हेमंत देसाई
आर्यन शाहरुख खानची जामीनविषयक कागदपत्रं न्यायालातून आर्थर रोड तुरुंगात येण्यास दीर्घ अवधी लागला आणि तरीही आपण भारतात डिजिटल क्रांती झाली आहे असं मानायचं, हा गमतीचा भाग सोडला तरी सध्या या क्रांतीबरोबरच समाजमाध्यमांची क्रांती अनुभवायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, रिब्रँडिंगच्या दृष्टीने फेसबुकचं नाव बदलून‘मेटाव्हर्स’ असं केलं गेलं आहे. इंटरनेटद्वारे लोक आभासी जगात भ्रमंती करतात, तेव्हा त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात आणि त्यात डिजिटल अवकाशाचाही समावेश होतो. व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑग्मेंटेड रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आभासी जगाला ‘डिजिटल स्पेस’ असं म्हणतात. या रिब्रँडिंगद्वारे फेसबुक कंपनी आणखी एका मोठ्या क्षेत्रात पूर्णपणे वेगळी सेवा देऊ पाहात आहे. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपसारखी लोकप्रिय समाजमाध्यमं फेसबुकच्या छत्राखाली आली आहेत. असं असलं तरी मार्क झुकेरबर्गला फेसबुकची समाजमाध्यम कंपनी ही ओळख मागे टाकायची आहे. समाजतंत्रज्ञान कंपनी असा चेहरा देण्यासाठी त्याने फेसबुकचं नामांतर ‘मेटा’ असं केलं आहे. ‘मेटा’ अर्थात ‘मेटाव्हर्स’ या तंत्रज्ञानाला समाजमाध्यमजगताचं भविष्य म्हणून बघितलं जातं. मायक्रोसॉफ्टसारखी बिल गेट्सची कंपनीदेखील या तंत्रज्ञानावर काम करत आहे.
झुकेरबर्गला भविष्यकालीन विज्ञान-तंत्रज्ञानाची जाण आहे आणि बदलते अर्थव्यवहार आणि व्यापाराचंही भान आहे. हे तंत्रज्ञान उद्या लोकप्रिय होणार, याची खात्री असल्यामुळेच त्याने त्यासाठी दहा हजार नवीन तंत्रज्ञ कंपनीत घेण्याची तयारी केली असल्याचं सांगण्यात येतं. कोरोनाच्या काळात लोकांचं घराबाहेर पडणं बंद वा कमी झालं. त्यामुळे अपरिहार्यपणे कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची पद्धत सुरू केली आणि कोरोना जवळजवळ संपला तरी हीच पद्धत चालू ठेवण्याचं अनेक कंपन्यांनी ठरवलं आहे. कारण, त्यामुळे जाण्या-येण्याचे कष्ट आणि वेळ वाचतो. ऑफिसच्या जागेचा खर्चही वाचतो. ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये झूम, गूगल मीटसारख्या अॅप्सच्या माध्यमातून व्हर्च्युअल टीम मीटिंग होते. त्यात आपण उपस्थित राहू शकतो. परंतु, मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या व्यक्तीला फोन केला असेल, ती जिथे असेल तिथे तिच्यासमोर डिजिटल स्वरूपात आपण प्रत्यक्ष भेटीचा आनंद घेऊ शकतो. प्रत्यक्ष हजेरी न लावता, आभासी पद्धतीने आपण चित्रप्रदर्शन असो वा संगीत मैफल असो, हजेरी लावू शकतो. अर्थात, मेटाव्हर्स तंत्रज्ञानात सर्वसामान्य माणसाची गोपनीय माहिती टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या हाती लागून दुरुपयोग होण्याचा धोका आहेच. अशा खासगी माहितीचा स्वार्थासाठी उपयोग करण्याबद्दल फेसबुकची ‘कीर्ती’ आहेच.
मेटाचा लोगो अनंत अवकाशाचे प्रतीक असा आहे. आभासी जगात आपण पाऊल रोवत आहोत, हे त्यातून स्पष्टपणे अधोरेखित केलं आहे. ‘मेटा इज हेल्पिंग टू बिल्ड द मेटाव्हर्स, अ प्लेस व्हेअर वुइ विल प्ले अँड कनेक्ट इन थ्री डी. वेलकम टू द नेक्स्ट चॅप्टर ऑफ सोशल कनेक्शन’, असं ट्विट मार्क झुकरबर्गने केलं आहे. जगामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं उत्पादन म्हणजे फेसबुक. समाजमाध्यम ब्रँड म्हणून तो यशस्वी असला, तरी आम्ही जे जे करतो, ते सर्व हा ब्रँड सामावून घेतो असं नाही. आम्ही लोकांशी कनेक्ट होण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण करतो. म्हणूनच ‘मेटाव्हर्स’ ही आमची नवी आघाडी आहे, असं मार्कने स्पष्ट केलं आहे. ‘मेटा’ हा मूळ ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ बियाँड म्हणजे पलीकडे असा आहे. नवनवीन गोष्टींचा शोध घेऊन उद्याच्या विश्वाची उभारणी करणं, हे त्यात अभिप्रेत आहे. गूगलनेदेखील 2015 मध्ये असा फेरबदल केला होता. त्यावेळी आपल्या पालक कंपनीचं नाव गूगलने ‘अल्फाबेट’ असं ठेवलं होतं. नाव बदललं म्हणजे कंपनीची मूळ रचना बदलेल, असं मुळीच नव्हे. परंतु आर्थिक निकाल जाहीर करण्याची पद्धत मात्र बदलेल. ‘फॅमिली ऑफ अॅप्स’ आणि ‘रिअॅलिटी लॅब्ज’ या दोन विभागांमध्ये विभागणी करून आर्थिक निकाल घोषित केले जातील. एक डिसेंबरपासून ‘एमव्हीआरएस’ या नवीन स्टॉक टिकरच्या अंतर्गत फेसबुक म्हणजे मेटा व्यवहार सुरू करणार आहे. ‘प्रोजेक्ट कॅम्बरिया’ या व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट या प्रॉडक्टचीही घोषणा करण्यात आली असून, तो पुढील वर्षी बाजारात येणार आहे. ‘प्रोजेक्ट नजारे’ या पूर्णतः एआरसक्षम स्मार्ट ग्लासेसच्या प्रकल्पाचीही घोषणा करण्यात आली आहे.
