मिश्र डोस प्रभावी, ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ची धास्ती

डॉ. ज्ञानेश्‍वर अयाचित

भारतात तयार होणार्‍या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या मिश्रणाचा डोस घेतल्यास कोरोनाविरोधातल्या लढ्यासाठी जादा प्रतिपिंडं तयार होतात आणि कोरोनावर मात करण्यासाठी हा मिश्र डोस जास्त प्रभावी ठरतो, असा निष्कर्ष केंद्रीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर)ने जाहीर केला आहे. आयसीएमआरच्या मते, अ‍ॅडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म लस आणि निष्क्रिय होल व्हायरस लसीचा मिक्स डोस घेणं सुरक्षित आहे. या दोन लसींचे वेगवेगळे डोस एकाच लसीच्या दोन डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती देतात. कोरोना लस मिक्सिंगचा हा अभ्यास आयसीएमआरने केला. डीजीसीआयच्या तज्ज्ञ पॅनेलने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या मिश्र डोसच्या अभ्यासाची शिफारस केली होती. यानंतर वेल्लोर इथल्या ख्रिश्‍चन मेडिकल कॉलेजमध्ये लसीच्या मिक्स ट्रायल डोसची परवानगी देण्यात आली. मिश्र डोस घेतलेल्या लोकांमध्ये अधिक प्रतिपिंडं तयार झाली. हा अभ्यास तीन गटांमध्ये विभागला गेला. प्रत्येक गटात 40 लोकांचा समावेश होता. लसीकरणानंतर, सर्व गटांमधल्या लोकांच्या सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती प्रोफाइलची तुलना करण्यात आली.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचा मिश्रित डोस घेणार्‍या लोकांमध्ये कोरोनाच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा प्रकारांविरुद्ध लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती होती. अभ्यासात आढळून आलं की दोन लसींचा मिश्र डोस घेतलेल्या लोकांमध्ये समान लसीचे दोन डोस घेणार्‍यांपेक्षा जास्त प्रतिपिंडं तयार होतात. आयसीएमआरचे एपिडेमिओलॉजी आणि संसर्गजन्य रोग प्रमुख डॉ. सिमरन पांडा म्हणाले की अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांना न सांगता वेगळ्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लोकांना लसीच्या दुसर्‍या डोसबद्दल भीती वाटू नये, त्यासाठी हे केलं गेलं. मिश्र डोस गटात 18 लोक होते. यापैकी 11 पुरुष आणि 7 महिला होत्या. त्यांचं सरासरी वय 62 वर्षं होतं. त्यापैकी दोनजण नंतर चाचणीतून बाहेर पडले. त्याच वेळी, एकाच लसीच्या दोन्ही डोससह गटात समाविष्ट 40 लोकांपैकी एका व्यक्तीमध्ये उच्च रक्तदाब दिसून आला.
आरोग्यतज्ञ डॉ. समीर भाटी म्हणाले, या अभ्यासामध्ये फक्त 18 जणांचा समावेश करण्यात आला होता. असे अभ्यास राष्ट्रीय स्तरावरही झाले पाहिजेत. भारतातल्या लोकसंख्येची विविधता लक्षात घेता, हा अभ्यास 60 ते 70 वयोगटातल्या लोकांवरही केला पाहिजे. दोन्ही लसींच्या संयोजनाचं स्पष्टीकरण देताना डॉ. भाटी म्हणतात की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही वेगवेगळ्या सूत्रांवर बनले आहेत. कोवॅक्सिनमध्ये कोरोनाचा मृत विषाणू असतो, जो रोगप्रतिकारक शक्तीला विषाणूच्या संसर्गाविरूद्ध प्रतिपिंडं विकसित करण्याचे संकेत देतो. कोविशिल्डचे विषाणू वेक्टर सूत्रावर आधारित आहेत. सामान्य सर्दीचा कमकुवत विषाणू कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी वापरला जातो. दोन्ही लसींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली असली तरी दोन्हीचा मिश्रित डोस अधिक फायदेशीर ठरेल आणि लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जास्त प्रतिकारशक्ती तयार होईल. संमिश्र डोसमुळे लसीची कमतरता दूर करण्यास मदत होईल.
देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि डेल्टा व्हेरिएंटच्या धोक्यात हा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मिश्रित डोस लसीच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करतील तर विविध लसींच्या डोसमधून लोकांमध्ये प्रतिकूल परिणामांची भीतीदेखील कमी होईल. देशात आतापर्यंत पाच लसींना मान्यता देण्यात आली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला देशात गेल्या आठवड्यातच आपत्कालीन वापराची मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेतल्यानंतरही खबरदारी न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘ब्रेकथ्रू इन्फेक्शन’ असं म्हटलं आहे. भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये झालेल्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर आजाराची किंवा हॉस्पिटलायझेशनची गरज लक्षणीयरीत्या कमी होते.
ब्रिटनमधल्या ‘इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडन अँड मार्केट रिसर्च फर्म’ च्या इप्सोस मोरी यांनी 24 जून ते 12 जुलै दरम्यान 98 हजार 233 नमुने गोळा केले. त्याचं विश्‍लेषण केल्यानंतर नुकताच अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासाला ‘रिक्ट’ असं म्हणतात. यापूर्वी 20 मे ते 7 जून दरम्यानही असा अभ्यास करण्यात आला होता. नवीन अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही 40 टक्के लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. लसीकरणानंतरही तीनपैकी एका व्यक्तीला संसर्गाचा धोका असतो. लसीकरण न झालेल्या लोकांच्या तुलनेत लसीकरण झालेल्या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका 60 टक्के कमी होतो. ब्रिटिश सरकारने 19 जुलैपासून कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केलेले निर्बंध कमी केले आहेत. इनडोअर कार्यक्रमात मास्कवरील बंधनं उठवण्यात आली. मे-जून दरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये संसर्ग दर 0.15 टक्के होता. बंधनं उठवल्यानंतर तो चौपट वाढून 0.63 टक्के झाला. संशोधकांचा दावा आहे की जुलैमध्ये संसर्गाचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे. म्हणजेच कोरोना नियंत्रणात येत आहे.
या अभ्यासात म्हटलं आहे की लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांकडून विषाणू पसरण्याचा धोका नगण्य आहे. सर्वेक्षण कार्यक्रमाचे संचालक आणि इम्पीरियल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक पॉल इलियट म्हणाले की संसर्ग रोखण्यासाठी कोणतीही लस शंभर टक्के प्रभावी नसते. लसीकरण केलेल्या लोकांनाही संसर्ग होत आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. परिणामी, एकमेकांना सुरक्षित ठेवता येऊ शकतं. दोन्ही डोस मिळालेल्यांना कोरोना झाला तरी हॉस्पिटलायझेशनची गरज भासत नाही. फायझरची लस आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस 96 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. लसीकरणामुळे इंग्लंडमध्ये दोन कोटी वीस लाख लोकांना संसर्गापासून दूर ठेवता आलं. लसीकरणानंतरही 52 हजार सहाशे जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लस घेतल्याने 60 हजार जणांना जीवदान मिळालं. सार्वजनिक आरोग्य विभागाचा डेटा सांगतो की डेल्टा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाल्यानंतर एक हजार 788 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 970 जणांचं लसीकरण झालं नव्हतं तर 530 जणांनी दोन्ही डोस घेतले होते.
‘आयसीएमआर’ने 17 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून संसर्गग्रस्त 677 रुग्णांचे नमुने गोळा केले. 86 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकाराची पुष्टी झाली आहे. केवळ 9.8 टक्के प्रकरणांमध्ये, रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि केवळ तीन लोकांचा मृत्यू झाला. हे स्पष्ट आहे की लसीचे दोन्ही डोस मृत्यूपासून वाचवतील; परंतु संसर्गापासून वाचवणार नाहीत. यूएस सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (सीडीसी) च्या मते, चार महिन्यांमध्ये 13 कोटी लोकांना लसीचे डोस दिले गेले. या काळात फक्त दहा हजार ब्रेक थ्रू संक्रमण नोंदवलं गेलं. म्हणजेच, दहा हजार लोकसंख्येमागे एक. रुग्णालयात दाखल झालेल्या 97 टक्के लोकांनी लस घेतली नव्हती. भारतातही, लसीकरणाचा वेग वाढवल्यानंतर, नवीन बाधितांची संख्या कमी झाली आहे.

Exit mobile version