सासवणे भेटीत बापूजींना पोरबंदराची आठवण

बळवंत वालेकर

आज 2 ऑक्टोबर 2021. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 152 वी जयंती. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात प्रांतातील पोरबंदर येथे झाला. महात्माजींचा मोठेपणा त्यांच्या पोशाखात, वागण्यात, अनवाणी फिरण्यात व हलक्या दर्जाची कामे करण्यात आहे. बापूजी त्यावेळचे बॅरिस्टर. फक्त खादी पंचा नेसून सर्वत्र अनवाणी फिरत. रेल्वेच्या तिसर्‍या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन प्रसंगी शौचकूप साफ करण्याचे काम करीत. ग्रामीण भागात जाऊन गटारे साफ करीत असत. तसेच स्वातंत्र्य चळवळीस बळकटी येण्यासाठी तरुणांना संघटित करीत. बापूजी बॅरिस्टर होते. त्यांनी वकिली व्यवसाय केला असता तर खोर्‍यांनी पैसा कमावला असता. पण त्यांनी काळा कोट खुंटीला अडकवून स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर जनतेची वकिली केली. स्वातंत्र्याची उर्मी खेडोपाडी निर्माण होण्यासाठी ते सासवणे येथे आले होते. सासवणे हे गाव सागरकिनारी आहे. खारी हवा आहे वाळू मिश्रित किनारा लाभलेला आहे. म्हणून बापूजींना तेथे आपले गाव पोरबंदर-आठवले. कारण पोरबंदर असेच सागरकिनारी आहे. समुद्र सान्निध्याची त्यांना भुरळ पडली. म्हणून बापूजी तेथे 5 दिवस थांबले. निवासासाठी कुटी उभारली. शौचकूपही तयार केले. मुले व गावकर्‍यांशी हितगूज करून त्यांना स्वच्छतेचे व श्रमाचे महत्त्व पटवून दिले. तसेच स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली.
सासवणे हे पुराणकालीन गाव आहे. ते अष्टागरात मोडते. स्वातंत्र्यप्रेमी पिढी निर्माण होण्यासाठी आचार्य ढवण यांनी येथे आश्रम शाळा चालू केली. या आश्रम शाळेस बापूजींनी भेट दिल्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. आश्रम शाळेने स्वावलंबी, स्वातंत्र्यप्रेमी व श्रमाचे मूल्य जाणणारी, पिढी घडविली. त्यात बापूजींचे मोठे योगदान होते. ब्रिटिशशाही संपुष्टात येण्यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या सभेची सूत्रे लोकमान्य टिळकांकडे होती. लोकमान्यांच्या निधनानंतरही ही सूत्रे बापूजींकडे आली.
बापूजी बॅरिस्टर होते. बॅरिस्टर होणारी व्यक्ती वकिली व्यवसायात खोर्‍यानी पैसा कमावते. ऐशारामात राहते. सुटाबुटात फिरते. सोबत काळा कोट असतोच. पण याला बापूजी अपवाद होते. स्वतः चरख्यावर विणलेला खादीचा पंचा हाच त्यांचा पोशाख. ते अनवाणी सर्वत्र फिरत. काळा कोट खुंटीला टांगून ब्रिटिशांकडून अन्याय झालेल्या जनतेची मोफत वकिली करीत. 150 वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे बॅरिस्टर भारतात होते. त्या काळात बॅरिस्टरचा थाटही वेगळा होता. अशा परिस्थितीत बापूजी मात्र अपवाद होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन प्रसंगी शौचकूप साफ करीत. खेडोपाडी जाऊन गटारे साफ करीत. फक्त खादीचा पंचा नेसून अनवाणी फिरत. या त्यांच्या आगळ्यावेगळ्या वागणुकीमुळे हजारो तरुण त्यांच्यावर फिदा झाले. या तरुणांनी शाळा-महाविद्यालयांना सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय सभेत सामील झाले. म्हणून ब्रिटिश विरोधी वातावरण तयार झाले.
