स्मरणातली सावित्री!

क्षितीजा देव

प्रगतीच्या आश्‍वासक वळणावर पोहोचणार्‍या समाजाने सावित्रीबाई फुलेंच्या शांत आणि संयमी पण आश्‍वासक व्यक्तिमत्त्वाला आदराने नमन करायला हवे. या स्त्रीमुळेच स्त्रीवर्गापुढे शिक्षण, विकास आणि आत्मविश्‍वासाचे क्षितिज उभे राहिले. सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्याची ज्योत पेटवली तो दिवस होता एक जानेवारी 1848 तर तीन जानेवारी हा त्यांचा स्मरणदिन. त्यानिमित्त केलेलं हे विचारमंथन.

आजचा समाज सुधारणेच्या एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. समृद्धीची एक एक दालनं उघडण्याचा काळ त्याने अनुभवला आहे. प्रगतीचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले आहेत. मात्र हा प्रवास फक्त वाचून अथवा ऐकून असणारा एक वर्ग प्रत्यक्ष अनुभवाअभावी याप्रती म्हणावा तितका संवेदनशील नाही. अगदी बोलायला, चालायला लागल्यापासून शाळेची पायरी चढणार्‍या आजच्या मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो, ही संकल्पनाही कदाचित पटणार नाही. पुस्तक हातात घेणं, वाचणं, लिहिणं, अभ्यास करणं आणि विचारातून व्यक्त होणं, समाजात पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं, त्यांच्याशी ताठ मानेनं बोलणं, सामाजिक समस्यांविषयी आवाज उठवणं हे आणि यासारखे अन्य विषय कधी काळी स्त्रियांच्या क्षितिजावरही नव्हते, हे आजच्या स्वतंत्र विचारांच्या मुशीत घडलेल्या नवयौवनांच्या पचनी पडणार नाही. कारण त्यांनी या संघर्षातल्या कोणत्याही पायरीला साधा स्पर्शही केलेला नाही. मात्र आज पन्नाशी-साठीच्या उंबर्‍यावर उभ्या असणार्‍या महिलांना आपण  सावित्रीच्या लेकी आहोत म्हणजे नेमकं काय आहोत, हे समजलं आहे. कारण त्यांनी या प्रवासातल्या कोणत्या ना कोणत्या पायरीला स्पर्श केला आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणदिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना आजच्या महिलांना अवकाश खुलं करुन देणार्‍या विचारांचा मागोवा घेणं गरजेचं आहे.
कोणतीच परिस्थिती कधीच कायम रहात नसते, ती बदलत असते असं म्हणतात. पण परिस्थिती कधीच आपोआप बदलत नाही तर ती बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो, हेदेखील नाकारुन चालणार नाही. संघर्ष करणारे असे चेहरे विरळा असतात, कारण संघर्ष कधीच सोपा नसतो. त्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते. अनेकांचे अनेक आक्षेप सहन करावे लागतात. निंदानालस्ती आणि जळजळीत नजरांचा सामना करावा लागतो. सावित्रीबाई फुलेंसारख्या एका स्त्रीने आपल्या काळात हे सर्व सहन केलं. प्रवाहाविरुद्ध पोहताना समोर आलेल्या प्रत्येक अडचणीचा सामना केला मात्र स्त्रीशिक्षणाचा मार्ग न त्यागता ज्ञानयज्ञ सुरू ठेवला. आज भारतीय स्त्री विविध क्षेत्रांमध्ये तळपते आहे, कर्तृत्व सिद्ध करते आहे, यामागे या सावित्रीची सावली आहे. त्यामुळेच आजची स्त्री स्वकर्तृत्व आणि सन्मान या शब्दांचा शब्द समजू शकत आहे. घराबाहेरचं विश्‍व तिला खुणावत आहे. सावित्रीबाईंचे हे ऋण कधीच विसरण्याजोगे नाहीत.
3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या छोट्याशा गावात जन्मलेल्या या बालिकेचं नाव होतं सावित्री. ही छोटी सावित्री भविष्यात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ म्हणून अजरामर झाली. अठराव्या शतकातल्या कर्मठ समाजात स्वतः शिक्षण घेऊन इतर स्त्रियांनाही शिक्षणाच्या स्वर्गाचं दार तिने उघडून दिलं. एवढं मोठं धाडस त्या स्त्रीने कसं केलं असावं, हा विचार पुन्हा पुन्हा मनात येतो आणि या उत्सुकतेपोटी सावित्रीबाईंच्या आयुष्याचा वेध घेता लक्षात येतं की अत्यंत स्वतंत्र, बुद्धिमान, अन्यायाविरुध्द लढण्याची मानसिकता हे गुण बालपणापासूनच या लहानग्या मुलीच्या रक्तात होते. याचं उदाहरण म्हणून या मुलीच्या बालपणीची एक कथा ऐकली तरी पुरेसं आहे. बालपणी तिच्या घराजवळ एक झाड होतं. त्या झाडावर एका पक्षिणीनं घरटं बांधलं होतं आणि त्यात अंडीही  घातली  होती. छोटी सावित्री ते दृश्य रोज आनंदानं, कुतूहलानं बघायची. ती पिल्लं अंड्यातून बाहेर येण्याची वाट बघत होती. एके दिवशी तिला दिसलं की, अचानक एक साप सरपटत झाडावर चढला आणि घरट्यातील अंडी पळवू लागला. पक्षीण जिवाच्या आकांताने ओरडू लागली. ते पाहून छोटी सावित्री त्वेषाने तिकडे धावली. तिने जवळचा मोठा दगड उचलला आणि ठेचून नागाला ठार मारून टाकलं. लहानशा वयात केवढं हे धाडस! पण हा उपाय केल्याखेरीज चिमुकली अंडी वाचणार नाहीत, हे तिच्या चाणाक्ष बुद्धीने ओळखलं होतं.
