अंतराळ संशोधन नि विस्तारलेले मानवी कर्तृत्व 

राज कुलकर्णी

चंद्रावर पडलेलं पहीलं पाऊल हे केवळ अमेरिकन व्यक्तीचं नव्हतं तर ते समस्त मानव जातीचं होतं. मानवाची ती उत्तुंग झेप होती. आकाशाला गवसणी घालताना, विश्वाशी नाते जोडताना मन आकाशासारखे व्यापक आणि ह्रदय विश्वाप्रमाणे विशाल करायला हवे, ही भावना महत्वाची असते. संशोधन पातळीवर अशा मोहिमांची उपयुक्तता अनेक बाबतीत असू शकेल पण मानवी पातळीवर याची उपयुक्तता ही सर्व जगातील मानव एक आहे हे अधोरेखित करणारी आहे.

भारतीय चंद्रयान आकाशात यशस्वीपणे झेपावले लवकरच ते चंद्रावर यशस्वी लँडिंग देखील करेल ,अशी आशा आहे.
हा समस्त भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. या यशाबद्दल इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ, दिवंगत शास्त्रज्ञ विक्रम सारभाई, सतिष धवन, डॉ. भटनागर, तसेच पंडित नेहरूंपासून ,आज वरचे सर्व पंतप्रधान, माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे ही योगदान असून विद्यमान मा.पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे ही अभिनंदन!  
भारताची चंद्रयान मोहिम प्रगतीपथावर असतांना एक घटना अंतराळ संशोधन विश्वात दुर्दैवाची घडली ती अशी की, रशीयाच्या ल्यूना या चंद्रमोहीमेतील यानाचे चंद्रावर लँडिंग न होता ,ते चंद्रभुमीवर आदळले.ही घटना समस्त मानवजातीसाठी खूप दु:खद अशी घटना आहे, कारण अंतराळ संशोधन हे अंतर्राष्ट्रीय पातळीवर सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व या स्वरूपात होत असते. एखाद्या देशाची अंतराळ संशोधन मोहीम यशस्वी होणे हे त्या देशासाठी त्या मोहिमेतील शास्त्रज्ञासाठी स्वकर्तृत्व म्हणून अभिमानाची असली तरी ती मोहीम समस्त मानव जातीच्या कर्तृत्वाच्या परीघाच्या कक्षा रूंदावणारी असते. म्हणून तर चंद्रावर ठेवलेल्या त्या आपल्याच पावलांकडे पाहून तो निल आर्मस्ट्राँग 20 जुलै 1969 रोजी
चंद्रभुमीवरच म्हणाला होता,      
चंद्रावर पडलेलं पहीलं पाऊल हे केवळ अमेरिकन व्यक्तीचं नव्हतं तर ते समस्त मानव जातीचं होतं. मानवाची ती उत्तुंग झेप होती. आकाशाला गवसणी घालताना, विश्वाशी नाते जोडताना मन आकाशासारखे व्यापक आणि ह्रदय विश्वाप्रमाणे विशाल करायला हवे, ही भावना महत्वाची असते. संशोधन पातळीवर अशा मोहिमांची उपयुक्तता अनेक बाबतीत असू शकेल पण मानवी पातळीवर याची उपयुक्तता ही सर्व जगातील मानव एक आहे हे अधोरेखित करणारी आहे.याबरोबरच आपण मनात देश,वंश,धर्म या सारख्या अहंभावाच्या नि सर्वश्रेष्ठत्वाच्या कितीही उत्तुंग केल्या असल्यातरी विश्वाच्या पसा-यासमोर आपण अगदी मातीचा कणही नाहीत, एवढे आपण क्षुद्र आहोत, याची जाणीव करून देणारी असते! पण अहंकाराच्या व दांभिकतेच्या आजच्या वातावरणात रशियान यान कोसळले या मानव जातीसाठी दुर्दैवी असलेल्या घटनेवरही विकृत आनंद व्यक्त केला जात आहे.
भारत, रशिया यांची तुलना करून रशियन
शास्त्रज्ञांची खिल्ली उडवली जात आहे, ही बाब योग्य नव्हे! खरेतर अमेरिकने चंद्रवर पहिल्यांदा स्वारी यशस्वी केली असली तरी आंतराळ प्रवासाची सुरूवातच रशियाने केली होती आणि अमेरिकेनंतर रशियानेही चंद्रावर लँडिंग केलेले आहे. मात्र या बाबतीत अनेक शंका आहेत पण रशियन कॉस्मोनॉट अलेक्सी लिनोव यांने स्पेस वॉक केलेला आहे. भारताला या बाबतीत अनेक आव्हाने आहेत आणि भारतीय अंतराळवीराचे पाऊल चंद्रावर नक्कीच पडेल अशी आशा आहे. असे असतानाही एखाद्या अपयशाबद्दल अशी खिल्ली उडवणे योग्य नव्हे.