सासवणे येथे राष्ट्रीय शिक्षण देणारी अपवादात्मक शाळा होती. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण देणारी ही निवासी शाळा होती. वैश्य समाजाकडून ती चालविली जात होती. सासवणे, आवास व धोकवडे गावातील अन्य जातीतील मुलेही तेथे शिकत होती. या राष्ट्रीय शाळेतील शिक्षक विनावेतन शिकवीत असत. त्यात चिंतामणशास्त्री जोशी, ग.य. म्हसकर, नाना काणे, काशिनाथ सारदाळकर, रामजी लक्षमण घरत या देशभक्तांचा समावेश होता. समाजात त्यांना आगळे वेगळे स्थान होते.
या समाज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त गणित, भाषा, इतिहास हेच विषय शिकविले नाहीत तर श्रमाचे महत्त्व, शिस्तीचे महत्त्व, भारत मातेवर प्रेम, ब्रिटिशशाहीला विरोध, शरीर कमावण्यासाठी हुतुतु, खोखो, दांडपट्टा या खेळांचे महत्त्व, स्वावलंबनाचे महत्त्व, मुलींसाठी ग्रुहशास्त्र हे विषय शिकविले. त्यामुळे या आश्रम शाळेतून चतुरस्त्र व राष्ट्रीय बाण्याचे विद्यार्थी तयार झाले. आचार्य ढवण यांचेही वेगळे मार्गदर्शन होते. या आश्रमशाळेस पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने मान्यता दिली, म्हणून शाळेचा बोलबाला महाराष्ट्रात वाढला. अशा या राष्ट्रीय शाळेला भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल व प्रसिद्ध उद्योगपती जमनालाल बजाज यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. सरदार पटेल व जमनालाल बजाज यांच्या भेटीनंतर बापूजींनी भेट दिली आणि विद्यार्थी तसेच विनावेतन काम करून राष्ट्राभिमांनी विद्यार्थी घडविणार्‍या शिक्षकांचे अभिनंदन केले.
बापूजींना पोरबंदर आठवले
पारतंत्र्यकाळात 1927 साली महात्मा गांधीनी या आश्रमशाळेस भेट दिली. महात्माजी शाळेत आल्याची बातमी शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच आजूबाजूच्या परिसरात वार्‍यासारखी पसरली. बापूजी शाळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य पसरले. त्याचवेळी इयत्ता दुसरीत असलेल्या ताराबाई दशरथ शेट्ये -पूर्वाश्रमीच्या-ताराबाई गोविंद लाड व उषा हरिश्‍चंद्र भिंगार्डे पूर्वाश्रमीच्या उषा जगन्नाथ ढवण या दोन विद्यार्थिनी होत्या. बापूजींचे जवळून दर्शन घेण्याचे तसेच बापूजींची कुटी उभारण्यास मदत करण्याचे भाग्य या विद्यार्थिनींना मिळाले. अनवाणी चालत आलेल्या बापूंचा खादीचा पंचा व चष्मा हा पोशाख. या शाळेतील स्वयंशिस्त, राष्ट्रीय वृत्ती, स्वावलंबन, शिक्षकांचे कौशल्य पूर्ण अध्यापन, विनावेतन काम करण्याची प्रवृत्ती तसेच शेजारी असलेल्या सागराच्या फेसाळलेल्या लाटा, त्यांचा कानठळ्या बसविणारा आवाज आणि स्वच्छ सागर किनारा दृष्टीक्षेपात येताच बापूजी खूष झाले व त्यांना जेथे आपण बालपण घालविले त्या पोरबंदरची (स्वतःच्या गावाची) आठवण झाली. बालपणीच्या अनेक आठवणी उलगडू लागल्या. राष्ट्रीय सभेची सूत्रे हाती घेतल्यामुळे तसेच सततच्या धावपळीमुळे स्वतःच्या गावी (पोरबंदर) जाणे शक्य होत नाही, पण या ठिकाणी 24 तास सागर दर्शन घेता यावे म्हणून एका दिवसासाठी आलेले बापूजी, पाच दिवस राहिले. त्याच सागरकिनारी बापूंनी कुटी तसेच शौचकूप विद्यार्थ्यांच्या सहाय्याने