शिक्षण व्यवस्थेतील स्थित्यंतरे

संजय टाकळगव्हाणकर

शिक्षण हे समाज व राष्ट्रनिर्मितीचे केंद्र आहे याचे सोयरसुतक राज्यकर्त्यांना, नोकरशाहींना व शिक्षकांना न राहिल्याने दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षणाच्या मृगजाळ्याकडे म्हणजेचं खाजगी संस्था व कोचिंग क्लासेसकडे समाज धावतांना दिसत आहे. समाजासाठी ही शैक्षणिक व्यवस्था निर्माण करुन याचं शिक्षण व्यवस्थेतील सर्वघटकांनी अर्थप्राप्तीसाठी शिक्षणांचे रुपांतरण धंद्यात केले. त्यामुळे एकेकाळच्या समानतेच्या शिक्षणाला छेद देवून शिक्षण व्यवस्थेत विषमतावादी व चातुर्वर्ण्य शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली आहे. गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली मध्यम व निम्न मध्यमवर्गीयांनी शासकीय व शासन अनुदानित शाळेतून आपल्या मुलांना काढण्यास सुरुवात केली. भारताच्या डीआयएसईच्या 2020 च्या अहवालानुसार 1998 पाासून खाजगी शाळेतील मुलांचा आलेख हा सातत्याने वाढत गेला 1978 मध्ये 3.4 टक्के विद्यार्थी ही खाजगी शाळेत होती. 2019 मध्ये 49.5 इतके विद्यार्थी खाजगी शाळेत वाढत गेले. आजमितीस देशातील अर्धे विद्यार्थी म्हणजे सुमारे 12 कोटी विद्यार्थी खाजगी शाळेत शिक्षण घेत आहे. त्यासाठी पालकवर्ग 10 हजार ते 3 लाख इतका वार्षिक खर्च करतो. उर्वरित 12 कोटी मुले शासकीय व शासन अनुदानित शाळेत शिक्षण घेतात. एका विद्यार्थ्यांमागे शासनास सरासरी वार्षिक 36 ते 40 हजार रुपये खर्च येतो. यात विद्यार्थ्यांना मिळणार्या सवलती, शाळेच्या भौतिक सुविधासह शिक्षकाच्या पगाराचा समावेश आहे. खाजगी शाळेत आपली मुले पाठवणारे 73 टक्के पालक हे मध्यम व निम्य मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे खाजगी शाळेत केवळ श्रीमतांचीचं मुले जातात ही चुकीची भावना या सर्वेक्षणातून दुर झाली. देशातील एकंदरीत शिक्षण पद्धतीत एक सुत्रता आणण्यासाठी केंद्राने नियुक्त केलेल्या एका समितीच्या आढाव्या अनुषंगाने विद्यमान निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत एकेठिकाणी म्हणतात की, खाजगी शिक्षण संस्थेत दर्जेदार शिक्षण गुणवत्ता मिळते ही बाब पूर्णतः सत्य नाही. एकंदरीत बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत यतक्विंचितचं फरक पडतो. खाजगी शिक्षण संस्थेतील केवळ 60 टक्के शाळा ह्या दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यास पात्र ठरतात. त्यामुळे सरकारी व खाजगी शाळेतील नावाने जो अपप्रचार केला जातो त्यात अंशतः सत्यता असल्याचे दिसून येते.
शिक्षण – समतावादाकडून पुन्हा नवचातुर्यवर्ण्य केंद्रित विषमतावादाकडे
अलीकडे खाजगी शिक्षण संस्था व शिकवणीचे क्षेत्र हे अत्यंत झपाट्याने वाढले आहे. या क्षेत्रातील वार्षिक उलाढाल 1.5 ते 2 लक्ष कोटी रुपयाची आहे. यावर शासनाचे पाहिजे तेवढे नियंत्रण नाही. तर दुसरीकडे शाासनाच्या शैक्षणीक संस्थांमध्ये कुशल व अपुरे मनुष्यबळाच्या अभावी या शैक्षणिक संस्था काम करत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेवून जागतिक स्तरावरील ऑनलाईन, डिजीटल कंपन्यांनी या क्षेत्रात कोरोना जागतिक संकटाचे निमित्त समोर करुन उडी घेतली आहे. यासाठी वरील परिस्थिती कारणीभूत आहे. या ठिकाणी विश्‍वबँक व बिल गेटस या माहिती व तंत्रज्ञान क्षेतात्रील विख्यात व्यक्तीच्या कंपनीने ग्लोबल शिक्षण नितीच्या मार्फत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जगातील सर्व शिक्षण एका डिजीटल प्लॅटफार्मवर आणण्याची योजना आखली आहे. शिक्षण क्षेत्र जगातील आर्थिक उत्पनाचे तीसरे क्रमांकाचे क्षेत्र असल्याने यावर ऑनलाईन कंपनीचा डोळा पूर्वीपासूनच आहे. आंतरराष्ट्रीय बायजू या ऑनलाईन कंपनीने काही महिन्यापूर्वीचं भारतातील ‘आकाश’ ही खाजगी संस्था 72 हजार कोटी रुपयात विकत घेतली आहे.यावरून शिक्षण क्षेत्रावर ह्या बडया कंपन्या कसा कब्जा करीत आहे याचे हे उदाहरण आहे. ऑनलाईन कंपन्या आपल्या आर्थिक साम्राज्याच्या जोरावर जगातील शासनकर्त्यावर दबाव आणून गेल्या अनेक दशकापासून सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी अस्तित्वात आलेल्या शैक्षणिक संस्था बंद पाडून ऑनलाईन शिक्षण व्यवस्था जगावर लादण्याचा डाव साधत आहे. त्यास शासनकर्ते या दबावास बळी पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. पण हे सर्व होत असतांना शिक्षण क्षेत्रातील शिक्षकवर्ग, संस्था चालक, पालक मात्र याकडे निमुटपणे पहात आहेत. ही शोकांतिका आहे. भारतावर जेव्हा जेव्हा परदेशी आक्रमन झाले त्या त्या वेळी देशातील राजेशाही आपल्या ऐश आरामात मशगुल होती. आज शिक्षण क्षेत्रात आक्रमण होत असतांना शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मंडळी, पालकवर्ग हे सर्व निमुटपणे पाहत आहे. एकेकाळी मुंबई हे कापड गिरण्याच्या माध्यमातून भारताचे एक आर्थिक केंद्र होते. कालांतराने गिरणी मालक व कामगार यांच्यातील संघर्ष वाढला. गिरण्या बंद पडल्या. लाखो कामगार बेरोजगार झाले. देशोधडीला लागले. यातून गरीबी, गरीबीतून अवैध व्यवसाय व गँगस्टर संस्कृतीचा उदय झाला. यात हजारो कामगारांच्या संसाराची राख रांगोळी झाली. आज बहुजनांसाठी निर्माण झालेल्या शिक्षणव्यवस्थाही अशाचं वळणावर येवून ठेपली असतांना ना शिक्षणसंस्थेला, ना शिक्षकाला, ना पालकाला त्यांची चिंता आहे. शिक्षणात, रोजगार अभावी भरकटत असलेला तरुण आता कोणत्या मार्गाने जाणार आहे हे कोरोना पर्वानंतर आपणास कळेल.

Exit mobile version