नव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

  प्रमोद मुजुमदार

आता सर्वच पक्ष आक्रमक किंवा सौम्य हिंदुत्वाचं राजकारण करत आहेत. महागाई, बेरोजगारी किंवा विकासाचे मुद्दे चर्चेत येऊ नयेत, म्हणून धार्मिकतेचा आधार घेतला जातो, असंही बरेचदा वाटतं. अलिकडच्या काळातलं मशीद जाळल्यामुळे अनेक ठिकाणी दंगली पेटल्याचं प्रकरण असो वा सलमान खुर्शीद यांच्या पुुस्तकाने उभा केलेला वाद असो, धार्मिक ध्रुवीकरण करून राजकीय पोळ्या भाजल्या जात असल्याचं पहायला मिळत आहे.     

गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये जातीय तणाव भडकला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चाच्या वेळी अल्पसंख्याकांच्या घरांवर, दुकानांवर हल्ले करण्यात आले. प्रार्थनास्थळावरही हल्ले झाले. हे निषेधार्ह आहे; परंतु घटना घडल्यानंतर इतक्या दिवसांनी महाराष्ट्रात मोर्चे निघावेत आणि त्यातून दगडफेक व्हावी, हे अनपेक्षित आहे. त्यातल्या त्यात आंदोलकांनी पोलिसांनाही न जुमानणं, हे अराजकाचं लक्षण आहे. त्रिपुरामधल्या धार्मिक तणावाच्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात काही ठिकाणी उमटले. राज्यात मालेगाव, नांदेड आणि अमरावती अशा ठिकाणी तणाव निर्माण झाला. मालेगावमध्ये ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. दुपारपर्यंत बंद शांततेमध्ये सुरू होता. मात्र, नंतर त्याला हिंसक वळण लागलं आणि दगडफेक करण्यात आली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दुसरीकडे नांदेडमध्ये काही लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीत पोलीस अधिकारीदेखील जखमी झाले. अमरावतीमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अमरावती शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंदोलक सहभागी झाले होते. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने शहरात तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली.
ही परिस्थिती पाहता उत्तर प्रदेशमध्ये जसे आंदोलकांवर गुन्हे दाखल करून, नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय इतरत्रही घेण्याची आवश्यकता या निमित्ताने जाणवली. शीघ्र कृती दलाचे जवान आणि त्यांच्या वाहनांवरही जमावातर्फे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांच्या वाहनांचं नुकसान झालं तर काही नागरिकही जखमी झाले. आंदोलकांचा उन्माद इतका वाढला की त्यांनी एका हॉस्पिटलचीही तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला. यामध्ये तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमधल्या नई आबादी, शिवाजीनगर आणि देगलूर नाका परिसरात जमावाने दगडफेक करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले. या जमावाने पुढे चाल केली असती, तर अनिष्ट प्रकार घडू शकले असते.
देशाच्या ईशान्येला असलेल्या त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकाराची प्रतिक्रिया म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. बांगलादेशमधल्या घटनेनंतर या ठिकाणी विश्‍व हिंदू परिषद आणि जमात-ए-उलेमा (हिंद) अशा धार्मिक संघटना आमने सामने आल्या आहेत. त्रिपुरा हे राज्य बांगलादेशला अगदी लागून असल्यामुळे याठिकाणी हा तणाव पसरला आहे. या ठिकाणी विविध गटांकडून एकमेकांच्या विरोधात हिंसाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारामध्ये अनेक खासगी तसंच सार्वजनिक मालमत्तांचंही नुकसान झालं आहे. पोलीस यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करत असल्याने त्यावरूनही रोष आहे. खोटे फोटो, व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह माहिती पसरवून धार्मिक तणाव वाढण्याचा धोका असल्याने कारवाई केल्याचं समर्थन पोलिसांनी केलं आहे. यूएपीए कायद्याच्या माध्यमातून ठराविक गटाला लक्ष्य करून कारवाई केली जात असल्याचा आरोप, याला विरोध करणार्‍यांनी केला आहे.
काही शक्ती दंगली व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या जाळ्यात अडकून चालणार नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. आताच आपण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो आहोत. या पार्श्‍वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणं परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यातच भाजपने विरोधात आंदोलन केल्यानं तणाव वाढण्याबरोबरच मतांचं धु्रवीकरण होण्याचा प्रकार घडू शकतो. लग्नाच्या वरातीला परवानगी मिळत नसताना मोठे मोर्चे कसे निघतात, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो. त्रिपुरा इथे धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथीयांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रझा अकादमी आणि इतर मुस्लिम संघटनांकडून महाराष्ट्रात आंदोलनं केली गेली. रझा अकादमीच्या पूर्वीच्या मोर्चात पोलिसांवर हल्ले झाले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही संघटना पूर्वीही वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.
याच सुमारास काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून मोठा वाद सुरू झाला. या पुस्तकात खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा इसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली. या मुद्द्यावरून भाजपकडून टीका केली जात असताना खुर्शिद यांनी, मी हिंदुंना दहशतवादी म्हणालोच नाही, असं घूमजाव केलं. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून नवी चर्चा सुरू झाली. ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफरन स्काय’ या प्रकरणामध्ये खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि इसिसशी केली. ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळं बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व इसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झाला आणि या पुस्तकावर तसंच खुर्शिद यांच्यावर जोरदार टीका केली गेली. या वक्तव्यामुळे काँग्रेसअंतर्गतही त्यांच्यावर टीका सुरू झाली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी खुर्शिद यांनी केलेली टीका संयुक्तिक नाही, असं म्हटलं.
आजघडीला एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे. त्या मंदिराच्या पायर्‍या झिजवत आहेत. याच सुमारास खुर्शिद यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची अडचण झाली. यातून मतांचं धु्रवीकरण होऊन काँग्रेसलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे खुर्शिद यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. मी हिंदुंना दहशतवादी म्हणालेलोच नाही. मी फक्त म्हणालो आहे, की ते आणि अन्य अतिरेकी विचारसरणी धर्माचा विपर्यास करण्याबाबत सारखेच आहेत. हिंदुत्वाने सनातन धर्म आणि हिंदुत्ववादाला बाजूला सारलं आहे आणि ‘बोको हराम’ आणि ‘इसिस’प्रमाणेच आक्रमक भूमिका घेतली, असं आपण पुस्तकात म्हटलं असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. हिंदुत्वाच्या समर्थकांकडून ज्या पद्धतीनं या मुद्द्याचा प्रचार केला जातोय, ते पाहता हा धर्माचा विपर्यास आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

Exit mobile version