विनोबांची प्रेरणा- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

सुभाष पाटील

रायगडचे सुपूत्र भारतरत्न आचार्य विनोबांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील व स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान युगानुयुगे प्रेरक आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील ही विनोबांची 126 वी जयंती नुकतीच साजरी झाली. विनोबा विचार व जीवनकार्याचे स्मरण समाजाला सदैव नवी उमेद देणारे आहे. विनोबा आपल्या मातृभूमीची सेवा करीत असताना ‘जय जगत’चा मोठा शक्तीशाली पावन मंत्र जगाला दिला आहे. विश्‍वव्यापकत्वाचे द्योतक असलेला ‘जय जगत’चा मंत्र हा विश्‍वमंत्र म्हणून भारतासह जगाला विश्‍वशांतीचा मार्ग व दिशा दाखवणारा आहे.
गांधी विनोबांच्याकडून सामाजिक कार्याचा वारसा घेऊन सन 1975-76 पासून मी सेवेच्या कामात आहे. तेव्हा माझे वय तेरा वर्षाचे होते. सामाजिक कार्याची निरंतर गरज देशाला आहे. सामाजिक सेवाकार्य हे कोणत्याही देशातील समाजसंस्कृतीचा आत्मा आहे. सामाजिक कार्य म्हणजे देशाचा, समाजाचा मणका कणा आहे. देशाच्या बांधणीत व घडणीत सामाजिक कार्य हा पाया आहे. हे गांधी विनोबांनी, ओळखून संपूर्ण देशाला त्यांनी सामाजिक उपक्रम देशाच्या सर्व स्तरावर देऊन मोठ्या आस्थेने व आपुलकीने त्याची दखलही घेत असत. यामुळे देशभर एका व्यापक समाजसेवेचे वातावरण दिसत असे.
विनोबा विचारांचा आधार
पक्ष, प्रांत, जातधर्म, भाषा याकडे पाहण्याची विनोबांची दृष्टी भेदातीत, सखोल, व्यापक, अभ्यासू व उदारतेची होती. म्हणून सर्व पक्षांचे, विविध प्रांताचे, बहुभाषांचे, अनेक जातीधर्माचे नेते व कार्यकर्त्यांना विनोबांचा आधार वाटत असे. विनोबा विचारातील भूमिका आजही अभ्यासूंना महत्वाची वाटते. विनोबांनी आपल्या क्रांतदर्शी स्वभावाप्रमाणे दूरदृष्टीने समाजाला, व्यक्तीला, गटाला, देशाला जगाला वेळोवेळी जागे करण्याचे काम आयुष्याच्या शेवटपर्यंत केलेले आहे. तसेच आजही त्यांच्या राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक विचारांनी कार्यकर्ते, नेते, सामान्य जनता प्रेरित होताना पहायला मिळते. चित्रलेखा साप्ताहिकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेताना प्रश्‍न विचारला, ‘तुम्ही हल्ली काय वाचता?’ तेव्हा सुप्रिया सुळे यांनी विनोबांचे स्वराज्यशास्त्र, लोकनिती, ग्रामस्वराज्य ही पुस्तके वाचते म्हणाल्या, ‘अनेक वक्त्यांच्या व्याख्यानात व संपादकीयात किंवा रविवारच्या पुरवणी स्तंभलेखात विनोबा पुस्तकांचा, विचारांचा उल्लेख उद्धृत होताना दिसते. महाराष्ट्र ज्ञान मंडळ (एमकेसीएल) यांनी तर विनोबांचे संपूर्ण साहित्य ऑनलाईन उपलब्ध करुन संपूर्ण विश्‍वासाठी खुल केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील युगपुरुष या प्रसिद्ध नाटकात बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचा आचार्य विनोबांनी ‘भीमस्मृती’ म्हणून गौरव केल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
सर्वोदयाची दृष्टी ः-
विनोबा आपल्या आम्हा कार्यकर्त्यांना सांगत. ‘संस्थेत गुंतून पडू नका.’संस्था एक सेवेचे साधन-माध्यम आहे. निर्लेप रहा. आपल्या शरीराला सेवेचे साधन म्हणूनच पाहायची व तशीच त्याची निगाही राखायची ही दृष्टी विनोबांची लहानपणापासून पाहायला मिळते. मुख्य वस्तू सेवापरायणता ही आहे. निस्वार्थ, निर्लेप, निष्काम पणाने सेवा करण्याची फार मोठी दिक्षा गांधी विनोबांनी आम्हा त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच देशाला दिली आहे. गांधीजींच्या हत्येनंतर या देशात सेवापरायणतेचा वारसा फार मोठ्या प्रमाणात देशासाठी जगासाठी विनोबांनी आपल्या भूदान ग्रामदान चळवळीच्या रुपाने चालवला आहे. कारण देशाची जगाची ही गरज दूरदृष्टीच्या क्रांतदर्शी ऋषी विनोबांनी ओळखली होती. विनोबांचे आम्ही सर्वोदयी सामाजिक कार्यकर्ते आमच्या जीवनाचा पाया आत्मशोधाच्या आध्यात्मिक साधनेचा ठेवून सामाजिक सेवा कार्य करीत असतात. विनोबांनी सर्वोदय विचारांचा मार्ग समाजाला दिला. सर्वोदय विचारांचे व्रत अंगीकारुन गांधीविनोबांचे सर्वोदयी कार्यकर्ते आपले सामाजिक कार्य करीत आहेत. विनोबांनी आपले विचार व कार्य आपल्या विश्‍वव्यापी मनोवृत्तीप्रमाणे व्यापक ठेवले म्हणून देशभर-जगभर विनोबांचे विचार व कार्याचा स्विकार होऊ शकला. गांधी विनोबा विचार समाजप्रवाही व्यापकपणे सर्वसमावेशक राहिले आहे. हेच सर्वोदयी विचारदृष्टीचे वैशिष्ट्ये आहे.
