पवारसाहेब, काँग्रेस नादुरुस्त हवेली होण्यास जबाबदार आपणच!

जयंत माईणकर

आजचा काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखा, असं मत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं. पण काँग्रेसची अशी अवस्था व्हायला ते स्वतः, माजी पंतप्रधान विश्‍वनाथ प्रताप सिंग आणि नरसिंह राव हे तिघेही मुख्यत्वे जबाबदार असल्याचं सांगायला ते जाणीवपूर्वक विसरले. माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी संरक्षण मंत्री असताना राजीव गांधी यांना उद्देशून केलेल्या बोफोर्स तोफ खरेदीतील लाचखोरी च्या आरोपावरून, तर स्वतः शरद पवार यांनी सोनिया गांधी परकीय इटालियन असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सर्वात जास्त ‘डॅमेज’ केलं आहे. पण हे दोन नेते तर काँग्रेसच्या बाहेर पडले आणि संयुक्त सरकार स्थापन करताना काँग्रेसशी सहकार्याची भूमिका घेतली. पण काँग्रेसमध्येच राहून आणि सलग पाच वर्षे देशाच पंतप्रधानपद आणि पक्षाध्यक्षपद भूषविणारे नरसिंह राव यांनी 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पडू देऊन काँग्रेसला सर्वात जास्त धक्का दिला आहे. या धक्क्यातून आज तीस वर्षे होत आली तरीही काँग्रेस सावरली नाही.
बोफोर्स तोफ खरेदीतील 64 कोटी रुपयांच्या लाचखोरीच प्रकरण सुमारे 25 वर्षे देशाच्या राजकारणात गाजलं. तथाकथित शोध पत्रकारितेच्या नावाखाली मोठमोठे लेख, बातम्या लिहिल्या गेल्या आणि शेवटी 25 वर्षांनी या प्रकरणात तथ्य नाही आणि स्व राजीव गांधींना कुठलीही लाच दिली नाही हे स्वीडिश पोलीस ऑफिसरपासून न्यायालयापर्यंत सर्वांनी मान्य केलं. पण 1989 पासून आजतागायत नेहरू -गांधी परिवारातील एकही व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकलेली नाही आणि त्याला जबाबदार व्ही पी सिंग यांनी बोफोर्स लाचखोरी प्रकरण स्वतःच काढून स्व राजीव गांधींना उद्देशून केलेले बिनबुडाचे आरोप.
काहीसा हाच प्रकार पवारांनी सोनिया गांधींना इटालियन असण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधानपद स्वीकारण्यास विरोध करताना घडला होता. मार्च 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात दुसर्‍यांदा सत्तेत आलेलं ‘एनडीए’चं सरकार जयललितांनी पाठिंबा काढल्यानं एका मतानं पडलं आणि त्यानंतर काँग्रेसमधल्या नाट्याला सुरुवात झाली. या नाट्याच्या केंद्रस्थानी होते शरद पवार. वाजपेयी सरकार जाण्याच्या एक वर्ष अगोदर 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनलेल्या सोनिया गांधींनी सरकार स्थापनेचा दावा केला. पण मुलायमसिंह यादवांनी सोनियांच्या विदेशी असण्याच्या मुद्दा पुढे करत काँग्रेसला पाठिंबा देण्याचं नाकारलं. पण सोनियांना विरोध हा केवळ काँग्रेसबाहेरूनच होणार नव्हता. काँग्रेसमध्ये भूकंप होण्यासाठीही हाच मुद्दा कारणीभूत ठरणार होता. तो भूकंप शरद पवारांनी घडवून आणला. तसेही यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र गणले जाणार्‍या पवारांचे गांधी घराण्याशी सलोख्याचे संबंध नव्हतेच. त्यांचा राग होता त्यांच्या नेतृत्वाखालील पुलोद मंत्रिमंडळ बरखास्त केल्याचा आणि यशवंतराव चव्हाणांना पंतप्रधानपदाची संधीं दिल्याचा. त्यांनी सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. 15 मे 1999 या दिवशी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीत पवारांच्या साथीनं पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनीही पंतप्रधानपदी भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीनेच विराजमान व्हावे अशी भूमिका घेतली. एका बाजूला अर्जुनसिंह, गुलाम नबी आझाद, प्रणव मुखर्जी ए. के. एँटनी, अंबिका सोनी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया हे सोनियांनीच पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव घेऊन उभे असतांना शरद पवारांनी सहकार्‍यांसोबत बंड केलं. काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसनं पवारांसह तिघांचंही निलंबन केलं. शरद पवार दुसर्‍यांदा काँग्रेसबाहेर पडले. पुढे 2004 ते 14 या काळात केंद्रात काँग्रेसच्या डॉ मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात पवार यांनी कृषीमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा या नात्याने सोनिया गांधी लोकसभेत पंतप्रधानांच्या बाजूला तिसर्‍या स्थानावर बसायच्या. आणि त्यांच्या पंतप्रधान बनण्याचा विरोध करणारे पवार त्यांच्या बाजूला चौथ्या स्थानावर बसायचे. त्याआधी 1999 सालीच महाराष्ट्रात काँग्रेसनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून सरकार अस्तित्वात आणल होतं. ते पुढे 15 वर्षे चाललं. पण सोनिया गांधी पंतप्रधान पदापासून कायम वंचित राहिल्या.