खलिस्तानचे खच्चीकरण

बळवंत वालेकर

अलिबाग शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. हे शहर रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असून आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाची वेधशाळा येथे आहे. या शहरास निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. नारळी-पोफळीच्या बनांनी ते लपेटलेले आहे. शांत वातावरण व स्वच्छ सागर किनारा या शहरास लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांचे ते आकर्षण ठरले आहे. कॅटामारनच्या सुविधेमुळे तासाभरात मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) गाठता येते. रो-रो मुळे वाहनासह अलिबाग तसेच मुरुड गाठता येते. सरखेल कान्होजी आंग्रे यांची राजधानी असलेला कुलाबा किल्ला या शहराचा इतिहास जागवितो. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचे अलिबाग हे गाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले. ते लष्कर प्रमुख असताना अलिबाग येथील इंडस्ट्रीयल हायस्कूल – विद्यमान जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूलला त्यांनी दिनांक 28/9/1985 रोजी भेट देऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला तसेच कृतज्ञता म्हणून शाळेला देणगीही दिली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आदेशानुसार लष्कर प्रमुख अरुणकुमारांनी अमृतसर (पंजाब) येथे ऑपरेशन ब्लू स्टार केल्यामुळे शिखीस्तानची चळवळ चिरडली म्हणून पंजाब प्रांत भारतापासून फुटू शकला नाही. परंतु लष्कर प्रमुख अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर गेले. वैद्य साहेब लष्कर प्रमुख असे पर्यंत त्यांना सुरक्षा कवच (सिक्युरिटी) होती. पण ते वयोमानानुसार लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होताच त्यांचे सुरक्षा कवच काढले गेले. निवृत्ती काळात ते पुणे येथे आयुष्याची सायंकाळ घालवीत होते. या संधीचा फायदा अतिरेक्यांनी घेतला. आणि त्यांच्या निवास स्थानाजवळ त्यांच्यावर दिनांक 10/8/1986 रोजी गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते शहीद झाले. आज दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी त्यांचा 35 वा स्मृती दिन आहे.
रायगड जिल्हा ही नररत्नांची खाण.
शिवछत्रपती व सरखेल कान्होजी राजे यांची कर्मभूमी असलेला हाच जिल्हा आहे. भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य विनोबा भावेंचे गागोदे तर भाषांतरकार वैजनाथ काशिनाथ राजवाडे आणि त्यांचे बंधू इतिहास संशोधक विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे यांची वरसई (ता. पेण) ही जन्मभूमी. माझा प्रवास हे आत्मचरित्र लिहिणारे संस्कृतचे गाढे अभ्यासक विष्णू भट बाळकृष्ण भट गोडसे देखील गागोदेचे सुपुत्र, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची पळस्पे (पनवेल) ही जन्मभूमी, इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार बिरवाडी (महाड)चे, काळकर्ते संपादक शिवराम महादेव परांजपे यांची महाड ही जन्मभूमी, थोर साहित्यिक वामन मल्हार जोशी, नारायण मल्हार जोशी व विश्‍वनाथ मल्हार जोशी या बंधूंची गोरेगाव (माणगाव) ही जन्मभूमी, भारताचे माजी अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्न चिंतामणराव देशमुख नाते (महाड) येथे जन्मले. रोहे येथे त्यांचे बालपण गेले. स्वाध्यायकार पांडुरंग शास्त्री आठवले रोह्याचे सुपुत्र, थोर निरुपणकार, वाल्याला वाल्मिकी बनविणारे, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा ही जन्मभूमी, पेशवाईचे संस्थापक बाळाजी विश्‍वनाथ श्रीवर्धनचे, जागतिक कीर्तीचे शिल्पकार विनायक पांडुरंग (नानासाहेब) करमरकर सासवणे (ता. अलिबाग)चे सुपुत्र. 1870 साली सत्यसदन हे वर्तमानपत्र व 1874 साली सर्वमित्र हे वर्तमान पत्र सुरू करुन कुलाबा जिल्ह्यात वृत्तपत्रांचा पाया घालणारे रावजी हरी आठवले हे अलिबाग चे सुपुत्र होते. (ही नामावली अपूर्ण आहे.)
हुतात्मा स्मारकांची दुर्दशा.
रायगड जिल्ह्यातील सुपुत्रांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात, पत्रकारितेत, समाज प्रबोधनात तसेच साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. हे योगदान नवीन पिढीला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरते
ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे स्मारक वढाव (ता. अलिबाग) येथे उभारण्यास शासनाने मान्यता दिली. निधीही मंजूर झाला. भूमीपूजनही यथासांग पार पडले. पण विघ्न संतुष्ट यामुळे माशी शिंकली व प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य अलिबागचे. त्यांचे पिताश्री श्रीधरपंत अलिबाग येथे जिल्हाधिकारी होते. त्याचकाळात त्यांचे अलिबाग येथे शिक्षण झाले. अलिबाग या जन्मभूमीवर तसेच इंडस्ट्रियल हायस्कूलवर त्यांचे नितांत प्रेम होते. या प्रेमापोटी ते लष्कर प्रमुख असताना वेळात वेळ काढून इंडस्ट्रियल हायस्कूलला भेट देण्यासाठी आले व कृतज्ञता व्यक्त केली, ते लष्करप्रमुख असताना इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्याच काळात