समन्वयातून समाजपरिवर्तन
स्वातंत्र्यपूर्व पारतंत्र्याच्या काळात स्वयंसेवी संस्था-संघटना यांना खूप महत्व होते. यांच्यामुळेच देशभक्तीची मशाल पेटवून देश स्वतंत्र झाला. इंग्रजाचे सरकार व प्रशासन देशविरोधी व देशद्रोही होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंसेवी संस्था-संघटना, शासन-प्रशासन ही तिन्ही साधने म्हणजे देशाच्या विकासात तिनपाईच्या पायाप्रमाणे आहेत. तिनपाई तिच्या तिनही पायावर मजबूत उभी राहते. तिनपाईच्या तिन्ही पायाचे महत्व सारखेच आहे. एकालाही वगळून चालणार नाही. समाजातील समाजसेवक, शासक, प्रशासक ही तिघेही जेव्हा एकदिलाने तिनपाईच्या पायाप्रमाणे काम करतील तेव्हा उपेक्षित समाजात समक्ष परिवर्तनाची पहाट दिसेल. समाजसेवक, शासक, प्रशासक यांच्या समन्वयांनी समाजाच्या प्रगतीचा मार्ग अधिकाधिक मुक्त, प्रशस्त सशक्त होत असतो. या तिनपाईच्या सत्रानुसार विनोबांचा जन्मजिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यात कर्जतच्या आदिवासी भागात आमच्या हातून या अडतीस वर्षात समाजसेवेतून समाजपरिवर्तनाचे जे काही कार्य झाले याचा लाभ सामान्य समाजाला होत असताना समाधान मिळते. विकासाच्या परिवर्तनाचे दूत म्हणून हे कार्य प्रतिबिंबित आहे.
समाज विकासातील योगदान
विनोबांचा जन्मजिल्हा म्हणून मी रायगड जिल्ह्यात सामाजिक कार्यासाठी सन 1983 पासून आलो. कर्जतच्या अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कुष्ठसेवा प्रकल्पात माधव मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनात कुष्ठतंत्रज्ञ म्हणून कर्जतच्या आदिवासी भागात कुष्ठसेवेेचे कार्य केले. तसेच कशेळे येथील अ‍ॅकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स संस्थेत दर्शन शंकर यांच्या मार्गदर्शनात ज्ञानानुभव विद्यालयाची स्थापना करुन बालवर्गापासून इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या शाळेची निर्मिती केली. विनोबा निवासी कर्णबधीर विद्यालयाची स्थापना करुन कर्णबधीर दिव्यांगाच्या शिक्षणाची सोय केली. ग्रामीण लोकसेवा मंडळ, विनोबा मिशन, समता सार्वजनिक वाचनालय, विनोबा मिशन ग्रंथालय इत्यादी संस्थांची स्थापना ते निर्मिती करुन विशेष सामाजिक कार्य करण्याची धडपड चाललेली असते. या आमच्या विनोबा मिशन व अन्य संबंधित संस्थेच्या अध्यक्षा म्हणून युवकांच्या प्रेरणास्थान पेझारी रायगडच्या सौ. चित्रा आस्वाद पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा उदारतेने व खंबीरपणे हाती घेऊन आमच्या सामाजिक कार्याला गती देत आहेत.
आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांना एकत्र बोलावून त्यांच्या कार्याची दखल घेतली. ही खूप मोठी गोष्ट आहे. जयवंत गायकवाड या व इतर आपल्या सहकारी अधिकार्‍यांच्या पुढाकाराने तसेच स्वयंसेवी संस्थांना घेऊन 215 जणांचा ‘माझा रायगड’ या नावाचा व्हॉटसअप ग्रुप कार्यान्वित केला आहे. या ग्रुपवर समाजातील उपेक्षितांच्या प्रगतीच्या कार्याचे प्रेरणादायी प्रतिबिंब असते. स्वतः डॉ. किरण पाटील हे वेळ काढून ग्रामीण कार्यक्षेत्रात भेट देऊन प्रोत्साहित करतात. हा ‘रायगड माझा’ ग्रुप म्हणजे शासक, प्रशासक, समाजसेवक यांच्या एकत्रित रायगडच्या विकासातील तीनपाईच आहे.
शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था या तिन्हींच्या बाबतीत मला आलेला हा माझ्या कार्यातील अनुभव विशेष आहे. शासन, प्रशासन, समाजसेवक या तिघांसाठीही जनता ही स्वतंत्र व स्वयंभू इच्छित वरदान देणारी आईप्रमाणे आहे. यावर आम्हा कार्यकर्त्यांचा दृढ विश्‍वास आहे. सामाजिक, राजकीय, प्रशासनिक, कार्यात समाजसेवक, शासक, प्रशासक यांनी आपापले कर्तव्य कार्य करताना एकमेकांशी समन्वयांची दृष्टी ठेवून लोकांत कामे केल्यास उत्तम सेवा आकारला येईल व त्या समाजाची वैचारिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक भरभराट होऊन विकासाची गंगा विकासाची प्रकाशकिरणे दारोदारी घरोघरी पाहायला मिळतील.
अशाप्रकारे आज अडतीस वर्षातील आमच्याकडून झालेल्या सार्वजनिक सेवाकार्याचे मूल्यमापन करताना स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षातील 126 व्या विनोबा जयंती निमित्ताने देशाच्या प्रगतीतील आमच्या योगदानाचा हा लेखाजोखा आमच्या समाजकार्याच्या पुढील वाटचालीस महत्त्वाचा आहे. जय जगत्.

Exit mobile version