पवारांनी सुरू केलेल्या सोनिया गांधी इटालियन असल्याच्या मुद्द्याला पुढे भाजपने मोठ्या प्रमाणात वाढवले. स्वतः ला वाजपेयी यांच्यानंतरचा सर्वोत्कृष्ट वक्ता समजणारे स्व प्रमोद महाजन यांच याविषयीच वाक्य फार गाजलं होत. ‘एका बाजूला 1957 पासून लोकसभेत 40 वर्षे काम करणारे वाजपेयी तर दुसरीकडे ग्रामपंचायतीचीही निवडणूक न लढलेल्या इटालियन सोनिया गांधी’! महाजनांच्या बोचर्‍या वक्तृत्व शैलीतील हे वाक्य मध्यम वर्गीयात चांगलंच ‘अपील’ झालं होत आणि कारगिल युद्धाप्रमाणे त्याचाही परिणाम भाजपच्या बाजूनेच झाला. आणि या सर्व वादाचे उद्गाते होते स्वतः शरद पवार. ‘या देशाच्या अण्वस्त्राच्या आणि आर्थिक चाव्या परकीय व्यक्तीच्या हातात पुन्हा जाऊ देणार नाही’ या त्यांच्या वाक्याचा संदर्भ एकाचवेळी भारतावरील ब्रिटिशांच्या दीडशे वर्षे चाललेल्या राज्याशी सोनिया गांधी इटालियन असल्याशी जोडल्या गेला.एक प्रकारे सोनिया गांधी पंतप्रधान बनणं म्हणजे पुन्हा पारतंत्र्यात जाणं इथपर्यंत मध्यम वर्गीयांच्या भावना चेतवण्यात पवारांचे उद्गार आणि भाजपचा मीडिया सेल यशस्वी ठरला. पण याची सुरुवात पवारांनी केली होती. स्व महाजनांनी स्वतः ची सोय करण्यासाठी असेल पण ते एका भाषणात म्हणाले होते की देशाचे पंतप्रधान केवळ भारतीय वंशांचेच नसावे तर त्यांचे आई वडील सुद्धा भारतीय असावे. अर्थात या वाक्याचा संबंध राहुल गांधींशी होता. पुढे भारतीय वंशाकरता भांडणार्‍या स्व महाजनांचा खून त्यांच्या सख्ख्या धाकट्या भावाने केला. आणि आज राहुल गांधी काँग्रेसच नेतृत्व करत आहेत. तीन वर्षांपूर्वी पवारांनी राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लीन चिट’देण्याच्या निषेधार्थ अन्वर यांनी पवारांची साथ सोडली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याआधी पी ए संगमा यांनीही सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यांनी पवारांची साथ त्याआधीच सोडली होती. त्यामुळे इटालियन असल्यामुळे सोनियांना पंतप्रधानपदासाठी विरोध करणारे पवार एकटे पडले. पण पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे असेल, पण पवारांचं राजकीय अस्तित्व कायम राहील, मात्र सोनिया गांधी पंतप्रधान पदाला मुकल्या.
मुंबईकर वराडकर चे चिरंजीव लिओ आयर्लंडचे पंतप्रधान बनतात, कमला हॅरीस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनतात. त्याचा भारतीयांना अभिमान असतो. पण आपल्या देशात लग्नझाल्यापासून राहिलेल्या सोनिया आपल्याला पंतप्रधान म्हणून चालत नाही, हा विरोधाभास दिसून पडतो.
नरसिंह राव यांची स्टाईल जरा वेगळी. मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थमंत्री देऊन आणि देशाला मुक्त अर्थव्यवस्था देणारे द्रष्टे पंतप्रधान. पण बाबरी विध्वंस प्रकरणात नरमाईची भूमिका न घेता आधीच उत्तर प्रदेशातील कल्याण सिंग सरकार बरखास्त केलं असत तर योग्य ठरेल असत आणि बाबरी विध्वंस टाळता आला असता, अशी भूमिका आजही मांडली जाते. पंतप्रधान या नात्यानं ही जबाबदारी अर्थात नरसिंह राव यांचीच होती. पण ती टाळून बाबरी विध्वंस होऊ देऊन भाजपला भरघोस मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. आणि ती बर्‍याच प्रमाणात वस्तुस्थिती आहे. या तिघांच्या व्यतिरिक्त जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यांनी तेलंगाणा, बंगाल या राज्यात स्वतःचे पक्ष काढुन काँग्रेसची जागा बळकावली.
एकूणच काँग्रेस जर जमीन गमावलेला जमीनदार झाला असेल तर त्याला जबाबदार स्वतः पवार, व्ही पी सिंग आणि नरसिंह राव यांच्याबरोबरच जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यासारखे मूळ काँग्रेसी जबाबदार आहेत. तूर्तास इतकेच!

Exit mobile version