खलिस्तानच्या मागणीने जोर धरलेला होता. भारताच्या ऐक्यासाठी खलिस्तान चळवळ नष्ट करणे गरजेचे होते. ही कामगिरी इंदिराजींनी लष्कर प्रमुख वैद्य साहेबांवर सोपविली. शीख अतिरेक्यांचे सुवर्ण मंदिर हे केंद्रबिंदू होते. म्हणून तेथे ऑपरेशन ब्लू स्टार घडविण्याचे लष्कर प्रमुखांनी ठरविले. त्यानुसार कृतीही केली. या कृतीमुळे वैद्य साहेब अतिरेक्यांच्या हिटलिस्ट मध्ये आले. ते लष्कर प्रमुख पदावर असेपर्यंत त्यांना शासकीय संरक्षण कवच (सिक्युरिटी) होते. ते नियत वयोमानानुसार लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त होताच त्यांचे शासकीय संरक्षण कवच नष्ट झाले. खरे पाहता ते अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे सेवा निवृत्ती काळातही शासकीय संरक्षण कवच त्यांना पुरविणे हे शासनाचे कर्तव्य होते. अरुणकुमार वैद्यसाहेब निवृत्ती नंतर आयुष्याची सायंकाळ पुणे येथे घालवीत होते. ही संधी अतिरेक्यांनी साधली. व दिनांक 10/8/1986 रोजी शीख अतिरेक्यांकडून तेशहीद झाले.
इंडस्ट्रियल हायस्कूलचे नामांतर
माजी भूदल प्रमुख शहीद झाल्याच्या बातमीने अलिबाग शहर दुःख सागरात बुडाले. शहीद झालेले जनरल अरुणकुमार वैद्य हे एकमेव लष्करप्रमुख होते. ते भारताचे भूदल प्रमुख होताच त्यांनी इंडस्ट्रियल या स्वतःच्या शाळेस कृतज्ञतापूर्वक भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. देशाची एकात्मता टिकविण्यासाठी शहीद झालेल्या अरुणकुमारांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहाण्यासाठी इंडस्ट्रियल हायस्कूलला वैद्य साहेबांचे नाव द्यावे अशी चर्चा अलिबाग शहरात सुरु झाली, परंतु या चर्चेस मूर्त स्वरुप येण्यासाठी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना भेटावयास हवे. पण हे धाडस कोणी ही करीत नव्हते. सदर लेखक त्यावेळी इंडस्ट्रियल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. शिवाय या हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य (शिक्षक प्रतिनिधी) आणि को. ए. सो. च्या विकास नियतकालिकाचे संपादक होते. त्यांनी प्रथमतः इंडस्ट्रियल हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक श. वि. पटवर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही को. ए. सो. पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी सदर लेखकांनाच सांगितले. सायंकाळी को. ए. सो. चे पदाधिकारी रायगड बाजार येथे जमतात. म्हणून एका सायंकाळी संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. दत्ता पाटील. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, रायगड बाजारचे सरव्यवस्थापक प्रताप सरनाईक रायगड बाजारात बसलेले होते. त्याच वेळी सदर लेखक तेथे गेले व अमृतसर येथील ब्लू स्टारमुळे शहीद झालेले जनरल अरुणकुमार वैद्य इंडस्ट्रियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते भूदल सेना प्रमुख असताना शाळेला कृतज्ञता भेटही दिली. म्हणून त्यांचे नाव इंडस्ट्रियल हायस्कूलला द्यावे अशी विनंती सदर लेखकाने केली. ही सूचना रायगड बाजारचे सरव्यवस्थापक सरनाईक यांना फारच भावली. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तथा को. ए. सो. चे संचालक प्रभाकर पाटील यांनीही सूचनेचे स्वागत केले. त्यानंतर सूचनेस मान्यता देताना कार्याध्यक्ष अ‍ॅड. दत्ता पाटील म्हणाले शाळा समितीचा ठराव मुख्याध्यापकांना करावयास सांगा. त्यानंतर पुढील कार्यवाही करतो. सूचना मान्य केल्याबाबत संबंधितांचे सदर लेखकाने आभार मानून निरोप घेतला. त्यानंतर इंडस्ट्रियल हायस्कूलच्या व्यवस्थापन समितीने इंडस्ट्रियल हायस्कूलचे नामकरण भारताचे माजी भूदल सेना प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल अलिबाग असे करावे असा प्रस्ताव करून तो पुढील कार्यवाही साठी को. ए. सो. कडे पाठविण्यात आला. त्यानंतर शिक्षण खात्याची मान्यता घेऊन त्या ठरावाची कार्यवाही करण्यात आली. माची – सागरगड या आदिवासीवाडीस भौतिक सुविधा मिळण्यासाठी सदर लेखक 21 वर्षे झगडले. म्हणून या वाडीस भौमितिक सुविधांसाठी 10 एकर जागा शासनाने दिली. या सामाजिक कामाचा विचार करुन जिल्हा परिषदेने सदर लेखकाचा रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला सदर वेळी जि.प चे अध्यक्ष पंडितशेठ पाटील होते. निष्णात विधीज्ज्ञ व माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. माधवराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तत्कालीन पालक मंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी सदर लेखकाचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील तरुणांना लष्करी प्रशिक्षण मिळून अधिकारी होण्याची संधी मिळण्यासाठी माजी आमदार नानासाहेब पुरोहित यांनी महाड येथे सैनिकी शाळा सुरू केली होती. सदर शाळेला प्रतिसाद ही चांगला होता. पण त्यांच्या पश्‍चात या शाळेत पांढरे उंदीर घुसल्यामुळे सदर शाळा बंद करावी लागली. सदर सैनिकीशाळा पुन्हा सुरु करुन जिल्ह्यातील तरूणांना लष्करी अधिकारी बनण्याची संधी द्यावी, हीच वैद्य साहेबांना श्रद्धांजली ठरेल.

Exit mobile version