तयार केले. पण बापूजी शौचकूपावर स्वतः वाळू टाकून निर्जंतुक करीत असत. या कालावधीत ते विद्यार्थ्यांना प्रार्थना शिकवीत, चरख्यावर बसून सूतकताईचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवित. रामायण-महाभारतातील गोष्टी सांगत. ब्रिटिशांची काळी कारकीर्द नष्ट होण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व पटवित. शारीरिक क्षमतेसाठी खेळांचे महत्त्व सांगत. रघुपती राघव भजन म्हणून विद्यार्थ्यांना म्हणायला लावीत. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे वारे विद्यार्थ्यांमध्ये संचारले. महात्माजींच्या सासवणे भेटीमुळे एका दगडात अनेक पक्षी मारले गेले. ब्रिटिशशाही विरोधी वातावरण सर्वत्र निर्माण झाले. आचार्य भाई ढवण, ग.य. म्हसकर, रामजी लक्ष्मण घरत, देवळेकर इ. या भागातील तरूण स्वातंत्र्य लढ्यात उतरले. या राष्ट्रीय आश्रमशाळेचे नाव महाराष्ट्र भर झाले.
मिठाच्या सत्याग्रहात
आश्रमशाळेचा सहभाग
भारतीयांवर ब्रिटिश शासनाकडून सतत अन्याय होत असे. मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादून ब्रिटिशांनी अन्यायाचा कळस गाठला होता. हा कर रद्द होण्यासाठी सत्याग्रह करण्याचे बापूजींनी ठरविले. तसेच सत्याग्रहाचे ठिकाण पोरबंदर निवडले. 1930 साली झालेल्या या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी भारतात हजारो स्वयंसेवक तयार झाले.
त्यात सासवणे आश्रमशाळा अग्रभागी होती. विद्यार्थी व शिक्षकांची तुकडी रवाना झाली. तेथे सत्याग्रहींना काळ्या पोलिसांनी पकडले. त्यानंतर चौकशीचा ससेमिरा चालू झाला. चौकशीअंती सासवणे राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी सत्याग्रहात सामील झाल्याचे आढळले. हे विद्यार्थी ज्ञान ग्रहण न करता ब्रिटिशांचे कायदे मोडण्याचे अराष्ट्रीय काम करतात असा आरोप ठेवून ब्रिटिश शासनाने या शाळेची मान्यताच रद्द केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला. म्हणून व्यवस्थापनाने ही शाळा नाइलाज म्हणून बंद केली. ब्रिटिशांच्या वक्रदृष्टीमुळे या आश्रमशाळेस शिक्षण विभागाकडून परवानगी मिळणे शक्य नव्हते. शेवटी विद्यार्थी दुरावले, पालकही हिरमुसले. ही आश्रमशाळा राष्ट्रीय प्रवृत्तीचे विद्यार्थी घडवित असल्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना जिल्हा स्कूल बोर्डाच्या शाळेत प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणास विराम दिला.
आश्रमशाळा बंद झाल्यामुळे वैश्य समाज बंधूंना धक्का बसला. पारतंत्र्य असल्यामुळे शाळेच्या परवानगीसाठी स्वातंत्र्याच्या पहाटेची प्रतिक्षा करणे हाच मार्ग होता. सुदैवाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, आसमंत सुखसागरात बुडाला. ही पारतंत्र्य काळातील राष्ट्रीय शाळा असल्यामुळे शिक्षण खात्याकडून प्राधान्याने परवानगी मिळाली, पण पालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थी नसल्यामुळे शाळेचे कुलूप उघडता आले नाही. दरम्यान 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींना हौतात्म्य लाभले. संपूर्ण भारत दुःख सागरात बुडाला.

Exit mobile version