प्रार्थना स्थळे आणि मानवता!

जयंत माईणकर

अखंड भारताचेच भाग असणार्‍या पाकिस्तान आणि बांगला देश या दोन शेजारील राष्ट्रात त्या देशात अल्पसंख्याक आणि भारतात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करण्याची घटना घडल्या आहे. घटना निश्‍चित निंदनीय आहे.पण इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करणारे अतिरेकी जवळपास सर्वच धर्मात आहेत. सहा डिसेंबर 1992 रोजी अशाच अतिरेकी हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली.देशात बाबरी पतनानंतरअनेक ठिकाणी दंगली झाल्या. आत्तापर्यंत देशभरात या प्रकरणात सुमारे दहा हजार लोक जातीय दंगलीत मारले गेले तर देशाच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच नुकसान झालं आहे.
तिन्ही देश आज वेगळे असले तरीही एकमेकांच्या सामाजिक आणि राजकीय घटनांचा प्रभाव एकमेकांवर असतोच. माझे मित्र क्रीडा प्रतिनिधी स्व सुंदर राजन एकदा मला म्हणाले होते,रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर आणि बाबरी मस्जिद पडण्याच्या आधी ते क्रिकेट सिरीज कव्हर करण्यासाठी पाकिस्तानला गेले होते.त्यावेळी ते भारतीय आहेत असं समजल्यानंतर त्यांना एअरपोर्ट पासून हॉटेलमध्ये नेणार्‍या टॅक्सी ड्रायव्हरने प्रश्‍न विचारला, साब, बाबरी गिराई गयी क्या?स्व सुंदर राजन यांचं उत्तर अर्थात नकारार्थी होतं. पण ही घटना इथे लिहिण्याचा उद्देश इतकाच की या तिन्ही देशातील सर्व सामाजिक, राजकीय घटनांचा एकमेकांवर परिणाम होतो.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात काही समाजकंटकांनी हिंदू समुदायाच्याया गणेश मंदिराची तोडफोड केली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर टीका करण्यात आली. संबंधित आरोपींवर पोलिसांकडून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. पण पाकिस्तानच्या सर्वाच्च न्यायालयानं या घटनेची दखल घेतल्यानंतर, संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारे आतापर्यंत 50 जणांना अटक केली आहे. तसेच 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना बुधवारी 4 ऑगस्ट रोजी घडली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंदिरात तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आहे आणि पाकिस्तान सरकार मंदिराचा जीर्णोद्धार असही म्हटलं आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांकडे या घटनेविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.
गेल्या आठवड्यात 8 वर्षे वयाच्या एका हिंदू मुलाने नजीकच्या मुस्लीम मदरशाच्या वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलाला गेल्याच आठवड्यात अटक करण्यात येऊन त्याच्यावर ईश्‍वारनिंदा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अल्पवयीन असल्याने नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. मुस्लीम व हिंदू अनेक दशकांपासून शांततेने राहात असलेल्या भोंगमध्ये या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.
सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ त्यांच्या ट्विटर वॉलवर टाकले.
तिकडे बांगला देशातही खुलना या गावात दोन समाजच्या प्रार्थना , कीर्तन यावेळी त्यांच्या समर्थकात झालेल्या बाचाबाचीच पर्यवसान दंगलीत झालं. काही दुकाने लुटली गेली आणि मूर्तींचीही विटंबना केली.मार्च मध्ये बांगलादेश- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपताच शेजारी देशात हिंदुंच्या मंदिरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. पूर्व बांगलादेशमध्ये रविवारी कट्टर इस्लामिक ग्रुपच्या शेकडो लोकांनी हे हल्ले केले होते.
पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये कमीतकमी 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. मोदींचा दौरा संपताच निदर्शने अधिक हिंसक बनली. बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौर्‍यावर गेले होते , तेव्हा ही घटना घडली होती.
विरोध करणार्‍या कट्टर इस्लामिक गुपच्या लोकांचा आरोप आहे की, पंतप्रधान मोदींनी भारतातील अल्पसंख्याक लोकांसोबत भेदभाव केला आहे. यामुळे देशात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शने केली गेली.
मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ज्या सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे लोक म्हणून आपल्याला हिंदू हे नाव पडलं त्या सिंधू नदीच्या खोर्‍यात विकसित झालेल्या सर्वात प्राचीन अशा सिंधू संस्कृतीत एकही प्रार्थना स्थळ आढळलं नाही. सार्वजनिक स्नानगृह असणार्‍या या संस्कृती त एकही सार्वजनिक प्रार्थना स्थळ न आढळणे याचा अर्थ त्या काळी लोकं आपल्या धार्मिक भावना घरापूरत्या मर्यादित ठेवत असत. पण आज सर्वच धर्मीयांमध्ये आपल्या धर्माचा प्रचार रस्त्यावर येऊन करण्याची जोड लागली आहे. धर्माच्या नावाखाली मानवतेला काळिमा फासणार्‍या हिंसक घटना, दंगली प्रत्येक धर्मियांकडून घडतात.बहुसंख्यांकांना नेहमी अल्पसंख्याकांच लांगुलचालन होत असल्याचा आरोप करतात. तर अल्पसंख्याक नेहमी बहुसंख्यांक बहुमताच्या आधारे आपल्या व्यक्तिगत धार्मिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करतात. पण या दोन्ही विचारात मानवतेचा मात्र बळी जात असतो. मानवाची उत्क्रांती की धर्म आधी हा प्रश्‍न मला प्रत्येक धर्मातील अतिरेकी विचारसरणीच्या लोकांना विचारावासा वाटतो.आणि त्याच समर्पक उत्तर मला कोणत्याही धर्माचे तथाकथित पुरस्कर्ते देऊ शकणार नाहीत.कारण खर उत्तर दिलं तर त्यांना त्यांची चूक कबूल करावी लागेल. आणि स्वतः:ची चूक कबूल करण्याची हिम्मत कोणातही नसते. दुर्दैवाने कुठलाही धर्म आपल्या अशास्त्रीय दाव्यांच्या पुष्ट्यर्थ लोकभावना यापलिकडे कुठलंही उत्तर देऊ शकत नाही. कुठलाही शास्त्रीय आधार न घेता प्रत्येक धर्म आपल्या तथाकथित धार्मिक भावनांना जप्त असतो.
धर्म आणि विज्ञानामध्ये मूलभूत फरक आहे. धर्म हुकुमतीवर आधारित आहे आणि विज्ञान हे निरीक्षण व तर्कशुद्ध कारणावर अवलंबून आहे. अंतिमत: विज्ञानाचाच विजय निश्‍चित आहे, कारण ते कामी येते. हे आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे अनमोल बोल
तूर्तास इतकेच!

Exit mobile version