना मोठी जबाबदारी देऊन पुढे आणायची राहुल गांधी यांची योजना होती, तिचं काय झालं, खरगे अध्यक्ष झाल्याने राहुल यांचं स्वप्न भंगलं का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
सीताराम केसरी वयाच्या 77 व्या वर्षी काँग्रेसच्या सर्वोच्च पदावर बसले होते तर मोतीलाल नेहरूंनी वयाच्या 67 व्या वर्षी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. पक्षाने याआधी अनेकदा तरुण नेत्यांना सर्वोच्च पदावर बसण्याची संधी दिली आहे. 1923 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे मौलाना आझाद केवळ 35 वर्षांचे होते. पंडित जवाहरलाल नेहरू वयाच्या चाळिसाव्या, राजीव गांधी 41 व्या, इंदिरा गांधी 42 व्या, राहुल गांधी 47 व्या आणि सोनिया गांधी 52 व्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. डिसेंबर 2017 मध्ये राहुल गांधी यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताना पक्षाकडून युवकांना संधी देण्याचा नारा देण्यात आला होता. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपूर्ण युवा ब्रिगेड उभारण्यास सुरुवात केली होती. तेव्हा देशातल्या तरुणांकडे नेतृत्व देण्याची चर्चा जोरात सुरू होती. राहुल यांच्या टीममध्ये सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंग, जितिन प्रसाद, अशोक तंवर, मिलिंद देवरा, मनीष तिवारी, दिव्या स्पंदना, सुष्मिता देव असे अनेक तरुण चेहरे असायचे. राहुल यांच्या पुढाकाराने ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा डॉ. मनमोहन सिंग मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. संघटनेत तरुणांना प्रोत्साहन दिलं जात होतं. पायलट यांच्याकडे राजस्थानच्या तर अशोक तंवर यांना हरियाणामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
डिसेंबर 2018 मध्ये पायलट यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आला तेव्हा आता पक्षाची कमान तरुणांच्या हाती येईल, असं वाटत होतं; मात्र मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे तर राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना मुख्यमंत्री न केल्याने तरुणांना संधी देण्याचं राहुल गांधी यांचं स्वप्न डळमळीत झालं. 2019 च्या उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताच ही युवा ब्रिगेड एकाकी पडली. लढायला तरुण आणि पद द्यायची वेळ आली, की दरबारी ज्येष्ठ राजकारणी, अशी परिस्थिती पहायला मिळाली. काँग्रेसची ही नीतीच तिच्या अधोगतीला कारण ठरत आहे. पदं मिळत नसल्याने ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह आणि जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक तंवर आम आदमी पक्षात गेले तर सुष्मिता देव यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनीष तिवारी हे असंतुष्ट जी-23 गटाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अनेक वेळा पक्षावर टीका केली आहे. देवरा यांचंही तसंच आहे. गेहलोत यांचा हटवादीपणा पायलट यांना मुख्यमंत्रिपदी येण्यात आडकाठी आणत आहे. पक्षश्रेष्ठींना आपला शब्द पाळता येत नाही, एवढी कोंडी गेहलोत यांनी करून ठेवली आहे. राजस्थान हे एकमेव मोठं राज्य काँग्रेसच्या ताब्यात असताना गेहलोत यांच्या दबावाच्या राजकारणामुळे हे राज्यही कदाचित काँग्रेसच्या हातून जाऊ शकतं. देवरा यांच्यासारखे तरुण नेतेही नाराज आहेत. इतर राज्यातही हीच परिस्थिती आहे.
पक्षाध्यक्षपदी होऊ घातलेल्या खरगे यांच्या निवडीनंतर काँग्रेसला तरुण बनवण्याच्या राहुल यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. राहुल यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेसने तरुणांना मागे टाकत जुन्या नेत्यांवर विश्‍वास टाकण्यास सुरुवात केली. सध्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे. श्री. गेहलोत 72 वर्षांचे आहेत, त्यांना अध्यक्षपदी बसवण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. त्यांनी मुख्यमंत्रिपदाला प्राधान्य दिलं. 66 वर्षीय थरूर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेहलोत शर्यतीतून बाहेर पडले, तेव्हा 75 वर्षांच्या दिग्विजय सिंह यांचं नाव समोर आलं होतं. आज पक्षाकडे बघितलं तर तरुणाई कुठेच दिसत नाही. आता खरगे यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करून पक्ष तरुणांना कसा जोडणार, हा प्रश्‍न आहे.
अर्थात खरगे हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. ते कर्नाटकमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री, केंद्रात मंत्री, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत; मात्र आजच्या काळात नुसता अनुभव असून चालत नाही. काँग्रेसला तर भाजपच्या विरोधात पुन्हा समर्थ बनवू शकेल, अशा लोकनेत्याची गरज आहे. अध्यक्ष झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी केंद्रात दोनदा काँग्रेसचं सरकार आणलं. तोच करिष्मा आता काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दाखवता यायला हवा.
श्री. खरगे यांच्यासमोरील सर्वात मोठं आव्हान आगामी गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचं आहे. अशोक गेहलोत हे गुजरातमध्ये पर्यवेक्षक आहेत. आता खरगे नव्या नेत्याकडे जबाबदारी देतील की गेहलोतांवरच विश्‍वास ठेवतील, हा प्रश्‍न आहे. अध्यक्ष झाल्यानंतर ते इतर नेत्यांशी कसे संबंध ठेवतील, हे ही पहावं लागेल. हिमाचल प्रदेशमध्ये आनंद शर्मा यांनी पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं होतं. खरगे यांच्यासमोर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्ता आणण्याचं आव्हान आहे. राजस्थानमध्ये पक्षांतर्गत गटबाजी टोकाला पोचली आहे. मुख्यमंत्रिपद मिळू न दिल्याने सचिन पायलट यांचा गट नाराज आहे; शिवाय गेहलोत दररोज पायलट गटाविषयी संशय निर्माण करणारी विधानं करत असल्याने पायलट गटाच्या संयमाची कसोटी पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये 80 वर्षीय खरगे पक्षाला ऊर्जा देऊ शकतील का, हा प्रश्‍नही विचारला जात आहे. पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळसोबत आपल्याच कर्नाटकमध्येही खरगे यांना आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. ते गांधी घराण्याशी समन्वय साधून कारभार करतील, यात शंका नाही. घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांना खुर्ची मिळेल; पण पडद्याआडून राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं सोपं जाणार नाही. एकूणच खरगे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची काटेरी खुर्ची मिळणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला कितपत फायदा होईल हे काळच सांगेल.
पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतर्गत कुरघोडीचं आणि अविश्‍वासाचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलं. तरुण विरुध्द ज्येष्ठ नेते हा वाद समोर आलाच, पण पक्षाध्यक्षपदाच्या काटेरी खुर्चीवर बसायला फारसं कोणी तयार नाही, हे ही पहायला मिळालं. या पदी जबरदस्ती करुन बसवायचा प्रयत्न झाला तेव्हा आपल्या वारसाला आपल्या पदावर बसवण्याचा हट्ट पहायला मिळाला. या धावपळीमध्ये पक्षाची अब्रू वेशीला टांगली गेली ती वेगळीच. आता नव्या अध्यक्षांच्या कार्यकाळात पक्ष एक नवी खेळी खेळायला सिध्द होतो की पुन्हा बेदिलीचे, कुरघोडीचे जुनेच प्रयोग पहायला मिळतात, याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे.

Exit mobile version