जागतिक राजकारणातील घराणेशाही!

जयंत माईणकर

घराणेशाही! भाजपचा काँग्रेसवरील सर्वात मोठा आरोप! पण केवळ काँग्रेस आणि नेहरू – गांधी परिवारच नव्हे तर भारतातील सर्वच पक्ष केवळ घराणेशाहीच्या भरवशावर चालतात. भाजप आपल्या पक्षात घराणेशाही नसल्याचा दावा करत आला तरीही त्या पक्षाच्या देशातील सुमारे 1300 खासदार, आमदारांपैकी सुमारे 200 लोकप्रतिनिधी आज केवळ वंशपरंपरेच्या भरवशावर निवडून आले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
फरक इतकाच आहे की भाजपमधील सर्वोच्च नेतेपद अथवा पक्षाध्यक्षपद अद्याप वंशपरंपरेने दिलं गेलं नाही. अर्थात याचं कारण संघ परिवाराला संपूर्ण देशाला ‘अपील’ करू शकेल या दर्जाचं घराणं मिळालं नाही. जर त्यांना तसं घराणं मिळालं तर तेसुद्धा काँग्रेसनी ज्या प्रकारे नेहरू गांधी परिवाराला घट्ट धरून ठेवलं आहे त्याच प्रकारे तेसुद्धा भाजपची मंडळी सुद्धा त्या परिवाराला चिकटून राहिली असती. आणि याच उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता 2014 साली निर्माण झाल्यानंतर संघ परिवाराला आठवण झाली ती भाजपचे माजी आमदार स्व. गंगाधर फडणवीस यांचे चिरंजीव देवेंद्र यांचीच! तेही एकनाथ खडसेंच्या ज्येष्ठतेला डावलून! कर्नाटकात येडीयुराप्पा यांच्या जागी बसवले ते बसवराज बोम्मई यांनाच! म्हणजे घराणेशाही पासून भाजप दूर नाही आणि या पक्षाच्या नेत्यांना इतर पक्षात घराणेशाही आहे हे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.
भारतीय उपखंडातील इतर देशांकडे नजर टाकली तर अगदी पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका या देशातही अशाच प्रकारची घराणेशाही आपल्याला दिसून पडेल. भारतात ज्याप्रमाणे नेहरू-गांधी परिवाराने तीन पंतप्रधान दिले त्याचप्रमाणे श्रीलंकेत बंदरनायके या परिवाराने तीन पंतप्रधान दिले आहेत. नेहरू-गांधी आणि बंदरनायके परिवारातील काही सदस्य आपल्या आई वडिलांच्या पक्षाला सोडून विरोधी पक्षातही समिल झाले आहेत. भारतात अरुण नेहरू, मनेका गांधी, वरूण गांधी हे त्याचेच उदाहरण.श्रीलंकेत सिरिमाओ बंदरनायके, या जगातील पहिल्या महिला पंतप्रधानांचे चिरंजीव अनुरा पुढे विरोधी पक्षनेते आणि संसदेचे सभापती सुद्धा झाले. या चारही राजकीय घराण्यांची सुरुवात पुरुषांनी केली तरी वारसा मात्र मुलीकडे गेला. चारही घराण्यातील पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्ती अतिरेकी कारवायांच्या बळी ठरल्या. शेख मुजीबुर रहमान (बांगला देश),सोलोमन बंदरनायके(श्रीलंका), बेनझीर भुट्टो (पाकिस्तान) आणि अर्थात इंदिरा आणि राजीव गांधी अतिरेक्यांचे बळी ठरले, तर झुल्पिकार अली भुट्टो याना फासावर लटकवले गेले.