 त्या वेळच्या बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे या छोट्या सावित्रीचं  वयाच्या सातव्या वर्षीच बारा वर्षं वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न लावून देण्यात आलं. पण या विवाहाने छोटी सावित्री आनंदित झाली, कारण तिला तिच्या स्वतंत्र विचारांना न्याय देणारा माणूस, एक सुधारणावादी जोडीदार भेटला होता. ज्योतिबा फुले विचारवंत, कार्यकर्ते, समाजसुधारक होते. त्यावेळी समाजात शिक्षणाला विरोध होता. पण तो पत्करून त्यांनी शिक्षण घेतलं आणि सावित्रीबाईंनाही स्वतः शिकवलं. असं म्हणतात की, शेतात काळ्या मातीवर आंब्याच्या झाडाच्या वठलेल्या काटकीने ते अक्षर काढून दाखवत आणि सावित्रीबाई अक्षर लिहून दाखवत. समाजातली स्त्रियांची एकूण परिस्थिती बघून स्त्रियांनी शिक्षण घेतलं तरच त्यांचा उद्धार होईल, हे सावित्रीबाईंनी जाणलं होतं. त्यांना ज्योतिबासारखा पाठिंबा होताच.  शिक्षण पूर्ण झाल्यावर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. आधी लोक मुलींना शाळेत पाठवायला मुळीच तयार नव्हते. त्यावेळी भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं. यावर उपाय म्हणून सावित्रीबाईंनी समाजाला ब्रिटिशांचा धाक दाखवला, समाजाचं प्रबोधन केलं. अखेर या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांच्या शाळेत प्रथम सहा मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई स्वतः शाळेत जाऊन शिकवू लागल्या. अशा तर्‍हेने त्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. तिथेच त्यांनी स्त्रीशिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्याची ज्योत पेटवली. तो दिवस होता एक जानेवारी 1848! केवळ एक वर्षातच तिथे शंभर मुली शिकायला येऊ लागल्या. मग सावित्रीबाईंच्या शिक्षणकार्याची घोडदौड सुरू झाली. पुढच्या चार वर्षांमध्येच त्यांनी पुणे आणि नगरमधल्या आजूबाजूच्या भागांमध्ये तब्बल 18 शाळा सुरू केल्या. अशा प्रकारे त्यांच्या घनघोर तपश्‍चर्येला फळ येऊ लागलं. समाजाला स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटायला लागलं. ब्रिटिश सरकारनेदेखील याची दखल घेतली आणि 1852 मध्ये मेजर क्यंडी यांच्या हस्ते फुले दांपत्याचा सत्कार करण्यात आला. त्या घटनेने समाजात स्त्री शिक्षणाला मान्यता मिळाली. नाईलाजाने असं म्हणावं लागतं की, त्यावेळी आपल्या कर्मठ समाजापेक्षा सुधारणावादी ब्रिटिश सरकारनेच फुले दांपत्याचं मोल ओळखलं. स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला होता. फुले दाम्पत्याने समाजाला केवळ उपदेश देऊन प्रबोधन केलं नाही तर कृतीतूनही दाखवून दिलं. सावित्रीबाईंनी स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध कडाडून हल्ला चढवला. विधवा स्त्रियांचं केशवपन थांबवण्यासाठी त्यांनी समाजातल्या न्हाव्यांना समजावून सांगून मनपरिवर्तन केलं. प्रबोधन करून त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहालाही मान्यता मिळवून दिली. बालविधवा स्त्रियांवर बळजबरीने मातृत्व लादलं जायचं. त्यातून होणार्‍या भृणहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं. तिथे अशा स्त्रियांपोटी जन्मलेली मुलंं आनंदाने वाढत आणि त्या स्त्रियाही तिथेच रहात असत. त्यांनी अशा मुलांसाठी अनाथ बालकाश्रमसुद्धा काढला. पुढे फुले दाम्पत्याने तिथल्याच काशीबाई नावाच्या बालविधवा स्त्रीच्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याला शिकवून मोठं केलं. यशवंत पुढे डॉक्टर झाला. त्यानेही फुले दांपत्याच्या समाजकार्याला मोठा हातभार लावला. समाजातली अस्पृश्यता मिटवण्यासाठी ज्योतिबांनी घरातली पाण्याची विहीर समाजासाठी खुली केली. त्याला सावित्रीबाईंची खंबीर साथ होती.
त्यावेळी त्यांना समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला. सावित्रीबाईंनी सतीची क्रूर चालही बंद पाडली. आज समाज अनेक योजने पुढे आला आहे मात्र आजही लढवय्या व्यक्तिमत्त्वांची गरज संपलेली नाही. आजही समाजाला दिशा देणार्‍यांची आवश्यकता आहे. सावित्रीच्या लेकी घडवणार्‍या द्रष्टेपणाची आजही गरज आहे. म्हणूनच सावित्रीबाईंच्या विचारांचा विसर पडता कामा नये. त्यांचं सतत स्मरण रहायला हवं.

Exit mobile version