विनायक देशमुख
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाला भेडसावणार्या मूलभूत प्रश्नांवर काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने एक हजार किलोमीटर प्रवास केला आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमधून पुढे जात ही यात्रा आता महाराष्ट्रात येत आहे. आतापर्यंतच्या प्रवासात या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. तो पाहता महाराष्ट्रात ही यात्रा काँग्रेसला नक्कीच उभारी देईल, असा विश्वास वाटतो. या निमित्ताने महाराष्ट्रात उमटणारे पडघम टिपणारा लेख.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशापुढील मूलभूत प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी ‘भारत जोडो’यात्रा सुरू केली. कन्याकुमारी ते काश्मीर असा या यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास आहे. त्यापैकी एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. या यात्रेला कसा आणि किती प्रतिसाद मिळतो आहे, हे माध्यमांतून समजतं. माध्यमांनी जशी या यात्रेची दखल घेतली, तशीच ती आता भाजपनेही घेतली आहे. तरुण, वृद्ध, आदिवासी, अभिनेते, अभिनेत्री आदी समाजघटक राहुलजींच्या पदयात्रेत सहभागी होत आहेत. या पदयात्रेत राहुल फक्त चालत नाहीत, तर संबंधित भागांमधले प्रश्न समजावून घेतात, त्यावर मंथन करतात आणि भाष्यही करतात. राहुल यांच्या चालण्याचा वेग आणि झपाटा पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. राहुलजींची ‘भारत जोडो’ यात्रा ही केवळ काँग्रेसची राहिलेली नाही. त्यांनी विविध स्वयंसेवी संस्था तसंच विचारी लोकांना सहभागी करून घेतलं आहे. देशाच्या मूलभूत प्रश्नांवर ते भाष्य करतात. देशाला मूलभूत प्रश्नांऐवजी भावनिक प्रश्नांमध्ये गुंतवून ठेवण्याचा सत्ताधार्यांचा प्रयत्न या निमित्ताने हाणून पाडला जात आहे.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं महत्व समविचारी पक्षांनाही समजलं आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या यात्रेत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. देशभरातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेऊन राहुल यांनी सात सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली आहे. आता या यात्रेला एक महिना होत असून ती महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात ती यशस्वी खास करण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता आप-आपल्या परीने प्रयत्न करत आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी आणि यात्रेबाबत प्रचार, प्रसार करण्यासाठी युवक काँग्रेसने खास मराठीतून एक नवं गाणं रिलीज केलं आहे. सध्या ‘सोशल मीडिया’वर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. युवक काँग्रेसने रिलीज केलेल्या ‘भारत जोडू’ या मराठी गाण्याच्या सुरुवातीला रायगडासह अनेक किल्ल्यांचे व्हिज्युअल्स दाखवण्यात आले आहेत. यासोबत राहुल यांच्या पदयात्रेतली गर्दी, त्या गर्दीतल्या कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवण्यात आला आहे. ‘कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडूया, मराठी मातीचा अभिमान असू द्या, भारत जोडू या’ अशा आशयाचं हे नवं गाणं रिलीज केलं गेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रिलीज केलेलं हे गाणं युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय हँडलवरून शेअर करण्यात आलं आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी राहुल यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असं म्हटलं आहे. राहुल यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा केवळ राजकीय प्रवास नाही. राहुल यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपने केलं; मात्र या पदयात्रेतून लोकांना राहुल यांचं व्यक्तिमत्त्व कळलं आहे. या यात्रेत महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यासह देशातल्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होत असल्याने महिला, युवक, शेतकरी, व्यापारी यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘भारत जोडो’ यात्रा येत्या सात नोव्हेंबरला देगलूरमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर ती नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर, नायगाव, लोहा, कंधार, भोकर आणि हदगाव तालुक्यातून हिंगोलीत प्रवेश करेल. त्यानंतर कळमनुरी, हिंगोलीमार्गे ही यात्रा वाशीम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर अकोल्यातल्या बाळापूरमार्गे बुलडाण्यातल्या खामगावसह जामोद आणि जळगावमार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करेल. नांदेड आणि शेगाव इथे राहुलजींच्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रेच्या नियोजनाची आणि प्रसिद्धीची जबाबदारी माजी मंत्री सतेज पाटलांकडे देण्यात आली आहे. ‘सोशल मीडिया’वरही यात्रेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला जात आहे. ‘भारत जोडो’ यात्रा केवळ देश एकसंध ठेवण्याचा काँग्रेसचा संदेश देशात पोहोचवणार नाही, तर संघटनेत ही नवसंजीवनी आणेल. निवडणुकीत एकापाठोपाठ एक पराभव, अनेक बलाढ्य नेत्यांनी पक्ष सोडून जाणं, कमकुवत नेतृत्व यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्याची, त्यांच्यासमोर लक्ष्य ठेवण्याची आणि त्यांना प्रेरणा देण्याची नितांत गरज होती. याची जाणीव राहुलजींना आहे.