घराणेशाहीची परंपरा उपखंडातच आहे
असे नव्हे तर कार्ल मार्क्स यांचं नाव घेणार्‍या उत्तर कोरियात किम घराण्याचा तिसरा वारस सध्या राज्य करत आहे. मात्र उत्तर कोरियात लोकशाही नसून बंदुकीच्या धाकावर चालणारी हुकूमशाही आहे. मॉरिशसमध्ये जगन्नाथ आणि रामगुलाम यामूळ भारतीय वंशाच्या घराण्यांची घराणेशाही आहे तर फिलिपिन्समध्ये मार्कोस, एक्विनो या आणि इतर काही घराण्यांची घराणेशाही आहे. अ‍ॅडम्स, हॅरिसन, रुझवेल्ट आणि अगदी आत्ताच्या बुश घराण्यातील दोन व्यक्ती अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त अमेरिकेत 50 हुन अधिक राजकीय घराणी आहेत ज्या घराण्यातील किमान एक व्यक्ती सिनेट, काँग्रेस, राज्यांच्या विधिमंडळात असते. 1948 पासून केनेडी घराण्यातील एक व्यक्ती सिनेटर असतेच. याव्यतिरिक्त निक्सन, आयसनहोवर, रॉकफेलर ही अशी काही राजकीय घराणी ज्यांच्या घराण्यातील किमान एक व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले असते. पक्षांतर करून सत्तेवर असणार्‍या पक्षात सामिल होण्याचे भारतात होणारे प्रकार अमेरिका, इंग्लंडमध्येही घडतात. तर काही घराणी आपल्या घराण्याचे प्रतिनिधी सर्वच पक्षात ठेवण्याची चतुराई दाखवतात. जशी चतुराई दाखवत आपल्याकडे सिंधिया परिवाराने 50 वर्षे सत्ता उपभोगली. आज मात्र सर्व सिंधिया परिवार एकाच पक्षात आहे.कॅनडा मध्येही अशाच प्रकारची अनेक राजकीय घराणी पाहायला मिळतात. कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचे वडीलसुद्धा पंतप्रधान होते. भारताची संसदीय पध्दती ज्या इंग्लंडच्या संसदीय पद्धतीवर आधारित आहे त्या इंग्लंडमध्ये सुद्धा आत्तापर्यंत वडील आणि मुलगा पंतप्रधान होण्याच्या 15 घटना घडल्या आहेत. यात अगदी आतापर्यंत पर्यंत पंतप्रधान असणार्‍या डेव्हिड कॅमेरून, टोनी ब्लेअर यांचाही समावेश आहे. याचबरोबर विन्स्टन चर्चिल, नेव्हील चेंबरलेन या आणि इतरही अनेक राजकीय घराण्यांनी आपला राजकीय वारसा कायम ठेवला आहे. अगदी आपल्या बाजूच्या मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड या देशातही राजकीय परिवार, वंशपरंपरा आहेच. शिनवात्रा या घराण्याने थायलंडला दोन पंतप्रधान दिले आहेत. मलेशियात माजी पंतप्रधान महाथिर महंमद यांचा मुलगा, माजी उपपंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांची मुलगी राजकारणात आहे. भारताचे माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचं एक वाक्य फार गाजलं होत. एक पत्रकाराने देवीलाल यांनी त्यांच्या उपपंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्या एकूण 147 नातेवाईकांची वर्णी विविध राज्यात महत्त्वाच्या जागांवर लावली याविषयी प्रश्‍न विचारला. त्यावर या हरियाणाच्या जाट नेत्याने ‘मग मी तुमच्या नातेवाईकाला पोस्टिंग देऊ का असा प्रतिप्रश्‍न त्या पत्रकाराला केला होता. असा प्रतिप्रश्‍न विचारण्याची ताकद माजी पंतप्रधान चरणसिंग यांच्यात होती तर सध्या लालूप्रसाद यादव यांच्यात आहे. पण देवीलाल यांनी एका शब्दात सत्य सांगून टाकले. शेवटी राजकारणी विश्‍वास ठेवणार कोणावर? स्वतःची पत्नी, मुले यांच्यावरच! 1990च्या आसपास शिवसेनेत मनोहर आणि सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ यांच्या बरोबरीने उद्धव, राज यांचा सहभाग वाढला. यावर काही सेना नेत्यांनी ऑब्जेकशन घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आत्तापर्यंत काँग्रेसच्या नेहरू गांधी घराण्याच्या वंशपरंपरेला विरोध करणार्‍या बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी भाषेत ‘सर्व शिवसेना जिंदाबाद म्हणत आहेत तर माझा मुलगा, पुतण्या त्याला अपवाद कसा असेल’ असा प्रतिप्रश्‍न केला होता. वंशपरंपरेला विरोध करणार्‍या उद्धव ठाकरेंनीसुद्धा आपल्या मंत्रिमंडळात आपल्याच मोठ्या मुलाचा समावेश केला. उत्तर कोरियाप्रमाणे जरी नसली तरीही चीन, पूर्वीच्या सोव्हिएट युनियन, सध्याच्या रशिया आणि आसपासच्या पूर्व युरोपियन देशात आजही वंशपरंपरा आढळते.