भारतात फेसबुकचे 34 कोटी ग्राहक आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मार्क झुकेरबर्गची भेट घेऊन जाहीर गप्पागोष्टीही केल्या. परंतु, त्याचा भारताला काय उपयोग झाला, हे बघावं लागेल. कारण, भारतात 22 अधिकृत भाषा असल्या, तरी हिंदी-बंगाली सोडून अन्य भाषांमधल्या मजकुरावर फेसबुक लक्ष ठेवत नाही. तसंच सत्ताधारी पक्षाच्या बाजूने फेसबुक झुकलं आहे. केवळ भारतातलाच नाही, तर जगभरात हा अनुभव आहे. फेसबुकचं नवं तंत्रज्ञान हे स्वागतार्ह आहे. परंतु ते कितपत लोकोपयोगी ठरेल, ते प्रत्यक्ष अनुभवांतीच लक्षात येईल.
काहीजणांच्या मतानुसार, फेसबुकचं नाव बदलून नकारात्मकता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुक ही व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्रामसह अनेक कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. मार्क झुकेरबर्गला आपले सोशल मीडियावरील सर्व छोटे-मोठे प्लॅटफॉर्म एका छताखाली आणायचे होते. त्यामुळे त्यांनी मेटाव्हर्सची मांडणी केली. मेटाव्हर्स ही आता 93 कंपन्यांची मूळ कंपनी झाली आहे. आम्ही तंत्रज्ञान सुरू केलं, या शर्यतीत आम्हाला मागे रहायचं नाही, असं सांगत झुकेरबर्गने मेटाव्हर्स निर्मितीचं समर्थन केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक माजी कर्मचार्यांनी कंपनीच्या धोरणाबाबत आक्षेप घेतले आहेत. अनेक माध्यम संस्थांनी फेसबुकवर टीका केली आहे. अशा परिस्थितीत नाव बदलल्याने कंपनीबद्दलची नकारात्मकता थोडी कमी होऊ शकते, असा दावा केला जात आहे. फेसबुकच नाही, तर मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्याही मेटाव्हर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. आभासी वास्तविकतेच्या पुढील स्तराला मेटाव्हर्स आता भिडणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, मेटाव्हर्सनामक आभासी जगात अनेक व्यक्ती, संस्था आपलं भविष्य शोधतील. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या आभासी डिजिटल जगात प्रवेश करता येईल.
मेटाव्हर्स हा शब्द प्रथम विज्ञान कथा लेखक नील स्टीफन्सन यांनी 1992 च्या ‘नोबेल स्नो क्रॅश’मध्ये वापरला होता. कंपनीचं नाव बदलल्याने वापरकर्त्यांच्या वापरात काहीही बदल होणार नाही. लॉगिन आयडी आणि पासवर्ड पूर्वीचेच राहतील. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पूर्वीप्रमाणेच वापरता येतील. म्हणजेच, एका लॉगिनवर, वापरकर्ता सर्व अॅप्स वापरण्यास सक्षम असेल. यामुळे कंपनीला फायदा होईल. जे वापरकर्ते यापैकी कोणतंही अॅप अनेक दिवस उघडत नाहीत, तेही नेहमी वापर करत राहतील. फेसबुकची सुरुवात 2004 मध्ये झाली. सुरुवातीला लोकांना सामाजिक स्तरावर लोकांना जोडायचं होतं. पुढे ते व्यावसायिक झालं आणि भारत ही फेसबुकची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ बनली. 2016 मध्ये कंपनीने इंस्टाग्राम, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचा डेटा एकत्र केला. त्यानंतर कंपनीने कोणत्याही वापरकर्त्याची संमती घेतली नाही. आता भारतात फेसबुकचे 340 दशलक्ष, व्हॉट्स अॅपचे 39 दशलक्ष आणि इंस्टाग्रामचे जवळपास 80 दशलक्ष वापरकर्ते आहेत. अशा स्थितीत फेसबुकला री-ब्रँडिंग करून स्वत:ला एका नव्या कक्षात घेऊन जायचं आहे.