2014 नंतरच्या काळात काँग्रेसने गमावलेला लोकांचा आधार आणि विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्यासाठी ही यात्रा काँग्रेसला मदत करेल. काँग्रेसकडे आता देशभरात फक्त दोनच मुख्यमंत्री उरले आहेत. देशात 2014 पूर्वी काँग्रेसचे 1207 आमदार होते, त्यांची संख्या आता 690 वर घसरली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने होणारी गळती रोखणं कठीण झालं होतं. अनेक उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी एक तर अन्य पक्षात प्रवेश केला किंवा सक्रिय राजकारणापासून दूर राहणं पसंत केलं. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 64 नेते इतर पक्षांच्या तिकिटांवर लढले. त्यातले अनेकजण विजयी झाले. या विजयी उमेदवारांचा आकडा 2014 मध्ये 41 तर 2019 मध्ये 23 आहे. या दरम्यान सर्व राज्यात मिळून असलेल्या 553 काँग्रेस आमदार आणि 134 पराभूत उमेदवारांनी काँग्रेसचा पंजा सोडला आणि इतर पक्षांचा हात धरला. त्यापैकी 233 विजयी झाले. पैकी 107 भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. ‘भारत जोडो’ यात्रा काँग्रेसच्या पक्ष संघटनेतली ही झीज रोखण्यासाठी मदत करेल. तळागाळातले कार्यकर्ते प्रतीकं, विचार किंवा भावनांपेक्षा व्यावहारिकतेचे आणि साधक-बाधकांचं गणित यावर निर्णय घेतात. प्रतीकात्मक राजकारण आणि तळागाळात पहायला मिळणारं वास्तव यातील फरक काँग्रेसची भाजपशी थेट स्पर्धा असणार्या राज्यांमध्ये अधिक स्पष्ट दिसतो.
महात्मा गांधी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपली मोहीम सुरू केली आणि चळवळीला गती मिळवून दिली. ते गावोगावी आणि राज्यांमधून जात असताना चळवळीने जोर पकडला. स्वबळावर स्वातंत्र्य चळवळीला वेग मिळवून दिला. आता तेच काम राहुल गांधी करत आहेत. ते ‘भारत जोडो यात्रे’त दररोज 24 ते 25 किलोमीटर पायी चालतात. एवढंच नव्हे, तर त्या त्या राज्यातल्या नेत्यांनाही आपल्यासोबत धावायला लावतात. त्यामुळेच राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी राहुलजींसोबत धावण्याची वेळ आली तर अडचण नको म्हणून कंबर कसली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी फिटनेस फंडा अंगीकारला आहे. राहुलजींच्या फिटनेसचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. राहुलजी कधी रस्त्यावरच पुशअप्स मारताना दिसतात तर कधी धावताना दिसतात. एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात 2009 मध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 24 आमदार विजयी झाले होते; परंतु नंतरच्या काळात काँग्रेसचा दबदबा कमी होत गेला. 2019 च्या निवडणुकीत इथे केवळ 15 आमदार विजयी झाले. विदर्भात गलितगात्र झालेल्या काँग्रेसला राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ नवसंजीवनी आणि उभारी देणारी ठरेल.
‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात नांदेड ते जळगाव असा 383 किलोमीटरचा प्रवास करत 16 दिवस राज्यात मुक्कामी असेल. चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचलेली काँग्रेस सध्या कमकुवत होत चालली आहे. विदर्भातही काँग्रेसच्या मजबूत बुरुजाला सुरुंग लागत आहेत. ग्रामीण भागात काही प्रमाणात काँग्रेसचा प्रभाव दिसत असला, तरी शहरी भागात काँग्रेस पिछाडीवर पडली आहे. मात्र महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचं बळ वाढत असल्याचं ग्रामीण भागात झालेल्या निवडणुकीत दिसून आलं आहे. भाजप-शिंदे सरकारला पर्याय म्हणून मित्रपक्षांमध्ये काँग्रेस या एकमेव पक्षाकडे स्वतःची मतपेढी आहे. राहुलजींच्या पदयात्रेमुळे ती आणखी मजबूत होईल. युवकांना कार्यक्रम देण्याचा तसंच भाजपला समर्थन पर्याय देण्याचा राहुलजींचा प्रयत्न आहे. ‘भारत जोडो’ पदयात्रेमुळे महाराष्ट्रात केवळ काँग्रेसलाच नाही तर मित्रपक्षांनाही फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे; मात्र ही यात्रा गळती रोखून विदर्भासोबतच मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात काँग्रेसला उभारी देणार आहे.
(लेखक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत.)