चीनमध्ये माओ, डेंग हु जिंताओ यांच्यासारख्या एकेकाळी सर्वसत्ताधीश असलेल्यांची मुले, नातेवाईक आज पक्षाच्या सेन्ट्रल कमिटीपासून अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. कम्युनिस्ट क्युबामध्ये कॅस्ट्रो बंधूनी अध्यक्ष पद भूषविले. तर सोव्हिएट युनियन मध्ये आंद्रोपोव्ह, ब्रेझनेव्ह यांची मुले नातेवाईक उच्च पदांवर होती अथवा आहेत. तर रशिया मध्ये बोरिस येल्त्सिन त्यांची मुलगी, जावई अशी वंशपरंपरा पाहायला मिळते. सोनाराचा मुलगा सोनारच बनणार, अभिनेत्यांची मुले अभिनय येत असे अथवा नसो किमान चार पाच चित्रपट अथवा सीरिअल्स आई वडिलांच्या भरवशावर करणारच! वेळप्रसंगी आपल्या मुलाच्या चित्रपटांना, त्यांचे अभिनेते आई वडील फायनान्स करतात. राजकारण, चित्रपट, आणि क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या DNA मध्येच आहेत असं वाटत. राजकारणात घराणेशाही च्या भरवशावर जिवंत असणारी चौथी पिढी भारतात आहे. अभिनेत्यांचीही चौथी पिढी पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये मात्र चौथी तर सोडाच दुसरी पिढीही पाहायला मिळत नाही. अर्थात याच कारण तिथे गुणवत्तेचा खरा कस लागतो. रोहन सुनील गावस्करच मूर्तिमंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. राजकारण्यांची मुले राजकारणात आली तर गैर काय असा प्रश्‍न विचारला जातो. पण मग प्रश्‍न असा उद्धवतो की लोकशाहीच्या आडून सामंतशाहीचा देखावा उभा करून ही एक प्रकारची राजेशाही सुरू आहे. आणि या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे. तरीही लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेद्वारे अनेक वेळा या सामंतशाहीरुपी राजेशाही मध्ये खीळ घातली जाते, आणि तेच लोकशाहीच खर यश आहे. अनिर्बंध, तहहयात सत्ता कोणाही एका व्यक्तीच्या अथवा गटाच्या किंवा पक्षाच्या हातात जाणं लोकशाहीच्याच नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने घातक असत.कारण कोणताही सत्ताधीश आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी विरोधकांना साम, दाम, दंड आणि भेद वापरून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेला खीळ घालण्याचं एक पवित्र कार्य लोकशाहीत ठराविक कालावधीनंतर होणार्‍या निवडणुका करत असतात. ही वंशपरंपरा सर्वोच्च पदापासून अगदी कार्यकर्त्यांपर्यंत कायम राहतात.भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात ‘sons of soil’

या थिएरिवर प्रादेशिक पक्ष आहेत हे पक्ष आपल्या नजरा राज्यातील सत्तेकडे आणि मिळाल तर केंद्रातील एखाद्या मंत्रीपदाकडे डोळे ठेवतात. वडिलांचे कार्यकर्ते पुढे मुलाचे कार्यकर्ते बनतात. कार्यकर्ते कार्यकर्तेच राहतात तर नेते नेतेच राहतात. आणि हे सगळं लोकशाहीच्या मार्गाने घडत.
जाता जाता:माझे वडील स्व.प्रा. पां. शं. माईणकर हे पूर्ण वेळ प्राध्यापक आणि अर्ध वेळ पत्रकार होते. मी पूर्ण वेळ पत्रकार आणि अर्धवेळ प्राध्यापक आहे.म्हणजे ही घराणेशाही नक्कीच नव्हे

Exit mobile version