अमेरिका ,रशिया यांच्या अनेक आंतराळ मोहीमा अयशस्वी झाल्या आहेत, भारतानेही असे अपयश अनुभवले आहे, पण अशा अपयशाने खिन्न न होता ,पुढे प्रयत्न करणे महत्वाचे असते. रशियन स्पेस मिशन सोयूज यानाचा 1971 साली स्फोट झाला होता तर अमेरिकन स्पेस मिशन चँलेंजरचा 1986 साली उड्डानानंतर स्फोट झाला होता, तर 2003 साली कोलंबिया या यानाचा स्फोट होऊन भारतीय वंशाच्या कल्पना चावला या एस्ट्रोनॉट सह अनेकांचा मृत्यूही झाला होता. अमेरिकन अपोलो आणि रशियन सोयूज यांच्या एकत्रित मोहीमेदरम्यानही अपघात घडलेले आहेत. आजवर अशा घटनांत 15 अमेरिकन तर 4 रशियन अशा 19 आंतराळवीरांनी आपल्या प्राणांची आहुती पृथ्वीवरील मानवजातीचे प्रतिनिधित्व करताना दिलेली आहे. पण आपल्या संकुचित मनात शौर्यांच्या संकल्पनाच खूप कोत्या आहेत ,म्हणून या वीरांसमोर आपल्याला वेगळेच शुरवीर मोठे वाटतात !
अंतराळ संशोधन हा विकसनशीन राष्ट्रांसांठी पांढरा हत्ती आहे काय ? हा विषय अनेक मानवतावादी विचारवंतात चर्चिला जाणारा विषय आहे. अमेरिकन चांद्रमोहीन अपोलो -11 ने चंद्रभुमीवर मानवी पाऊल ठेवले आणि ही अभिमानाची असली तरी अमेरिकेतही या
मोहिमेवर टिका करणारा विचारवंतांचा मोठा वर्ग होता आणि आज ही आहे. पण म्हणून कोणी अमेरिकन नागरीकाने वा अमेरिकन नागरीकांच्या समुहाने , या आंतराळ संशोधन विरोधी विचारवंताना देशद्रोही म्हटले नव्हते आणि नाहीही! अमेरिकेच्या अणुबाँब निर्मिती प्रकल्पाचा कडाडून विरोध करणारे लिओ झलार्ड आणि त्याचे सहकारी यांनाही कोणी देशद्रोही म्हणत नाही, कारण विश्व पादाक्रांत करायला निघालेल्या देशातील नागरीकांच्या मनात तेवढी प्रगल्भता नक्कीच आहे! कारण या दरम्यान भारतात आणखी एक घटना अशी घडली की, अभिनेते प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेवर टिका केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ही बाब चुकीची आहे!
मला इथे जांन निसार अख्तरचा एक शेर आठवतो…
ये ठीक है, सितारों पे घूम आये हम
मगर किसे है सलीक़ा ज़मीं पे चलने का……
चंद्रावर चालण्याचं स्वप्न पाहणा-या लोकांनी सर्व प्रथम मनाला विश्वाएवढं व्यापक नि विशाल करायला हवं. आम्ही कॉलेजात असतांना एका कॉमर्स स्टुडंटने व्यापार व्यवसायाच्या क्षेत्रात कष्टाचे महत्व सांगताना, एक जोक सांगीतला होता. एक गिर्यारोहकांचा समुह हिमालयाच्या एका उंच टापुवर पोचला, रात्र बरीच झाली होती, सकाळी उठून सिलेब्रेशन करायचे म्हणून ते एका टेंटमधे झोपले. सकाळी लवकर उठले , आजूबाजूला पाहीलं, तर उडपी हॉटेलमधील मुलगा ‘ए काफी काफी’ करत ,थर्मास घेऊन तीथे हजर होता.
प्रकाश राज यांची कॉमेंट अशीच होती. पण
प्रकाश राज यांची कॉमेन्ट समजण्या इतपत समज बहुतांशी लोकांना नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला !
मध्ययुगात मानवाला पृथ्वीवरील खंड उपखंड माहीत नव्हते, म्हणून ते समुद्र सफरीवर निघाले. बार्थलोम्यू डायस, फर्डीनांड मंगोलन, वास्को द गामा, कोलंबस ही जून्या काळात नव्या भुमीच्या शोधात निघालेले शुरवीर होते! उद्या मानव नव कोलंबस होऊन चंद्रच काय पण मंगळ, शुक्र करत करत अगदी नेपच्युनवरही आपल्या पावलांचा ठसा उमटवेल पण पृथ्वीवरील माणसांसोबत माणसासारखं कसं चालायचं वा कसं वागायचं याची पावले टाकण्याचा प्रगल्भपणा केंव्हा शिकणार हा मोठा प्रश्न आहे ! 


Exit mobile version