सिद्धूची कॉमेडी, काँग्रेसची ट्रॅॅजेडी!

जयंत माईणकर

पंजाबमध्ये एक कॉमेडी शो सुरू आहे. या शोचे हिरो आहेत नवज्योतसिंग सिद्धू तर शोचे कर्ते धर्ते मालक आहेत काँग्रेस अर्थात नेहरु गांधी परिवार! पण एकेकाळी सदोष मनुष्यवधाचा आरोप झालेल्या क्रिकेटपटू, कॉमेंटेटर आणि राजकारणी अशा विविध भूमिका निभावत पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर डोळे लावून असलेल्या आणि गडगडाट करत हसणार्‍या या कॉमेडी शो परिक्षकाने केवळ पंजाबात नव्हे तर संपूर्ण देशात नेहरू-गांधी परिवाराची अवघ्या दोन महिन्यांत ट्रॅजेडी केली आहे.
वाद आणि नवज्योतसिंग सिद्धू यांचं अविभाज्य नात आहे. त्याची सुरुवात 1988 सालीच झाली होती. कार पार्किंग वरून झालेल्या वादात 24 वर्षीय सिद्धू आणि त्याच्या मित्राने केलेल्या मारहाणीत गुरनामसिंग नावाच्या 75 वर्षीय गुरनाम सिंग व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुरनामसिंग यांच्याबरोबर असलेल्या भाच्यानुसार तरुण क्रिकेटने त्यांच्या वृद्ध मम्सआला गुडघ्यांनी मारलं ज्यामुळे गुरनामसिंग बेशुद्ध झाले आणि नंतर हॉस्पिटलमध्ये नेट असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 30 वर्षे या केसने सिद्धूचा पिच्छा पुरवला आणि शेवटी 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा पंजाबच्या कॅप्टन अमरिंदरसिंग सरकारमध्ये तिसर्‍या क्रमांकाचे मंत्री असलेल्या सिद्धूना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून मुक्त केले मात्र त्याहून कमी गुन्ह्यासाठी मात्र एक हजार रुपये ही शिक्षा ठोठावली. पण त्या शिक्षेचा सरळ अर्थ सिद्धूच्या हातून गुन्हा झाला होता. क्रिकेटमध्येही सिद्धू तेवढेच वादग्रस्त राहिले. आज आपल्या शेरो शायरी आणि वक्तृत्व कलेने लोकांची वाहवा मिळवणारे सिद्धू क्रिकेटच्या सोळा वर्षाच्या कारकिर्दीत ड्रेसिंग रूममध्ये एका कोपर्‍यात शांत बसून असायचे. पण याच काळात 1996 साली इंग्लंडमध्ये टीम सोबत असताना कॅप्टन अझरुद्दीनच्या तथाकथित कॉमेंटवर नाराज होऊन हे महाशय टीम सोडून चक्क पतियाळाला आपल्या घरी परतले. पुढे चौकशीत हैदराबादी भाषेत केलेल्या त्या तथाकथित कॉमेंटचा अर्थ वाईट नसून चांगला होता, असा काढला गेला आणि ते प्रकरण मिटल. सिद्धू असलेल्या कॉमेडी शोज मध्ये अझरुद्दीन पाहुणा म्हणून येऊनही गेला आणि त्याचे गुणगान करण्यासाठी सिद्धूने स्वरचित शेरसुद्धा ऐकवले. पण टीम सोडून येण्याच्या चुकीबद्दल सिद्धूना काहीही शिक्षा झाली नाही. उलट पुढील तीन वर्षे ‘सिक्सर सिद्धू’ क्रिकेट खेळत राहिले. पण सिद्धू इंग्लंडमध्ये टीम सोडून गेल्यामुळे त्यांच्या जागी सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांना घेतलं गेलं आणि भारतीय क्रिकेटला दोन हिरे मिळाले. वास्तविक या दोन्ही घटनांत सिद्धूचा दोष होताच. निवृत्तीनंतर ड्रेसिंग रुममध्ये कधीही न बोलणारे कॉमेंटेटर बनले. आणि त्यांच्या कॉमेंट्स, पंचलाईन्स गाजू लागल्या. दीप दासगुप्ता नावाच्या फारशी गुणवत्ता नसलेल्या भारतीय विकेटकीपर विषयीची त्यांची कॉमेंट अशीच होती. दीप दासगुप्ता इजअ‍ॅज कन्फ्यूज्ड अ‍ॅज अ बेबी इन अ टॉपलेस बार’ (ऊशशि ऊरीर्सीिींर ळी री लेपर्षीीशव री र लहळश्रव ळी ळप र ीेंश्रिशीी लरी!) ही त्याची कॉमेंट आपल्या चेहर्‍यावर हसू आणत. सिद्धूच्या अशा कॉमेंट्स ‘सिद्धूइझम्स’ या नावाने फेमस आहेत. मला मात्र त्याच्या कॉमेंट्रीने कधीही भुरळ घातली नाही. कारण मला त्या कॉमेंट्स वस्तुस्थितीला सोडून असलेल्या अतिरेकी वाटायच्या. जसा मला कपिल शर्मा शो सुद्धा ओढूनताणून केलेला खालच्या पातळीचा कॉमेडी शो वाटतो. सिद्धूच्या कॉमेंट्स आणि देशाभिमान दर्शविणारे शब्द ऐकताना माझ्या डोळ्यासमोर गुरनामसिंग यांचं नाव यायचं तर देशप्रेम दर्शविणारी त्यांच्या पंच लाईन्स ऐकताना इंग्लंडला टीम सोडून गेल्यामुळे देशाची किती नाचक्की झाली असेल हा प्रश्‍न उभा राहायचा. पण 2002 साली नेटवेस्ट ट्रॉॅफीच्या फायनल मध्ये सिद्धूने इंग्लंड क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर जेफ्री बॉयकॉटवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यामुळे तेव्हाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सुदर्शन त्यांच्यावर ‘फिदा’ झाले. त्यांनी आपला सुदर्शन चक्ररुपी निरोप अरुण जेटली यांच्याकडे पाठवला आणि काँग्रेसची पार्श्‍वभूमी असलेले सिद्धू 2004 साली भाजपचे अमृतसरहून खासदार बनले. मात्र मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे आणि उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीतच काय अगदी 2009 ला सुद्धा ते बहुमताने निवडून आले. मात्र 2014 ला त्याना मोदींनी अमृतसरमधून सिद्धूचे राजकीय गुरू जेटलीना उमेदवारी दिली. सिद्धूंनी तो निर्णय स्वीकारला. पण स्वतः प्रचारापासून दूर राहिले. जेटलींचा पराभव झाला. सिद्धूंना राज्यसभेत 2016 साली नामनियुक्त केल्या गेलं. पण तोपर्यंत दोन वेळा लोकसभा खासदारकी अनुभवल्यामुळे आणि स्वतःची पत्नी नवज्योत कौर या बादल मंत्रिमंडळात मंत्री झाल्यामुळे सिद्धूची महत्त्वाकांक्षा वाढली होती. त्यातच सिद्धू जोडप्याने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे चिरंजीव उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते अकाली दलाच्या काळ्या यादीत गेले होते. भाजपला तेव्हा अकाली दलाबरोबर युती हवी होती. सिद्धू अधिकच नाराज झाले. भारतीय क्रिकेट टीमचं कॅप्टन पद मिळू न शकलेल्या सिद्धूची नजर पंजाबच्या मुख्यमंत्री पदावर होती. त्यांनी लगेच राज्यसभेचा राजीनामा दिला आणि त्यांच्या वडिलांच्या आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या घरगुती मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखल देत ते काँग्रेसचे आमदार बनले आणि कॅप्टन मंत्रिमंडळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यटन मंत्री बनले.पण काँग्रेसने आपल्या पत्नीला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेची उमेदवारी नाकारल्याबद्दल कॅप्टन अमरिंदरसिंग यांना दोष देत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बादल आणि कॅप्टन अमरिंदरसिंग या पंजाबच्या दोन शक्तिशाली नेत्यांशी त्यांनी शत्रुत्व स्वीकारलं.
पाकिस्तानमधील करतारपूरसाहिब येथील त्यांची भेट आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी केलेलं हस्तांदोलन चांगलंच वादग्रस्तठरलं होतं.
पण दरम्यान सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींनी सिद्धूचा वापर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध करणं सुरू केला आणि त्यांना हटविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सिद्धूना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा दिला आणि 32 टक्के दलित असलेल्या पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत चन्नी या दलित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. होऊ घातलेल्या अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाच्या युतीला शह देण्यासाठी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी या काँग्रेसच्या ‘सर्वोच्च’ हायकामांडने आखलेली ती एक चाल होती. पण राजीनामा किंवा नाराजी हा सिद्धूच्या आयुष्यातील अविभाज्य घटक इथेही कामी आला. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही मंत्री आणि अ‍ॅडव्हाकेट जनरलच्या नियुक्तीवर ऑब्जेकशन घेत सिद्धूनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा अवघ्या दोन महिन्यात दिला आणि अर्थात सोनिया, राहून, प्रियांका यांनाच तोंडघाशी पाडलं.
अमरिंदरसिंग यांच्या भाषेत सिद्धू हा एक अतिशय अस्थिर मनोवृत्तीचा माणूस तर सुखबिरसिंग बादल यांच्या भाषेत सिद्धू म्हणजे चुकीच्या जागी मारा करणारं क्षेपणास्त्र! पंजाबमधील दोन शक्तिशाली राजकीय नेत्यांनी सिद्धूविषयी केलेल्या कॉमेंट्स आज तंतोतंत खर्‍या ठरत आहेत. अवघ्या दोन महिन्यात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणं हे त्यांच्या अस्थिर मनोवृत्तीच दर्शन घडवत आणि ज्या सिद्धूना कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवण्यासाठी काँग्रेसने वापरलं, त्या काँग्रेसवरच राजीनाम्याची रूपाने हे सिद्धूरुपी क्षेपणास्त्र येऊन आदळल आहे. स्वतः सिद्धूंना गुरनाम सिंग यांच्याशी मारामारी केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने एक हजार रुपये दंडाची शिक्षा दिलेली असताना त्यांना भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळात का घेतलं हे विचारण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. खर तर अशा व्यक्तीला काँग्रेसमध्ये घेऊन मोठं पद देणं हीच काँग्रेसच्या सर्वोच्च हायकमांडची चूक! पण ती चूक त्यांनी केली आणि त्यांच्याच अंगावर बेतली. आता सिद्धूच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष केव्हा येतो हे पहायचे आणि भाजप आणि काँग्रेसनंतर सिद्धू आता मुख्यमंत्री पदासाठी आपचा मार्ग स्विकारतात का हे पाहणे महत्त्वाचे! तूर्तास इतकेच!

Exit mobile version